कर्मवीर अण्णा व प्रबोधनकारांनी मिळून मतदारांना दारू पाजली आणि एका उमेदवाराला पाडलं.

मोठ्ठी माणसं ही देखील शेवटी माणसं असतात. प्रत्येकाला दैवत्त्व बहाल करण्याच्या नादात आपण ते माणसं असल्याचं विसरुन जातो. माणूस म्हणून मान्य केलं की त्यांनी देखील आपल्यासारख्या करामीत केल्या असतील. चांगल काही करायचं असेल तर साम, दाम, दंड, भेद सगळ्या निती वापरल्या असतील हे पचवणं सोप्प जातं.

कर्मवीर भाऊराव पाटील हे खूप मोठ्ठे व्यक्तिमत्त्व. प्रबोधनकार ठाकरे देखील तितकेच मोठ्ठे. पण हे दोघे सच्चे दोस्त. ते एकत्रित असले आपण दोस्तमंडळी एकत्र आलो की जे उद्योग करू शकतो तेच करायचे. अशीच ही गोष्ट. त्यांनी मतदारांना दारू पाजली पण कशासाठी हे समजलं की असलेला आदर दुप्पट होतो.

गोष्ट आहे एकोणीसशे वीसच्या दशकातली.

कर्मवीर भाऊराव पाटलांनी नुकतीच रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. त्यासाठी त्यांनी किर्लोस्कर कंपनीमध्ये नांगराच्या मार्केटिंगची नोकरी सोडली होती. बहुजन मुलांसाठी साताऱ्यात एक बोर्डिंग सुरु करायचं त्यांच्या मनात बसल होतं. यासाठी त्यांना मदत करणार होते धनजी कुपर नावाचे एक साताऱ्याचे उद्योगपती.

त्यांनी भाऊराव पाटलांना वसतिगृहाला देणगी देतो पण त्या बदल्यात मला एक किर्लोस्करांच्या सारखा नांगराचा कारखाना काढून द्या अशी अट घातली.

धनजी कुपर मोठे असामी होते. ते काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा होते. त्यांना खानबहाद्दर म्हटल जायचं. त्यांच्या कारखान्यातून उभा राहणारा नफा बोर्डिंगला वापरता येईल म्हणून भाऊराव तयार झाले. त्याच काळात मुंबई कायदेमंडळाच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. कूपरसाहेब साताऱ्यातून उभे राहणार होते.

भाऊराव पाटलांनी त्यांना निवडणुकीला मदत करण्यासाठी आपल्या मित्राला साताऱ्याला बोलवलं. नाव होत केशव सीताराम ठाकरे. हा तरुण मुंबईमध्ये राहून प्रबोधन हे मासिक चालवत होता. त्यांना सगळे लोक प्रबोधनकार म्हणून ओळखत. भाऊरावांना वाटले की हा हरहुन्नरी कलमबहाद्दर आपल्या कारखान्यात जाहिरात खात्यासाठी मिळाला तर आपल्याला त्याचा फायदा होईल शिवाय त्यांना आपण स्वतंत्र प्रेस काढून देऊ. 

कुपरला सुद्धा आपल्या निवडणुकीच्या कामासाठी वगैरे प्रबोधनकार उपयोगी पडणार होते. त्याने त्यांना बोलवून घेतले. काम सुरु झाले. प्रबोधनकारांनी कुपरला त्याचा जाहीरनामा बनवून दिला. त्याच्या जाहिराती छापल्या. त्याकाळच पीआर टीमच म्हणा की. याचा परिणाम असा झाला की धनजी कुपर साताऱ्यातुन निवडून आले. त्यांचा कारखाना सुद्धा जोमात सुरु झाला.

पण त्यानंतर मात्र त्यांची नियत बदलली. कारखान्याच्या नफ्यातील हिस्सा भाऊरावाना देण्यास त्याने साफ नकार दिला. दोघांची भरपूर खडाजंगी झाली. एकेकाळी कोल्हापूरात पहिलवानकी केलेल्या भाऊराव पाटलांच डोक सरकलं. ते थेट पिस्तुल घेऊन धनजी कुपरच्या अंगावर धावले. प्रबोधनकार ठाकरेंनी भाऊरावांना अडवल म्हणून कुपर वाचला.

