म्हणून शिवसैनिकांनी पत्रकार भाऊ तोरसेकर यांना मारहाण केली होती

गोष्ट आहे १९७३-७४ सालची. शिवसेनेची स्थापना होऊन काही वर्षे उलटली होती. मुंबईच्या तरुणाईत बाळासाहेबांच्या आक्रमक भाषणांचं भलतंच आकर्षण होतं. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून शिवसैनिक लढत होते.

याच दरम्यान मध्यमुंबईच्या लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुक होणार होती. काँग्रेसने इथले खासदार रा. धो. भंडारे यांची बिहारचे राज्यपाल म्हणुन नेमणूक केली होती. त्यांच्या जागी ऍड.रामराव आदिक यांना तिकीट देण्यात आले होते

त्यांच्या विरुद्ध होत्या कम्युनिस्ट पक्षाच्या रोझा देशपांडे.

मुंबईत गिरणी कामगारांचे आंदोलन तापले होते. त्यांचे नेतृत्व करणाऱ्या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची लोकप्रियता तुफान वाढली होती. त्यांची सुपुत्री असलेल्या रोझा देशपांडे या स्वतः निवडणुकीला उभ्या असल्यामुळे कम्युनिस्ट पक्षाच्या येथे विजयाच्या अपेक्षा वाढल्या होत्या.

या भागात शिवसेनेचं जबरदस्त वर्चस्व होतं. शिवसैनिकांची मागणी होती की ही निवडणूक आपण लढवायची. पण वसंतराव नाईक यांनी रामराव आदिक यांना तिकीट देऊन बाळासाहेबांना पेचात पकडले होते.

बाळासाहेब व रामराव आदिक यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. त्यांनी यापूर्वी शिवसेनेच्या मंचावरून भाषणे देखील केली होती.

वसंतराव नाईक यांच्याशी देखील सेनाप्रमुखांचे चांगले संबंध होते.

शिवसेनेने उमेदवार उभा केला तर त्यामुळे मते विभागली जाऊन रोझा देशपांडे यांनाच मदत होणार म्हणून बाळासाहेबांनी शिवसैनिकांची मागणी असूनही आपला उमेदवार दिला नाही.

यामुळे काही शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली. त्यात कम्युनिस्टांशी लालबागमध्ये दोन हात करणार्‍या शाखाप्रमुख बंडू शिंगरे याचा समावेश होता. त्यांनी उमेदवारासाठी अट्टाहास सुरू केला. उमेदवारी दाखल करायचा दिवस जवळ येऊ लागला तसा बंडू शिंगरे यांचा धीर सुटला.

अखेर बाळासाहेबांनी स्वतः शिवसेना ही निवडणूक लढणार नाही असे स्पष्ट सांगत या प्रकरणावर पडदा टाकला.

कामगार नेते कृष्णा देसाई यांच्या खून खटल्यातले आरोपी सोडवण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्र्यांशी सौदा केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली. कार्यकर्त्यांच्यामध्ये खळबळ उडाली.

यामुळे चिडलेल्या बंडू शिंगरे यांनी बंड पुकारले.

बंडू शिंगरे यांनी लालबाग ची शिवसेनेची शाखा विसर्जित करून प्रतिशिवसेना स्थापन केली. हिंदू महासभेच्या उमेदवाराला पाठींबा दिला.

शिवसेनेत झालेले हे पहिलेच बंड असावे. खळखट्याक संस्कृती असलेल्या सेनेत अशी गद्दारी खपवून घेतली जात नव्हती.

त्यातच बंडू शिंगरे यांनी वेगळा पक्ष स्थापन करून मोठे धाडस केले होते.

जेष्ठ भाऊ तोरसेकर हे त्याकाळी तरुण होते. त्यांनी या संपूर्ण घडामोडीवर दैनिक मराठा मध्ये  ‘बंडूचे बंड’ अशी बातमी छापली. ते आपल्या ब्लॉगमध्ये सांगतात,

“त्यानंतर दोन दिवसांनी मी नायगाव दादर येथे मित्राला भेटायला गेलो असताना; तिथला शाखाप्रमुख प्रभाकर भूमकर येऊन त्या बातमीवरून माझ्याशी हुज्जत करू लागला. मी त्याला समर्पक उत्तरेही दिली. पण तो कमालीच चिडला होता. त्याने दोन लाफ़ा मारल्या आणि अन्य लोक मध्ये पडल्याने विषय तिथेच थांबला.”

भाऊ तोरसेकर यांना त्या भागातील अनेक शिवसैनिक ओळखत होते, भूमकर यांच्याशी देखील त्यांची ओळख होती.

भूमकर यांनी रागाच्या भरात केलेली कृती अनेकांना बुचकाळ्यात टाकणारी होती. भाऊंनी या शाखाप्रमुखाविरुद्ध पोलीस कंपलेंट केली, त्यांना अटक करण्यात आली.

भाऊ तोरसेकर यांच्या बाजूने काही शिवसैनिकांनी मत मांडले, त्यांना झालेली मारहाण चुकीची आहे असा एकंदरीत सूर शाखेच्या बैठकीत होता.

या हल्ल्याचा निषेध केला आणि त्यानंतर शाखाप्रमुख बदलण्याची प्रक्रिया झाली.

झाल्या प्रकाराबद्दल भूमकर यांनीही नंतर शरमिंदा होऊन तोरसेकर यांची माफ़ी मागितली. शिवसेनाप्रमुखांच्या प्रेमातून त्यांनी हे पाऊल उचलले होते. त्यांच्या माफी नंतर सर्व प्रकरणावर पडदा पडला.

भाऊ तोरसेकर यांना झालेल्या मारहाणीबद्दल दैनिक मराठा मध्ये छोट्या चौकटीत बातमी प्रसिद्ध झाली होती.

ही बातमी पाहून तेव्हाचे गृहराज्यमंत्री शरद पवार यांनी तोरसेकर यांना भेटायला बोलावले मात्र त्यांनी हा विषय संपला आहे व यावरून राजकारण करणे योग्य नाही असे म्हणत ही भेट घेतली नाही.

संदर्भ- http://bhautorsekar.blogspot.com/2012/12/blog-post_17.html?m=1

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.