स्ट्रगलच्या काळात बायकोने केलेली ही मदत भाऊ कदम विसरले नाहीत

कसंय भिडूंनो… स्ट्रगल कोणाला चुकत नसतोय. यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी वाटेवरचे दगडधोंडे पार करावेच लागतात. मुद्दा हा आहे की, कितीही यशस्वी झालो तरी स्ट्रगलचे दिवस, संघर्षाच्या काळाची जाणीव मनात कुठेतरी असली पाहिजे. तरच अमाप यश, प्रसिद्धी मिळुनही आपले पाय जमिनीवर राहतात.

आज तुम्हाला अशाच एका कलाकाराची कहाणी सांगणार आहे. जो आपल्याला खळखळुन हसवतो. आज त्या कलाकाराचं नाव जगभर गाजतंय. त्या कलाकाराला इथवर पोहचण्यासाठी खुप झगडा करावा लागला. पण अजुनही तो स्ट्रगलचे जुने दिवस विसरला नाही. म्हणुनच इतकं यश मिळुनही तो ‘सेलिब्रिटी’ न वाटता आपल्यातलाच एक ‘माणुस’ वाटतो.

हा कलाकार म्हणजे भालचंद्र कदम अर्थात महाराष्ट्राचा लाडका कलाकार भाऊ कदम.

भालचंद्रला लहानपणापासुनच घरी लाडाने ‘भाऊ’ म्हणत असत. भाऊंचं शालेय शिक्षण वडाळ्यातील ज्ञानेश्वर महाविद्यालयात गेलं. बीपीटी चाळीत राहणा-या भाऊंच्या वडिलांचं अकाली निधन झालं. यामुळे बीपीटी चाळीतलं राहतं घर भाऊंना सोडावं लागलं आणि भाऊ कुटूंबासोबत डोंबीवलीत स्थायिक झाले.

भाऊंनी मोठा भाऊ श्यामसोबत घराला आर्थिक हातभार लागावा म्हणुन पानाची गादी सुरु केली. भाऊ स्वतः दुकानाच्या गल्ल्यावर बसले आहेत. टपरीवर लोकांना पान-तंबाखु वगैरे देताना भाऊंना नानाविध स्वभाव असणा-या लोकांना अनुभवता आलं. त्यांच्याशी बोलता आलं.

पुढे भुमिका करताना अशाच विविध लोकांच्या स्वभावाचा उपयोग भाऊंनी त्यांच्या अभिनयात केला.

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे भाऊ कदम हे नाव आज सर्वदूर पोहोचलं आहे. या कार्यक्रमाच्या आधीपासुनच ‘घडलंय बिघडलंय’, ‘फु बाई फु’ सारख्या कार्यक्रमांपासुन भाऊ कदम यांचा अभिनय क्षेत्रात स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न चालु होता. भाऊ कदम यांना सुरुवातीच्या काळात त्यांच्या वर्णावरुन सहकलाकार टोमणे मारायचे. या गोष्टी मनात ठेऊन, त्याकडे दुर्लक्ष करुन भाऊंनी त्यांच्या कामावर लक्ष दिलं.

भाऊ कदम यांना काॅलेजमध्ये सुद्धा सर्व भालचंद्र न म्हणता ‘भाऊ’ म्हणायचे. यामुळे आगळीवेगळी पंचाईत भाऊंच्या समोर यायची.

एका मुलाखतीत भाऊंनीच हा किस्सा सांगीतला होता. काॅलेजमध्ये असताना भाऊंना एक मुलगी आवडायची. मित्रांना हि गोष्ट कळताच, मित्रांनी भाऊंना त्या मुलीजवळ भावना व्यक्त करण्यास प्रोत्साहन दिले. भाऊंनी त्या मुलीजवळ जाऊन तिला हाक मारली. तिने हाक ऐकताच पाठमोरे वळुन “बोल ना भाऊ !” असं म्हणाली.

काहीतरी सांगायच्या आधीच मुलीने ‘भाऊ’ केल्यामुळे भाऊंच्या भावना मनातच राहिल्या.

डोंबीवली रेल्वे स्थानक कायम गर्दीचं ठिकाण. परंतु सुरुवातीची अनेक वर्ष कुठे शुटींग असेल तर भाऊ याच गर्दीतुन रेल्वेचा प्रवास करायचे. शुटींगचे स्टुडिओ आणि इतर ठिकाणं हि अंधेरी, गोरेगाव भागात. त्यामुळे भाऊंना अनेकदा अपूर्ण झोपेत पहाटे ४ ला उठायला लागायचं.

परंतु अभिनयाची आवड आणि कामाप्रती निष्ठा असल्याने भाऊंनी अनेक तडजोडी करुन या सर्व गोष्टी अनुभवल्या.

२०१० चं वर्ष. महेश मांजरेकरांनी मराठी सिनेमांचा पुरस्कार सोहळा प्रथमच भारताबाहेर आयोजीत केला होता. या पुरस्कार सोहळ्याचं नाव ‘मिक्ता’. महेश मांजरेकरांनी ‘मिक्ता’ साठी सर्व कलाकारांसह भाऊ कदम यांनाही सहभागी करुन घेतलं. सोहळा दुबईला संपन्न होणार होता. महेश मांजरेकर सर्व कलाकारांचा प्रवासखर्च करणार होते.

परंतु तिथे गेल्यावर थोडेफार पैसे स्वतःजवळ असणं, भाऊ कदम यांना आवश्यक वाटत होतं.

दुबईला गेल्यावर इतरांसोबत कुठे फिरायचं झालं, काही खरेदी करायची झाली तर पैसे नसल्यामुळे आपण काहीच करु शकत नाही, यामुळे भाऊंना वाईट वाटत होतं. गाठीला थोडेफार पैसे असण्याची गरज होती, पण त्यावेळेस भाऊंजवळ पैसे नव्हते. जर आपण असेच रिकाम्या खिशाने सर्वांसोबत फिरलो, तर ते इतरांच्या नजरेत येईल.

पैशांची तजवीज कशी करावी? हा प्रश्न भाऊंच्या मनाला छळत होता.

नव-याच्या मनातली घालमेल बायकोने बरोबर ओळखली. भाऊंच्या बायकोचं नाव ममता. भाऊंची बायको भाऊंजवळ येऊन म्हणाली,

“तुम्ही काळजी करु नका, माझी हि अंगठी गहाण ठेवा.”

भाऊंच्या मनाला हे पटत नव्हतं परंतु त्यांच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यांनी बायकोची अंगठी गहाण टाकली. त्यानंतर मिळालेले पैसे घेऊन दुबईला गेले.

आजही बायकोने त्यावेळेस केलेली हि मदत सांगताना भाऊंचे डोळे पाणावतात.

सर्वांना हसवणारा हा माणुस आतुन किती हळवा आहे, याचीच जाणीव होते. जगभरातल्या लोकांना स्वतःच्या अफलातुन काॅमेडीने पोट धरुन हसवणारे भाऊ कदम, त्यांचे जुने दिवस विसरले नाहीत. म्हणुन त्यांच्या विनोदामध्ये एक निखळता आणि अभिनयामध्ये सच्चेपणा दिसुन येतो.

  • देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.