त्याच दिवशी कर्मवीरांनी शपथ घेतली की , माझे वसतिगृह शाहूंच्या नांवे सुरु करीन आणि त्या वसतिगृहात माझ्या दाढीतील केसाएवढी मुले येई पर्यंत दाढी करणार नाही आणि पायात वहाणा वापरणार नाही.  

भाऊराव झपाटून बोर्डिंग उभा करण्याच्या मागे लागले. प्रबोधनकार पुण्याला निघून आले. त्याचं लिखाणाच काम सुरुच होतं. त्यांनी वेगवेगळ्या निवडणुकीत उमेदवारांना जाहीरनामा लिहून छापून देण्याच काम सुरु केलं. त्यात चांगला पैसा देखील मिळत होता.

काही वर्षे गेली. साताऱ्याची पुढची निवडणुक आली. सालं होतं १९२६. खानबहाद्दर धनजी कुपर परत उभे राहिले.

याच निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात भाऊराव पाटील आणि धनजी कुपर यांची भेट झाली. कुपरनी भाऊरावांना खिजवन्याचा प्रयत्न केला. भाऊरावांनी त्यांना सातारच्या भर चौकात आव्हान दिल,

“खानबहाद्दर, तुमची सारी संपत्ती आणि जिल्ह्यातील दारू इरेला घाला, हा भाऊराव पाटील निवडणुकीत तुम्हाला पाठीवर पालथा पाडणार आहे.”

हा प्रसंग घडला आणि त्यानंतर भाऊराव पाटील तडक पुण्याला प्रबोधनकार ठाकरेंच्या कडे आले. त्यावेळी धनजी कुपरच्या विरोधात भास्करराव जाधव नावाचे एकजण उभे राहिले होते. भाऊराव प्रबोधनकार ठाकरेंना म्हणाले,

“हवी ती युगत काढ. पण या निवडणुकीत कूपरला पाडलाच पाहिजे. जाधवरावाविषयी मला मोठे प्रेम आहे असे नसले, तरी दगडापेक्षा वीट मऊ. माझी प्रतिज्ञा खाली पडली तर मग जिल्ह्यात पुन्हा तोंड दाखवायला नको. बोला काय करणार ते  “

प्रबोधनकारांनी त्यांना थोडा धीर धरायला सांगितलं. प्रचाराची धूळ खाली बसली की कुपरचा व्यवस्थित समाचार घेऊ असं आश्वासन दिल.

खर तर कायम तोंडात साखर असल्याप्रमाणे गोड बोलणाऱ्या धनजी कुपर शेटजीला हरवण सोप नव्हत. त्याच्याजवळ सावकारीतून कमवलेला भरपूर पैसा होता. शिवाय दारूचे गुत्ते होते. सगळीकडे त्याचा संपर्क चांगला होता. त्याला उत्तर द्यायचं झालं तर त्याच्याच भाषेत द्याव लागणार होतं.

प्रबोधनकार ठाकरेंचं डोकं जास्त चालायचं. त्यांनी अभ्यासातून ओळखल की वाळवा केंद्रात कुपरला जास्त मतदान होते. ह्या त्याच्या बालेकिल्ल्याला पाडायचं म्हणजे निवडणूक त्याला जड जाईल. ते भाऊराव पाटलांना घेऊन वाळव्याला आले. प्लन बनवला. भास्कर जाधवांच्या माणसाना समजावून सांगितला.

निवडणुकीच्या दिवशी पोलिंग बूथपासून थोड्या अंतरावर एका ओसाड झोपडीत दारूचा रांजण ठेवण्यात आला होता. गावोगावच्या मतदारांच्या टोळ्या आपापल्या दादांच्या पुढारपणाखाली झुंडींनी येऊ लागल्या. कूपर पार्टीचे मतदार तर चक्क (पंढरीच्या वारक-यांप्रमाणे) टाळमृदंग वाजवीत ‘धनजी धनजी’ जयघोष करीत येऊ लागले.

