कुष्ठरोगावरील औषधाचा शोध लावणाऱ्या भाऊ दाजींना मुंबईच्या जडणघडणीचे श्रेय देण्यात येते..
स्त्री-शिक्षणाचा विडा उचललेले आणि मुंबईच्या औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण काम करण्यासाठी ओळखलं जाणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. भाऊ दाजी लाड. त्यांच मूळ नाव रामकृष्ण विठ्ठल लाड. मूळ गाव पार्से असल्यानं ते लाड-पार्सेकर हेही नाव लावायचे. त्यांचा जन्म त्यांच्या आजोळी म्हणजे गोव्यातल्या मांजरे/मांद्रे गावी झाला. दहा वर्षाचे असताना आपल्या वडिलांबरोबर ते मुबंईत आले.
बुद्धीबळ खेळात भाऊ चांगलेच पटाईत होते, त्यांच्या या खेळातल्या प्राविण्यामूळे ते मुंबईच्या गव्हर्नरपर्यंत जाऊन पोहोचले. भाऊंची ही हुशारी पाहून गव्हर्नरने त्यांच्या शिक्षणाची सोय केली.
त्यांची भाऊदाजी अशीही एक ओळख होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण नारायणशास्त्री पुराणिकांच्या मराठी शाळेत, तर पुढचं शिक्षण एल्फिन्स्टन विद्यालयात झालं. त्यांचा संस्कृतावरही चांगला जम होता.
1843 साली त्यांना एल्फिन्स्टन विद्यालयात अध्यापक म्हणून नोकरी लागली. विद्यालयात असताना त्यांनी राजस्थान व गुजरात भागातल्या मुलींना गर्भावस्थेत मारून टाकण्याच्या प्रथेवर परिस्थिती सांगणारा एक निबंध लिहिला. इंग्रजी आणि गुजराती अशा दोन्ही भाषेत हा निंबध होता. या स्पर्धेत त्यांना नंबर पटकावून 600 रूपयांच बक्षीस मिळालं.
त्यानंतर 1845 मध्ये मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. भारतातील वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या सर्वात पहिल्या संस्थांपैकी एक म्हणून ग्रँट मेडिकल कॉलेजला ओळखलं जातं. या कॉलेजच्या निर्मितीमध्ये सर जेजे, नाना शंकर शेठ यांचा सिंहाचा वाटा होता. भारतीय डॉक्टरांची पहिली पिढी घडवणाऱ्या ग्रँट मेडिकल कॉलेजच्या सर्वात पहिल्या बॅचचे विद्यार्थी म्हणून भाऊ दाजी लाड यांनी प्रवेश घेतला. तिथे ऍडमिशन घेण्यासाठी त्यांनी आपली चांगली नोकरी देखील सोडून दिली.
कॉलेजमध्ये त्यांनी ग्रंथपाल म्हणूनही काम केले. शिक्षण घेत असतानाच त्यांना परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याबद्दल फिशर शिष्यवृत्ती मिळाली होती; पण त्यांनी ती नाकारली. जेणेकरून योग्य व्यक्तीला त्याचा फायदा होईल.
1951 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी डॉक्टरकी सुरू केली. मात्र पैशांच्या मागे न लागता त्यांनी गरिबांची सेवा केली, मोफत औषधोपचार केला. त्यांनी कुष्ठरोगावर खष्ठ नावाच्या वनस्पतीच्या बियांपासून तयार केलेले एक देशी औषध शोधून काढले, जे खूप गुणकारी सिद्ध झाले. वनस्पती गोळा करण्यासाठी ते संपूर्ण देशात फिरत, महाराष्ट्रातल्या रुग्णांवर उपचार करीत. यासोबतच गर्भवतींची सुखरूप सुटका करवण्यात भाऊंची ख्याती होती. देवी टोचण्याची पद्धत त्यांनीच लोकप्रिय केली. भाऊ ‘बॉम्बे असोसिएशन’ या संस्थेचे चिटणीसही होते.
नंतर ते ईस्ट इंडिया असोसिएशन’च्या मुंबई शाखेचे ते अध्यक्षही होते. सामाजिक सुधारणांबरोबर त्यांनी औद्योगिक सुधारणांकडेही लक्ष दिले. मुंबईत कागद व कापूस यांच्या गिरण्या काढण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
स्त्री शिक्षणासाठी त्यांना अनेक आर्थिक संकटांना सामोरं जावं लागलं. १८६३-७३ साली स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेचे ते पहिले भारतीय अध्यक्ष होते. या संस्थेतर्फे मुलींच्या तीन शाळा चालविल्या जात. भाऊंनी विधवाविवाहाच्या चळवळीलाही सक्रिय पाठींबा दिला.
लाहोर चाळीतील कन्याशाळेला त्यांनी अनेक वेळा आर्थिक मदत केली. याच शाळेला पुढे ‘भाऊ दाजी गर्ल्स स्कूल’ हे नाव देण्यात आले.
नाण्यांवरील किंवा जुन्या शिलालेखांवरील व ताम्रपटांवरील एक विशिष्ट चिन्ह एक संख्या दर्शवते. त्या संख्येवरून निश्चित काळ समजून येतो, भाऊंचा हा निष्कर्ष सर्वसामान्य झाला आहे. यासह भाऊंनी अनेक लेखकांना लेख आणि माहिती देऊन मदत केली. म्हणूनच कवी नर्मदाशंकर, शंकर पांडुरंग पंडित, बाजीराव तात्या, रावजी रणजित यांनी आपले ग्रंथ भाऊंना अर्पण केलेत.
भायखळा मधला प्रसिद्ध ‘राणीचा बाग’ म्हणजे आत्ताचे ‘वीर जिजामाता उद्यान’ स्थापन करण्यात भाऊंचा पुढाकार होता.१९७४ साली बागेतील संग्रहालयाचे नामकरण करून ‘डॉ.भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय’ करण्यात आलं.
भाऊंचे मराठी बरोबर गुजराती आणि इंग्रजी भाषेवरही प्रभूत्व होते. ते या भाषेत उत्तम भाषणं देतं, त्यांनी नाट्यकलेला प्रोत्साहन दिले म्हणूनच आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी भाऊंना पहिल्या दर्जाचा रसिक म्हणून मान दिला.
दरम्यान, आयुष्यभर इतरांसाठी खस्ता खाणाऱ्या भाऊंवर १८६५ मध्ये आर्थिक संकट आले. त्यातून ते अखेरपर्यंत सावरले नाहीत. ज्यामूळं त्यांच उर्वरित आयुष्य दु:ख, दैन्यात गेलं. त्यातच पक्षाघाताने त्यांचा मुबईमध्ये अंत झाला.
हे ही वाच भिडू
- मुंबईला अंधारातून बाहेर काढायच सगळ्यात पहिल स्वप्न नाना शंकर शेठनी पाहिलं
- कधीकाळी कारकून असणाऱ्या भाऊने ब्रिटीशांच्या वास्तुकलेला लाजवेल असा भाऊचा धक्का उभारला
- इंग्रजांमुळे नाही तर नानांमुळे भारतात रेल्वे आली.