इकडे भास्कर जाधवांच्या टीमची खास माणसे कामाला लागली. मतदारांना हळूच कानात कुपर साहेबांनी व्यवस्था केली आहे असं सांगितलं जायचं. मग कुपरचे मतदार त्यांच्या झोपडीकडे यायचे. त्यांना भरपूर दारू पाजली जायची. वर जाताना सांगण्यात यायचं.

 ‘‘हे पहा, हे पहा कूपर बिपर काही आत गेल्यावर बोलायचे नाही हं. फक्त हत्तीपुढे तीन खुणा करून परतायचे. लक्षात ठेवा हत्ती.’’

एवढा मंत्र द्यायचा. मतदार आधीच तर्रर्र झालेला. प्रत्येकजण जायचा नि हत्तीपुढे तीन खुणा करून परत यायचा. असे अनेक मतदार फोडले. संध्याकाळी साडेचारच्या सुमाराला कूपर आपल्या मोटारीतून वाळवे बूथवर आला. त्यांचे कार्यकर्ते गडबडीत त्यांना भेटायला गेले. कुपरसाहेबाना व्यवस्था चांगली केल्याबद्दल धन्यवाद देऊ लागले. कुपरला कळेना कसली व्यवस्था. त्यान विचारलं,

“मतदान व्यवस्थित झालं ना?”

कार्यकर्ता म्हणाला ,

“हो. एकदम व्यवस्थित. सगळ्यांनी हत्तीच्या पुढे तीन रेषा ओढल्या.”

धनजी कुपरने डोक्याला हात लावला. त्याचं चिन्ह होतं घोडा आणि जाधवांचं चिन्ह होतं हत्ती. अडाणी मतदारांनी घोळ घातला होता. कुपरच्या लक्षात आलं काही तरी गौडबंगाल आहे. तो म्हणाला,

“भाऊराव पाटील आला होता काय, कोणी पाहिला काय? हे त्रांगडे रचायला ठाकरेच येऊन गेलेले असावे. हे पाटलाचे डोके नव्हे”

कार्यकर्त्यांनी खाली मान घातली. प्रबोधनकारांची कुटनीती यशस्वी झाली. त्या निवडणुकीत कुपरचा पराभव झाला. भास्करराव जाधव निवडून आले. भाऊरावांचा बदला पूर्ण झाला.

हा किस्सा खुद्द प्रबोधनकार ठाकरेंनी आपल्या माझी जीवनगाथा या आत्मचरित्रात लिहिला आहे.

ते म्हणतात,

“निवडणुकांच्या हंगामात कसकसल्या समाजनीतिविघातक व्यसनांच्या नि लाचलुचपतीच्या बळावर निवडणुकांचे लढे लढवले जातात, याचा तपशील पाहिला का शिसारी येते. अनाहूतपणे मी या फंदात गेलो आणि त्यातील सारे प्रवाह, प्रघात नि प्रवाद पाहून इतका विटलो की कोणत्याही निवडणुकीचा उमेदवार प्रचारासाठी माझ्या उंब-यांजवळ आला की माझ्या कपाळाला आठ्या पडतात.”

कदाचित यामुळेच ते आणि भाऊराव या दोघांनीही परत निवडणूक या गोष्टीपासून चार हात लांब राहणे पसंत केले. पण दोघांची दोस्ती कायम राहिली. काही दिवसांनी भाऊराव पाटलांचे शाहू बोर्डिंग सुरु देखील झाले. तिथल्या मुलांच्या जेवणासाठी लोकांनी मदत करावी म्हणून हे दोघे सातारच्या रस्त्यावरून हातात झोळी घेऊन देखील हिंडले. भाऊराव पाटलांनी आपलं आयुष्य महाराष्ट्रातील मुलांना शिकून शहाण करण्यासाठी वेचल. रयत उभी केली.

प्रबोधनकार ठाकरे राजकरणात राहिले. त्यांच्या मुलाने बाळासाहेबांनी शिवसेना पक्ष काढला. पण कधीही स्वतः निवडणूक लढवली नाही. आज प्रबोधनकारांची चौथी पिढी राजकारणात आली आहे आणि आदित्य ठाकरे यांनी निवडणूकीच्या रिंगणात उतरून ही परंपरा मोडली आहे.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. kishor says

    1926 ची निवडणूक कशी काय??

Leave A Reply

Your email address will not be published.