आज आपल्या स्टेट्स वॉलवर दिसणाऱ्या मराठी शायरीचं श्रेय भाऊसाहेब पाटणकरांना जातं..
जातो तिथे उपदेश आम्हा सांगतो कोणीतरी
कीर्तने सारीकडे चोहीकडे ज्ञानेश्वरी,
काळजी आमुच्या हिताची एवढी वाहू नका जाऊ
सुखे नरकात आम्ही तेथे तरी येऊ नका……
या ओळी आहेत मराठीतले जिंदादिल शायर म्हणून ओळखले जाणारे भाऊसाहेब पाटणकर यांच्या. भाऊसाहेब पाटणकर हे मराठी शायरीचे जनक म्हणून ओळखले जातात. मराठीमध्ये शायरी हा प्रकार त्यांनी रुजवला आणि महाराष्ट्रच नव्हे तर देशभर पोहचवला.
भाऊसाहेब पाटणकर यांचा प्रवास मोठा रंजक आहे आज त्यांच्या आयुष्याबद्दल आणि लेखनाबद्दल जाणून घेऊया. कारण त्यांनी मराठीत जो शायरी प्रकार रूढ केला तो आजही चिरतरुण आहे आणि नवीन लेखकांना बळ देणारा आहे.
भाऊसाहेब पाटणकर यांचं मूळ नाव वासुदेव वामन पाटणकर. २९ डिसेंबर १९०८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील अचलपूर येथे शाळेचे मुख्यध्यापक होते. पाटणकरांनी सीतारामशास्त्री कुरुंभट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वेद, तत्वज्ञान आणि इतर शास्त्रांचा अभ्यास केला.
पुढे त्यांनी कला शाखेत प्रवेश घेतला आणि पदवी पूर्ण करून ते वकील झाले. १९३५ मध्ये यवतमाळ जिल्हा न्यायालयात पूर्णवेळ वकील म्हणून ते काम करत असायचे. फौजदारी खटल्यांमध्ये ते कायम जिंकत असायचे त्यामुळे त्यांचं बरंच नाव झालं होतं.
भाऊसाहेब यशस्वी वकील तर होतेच शिवाय ते एक शिकारी म्हणून सुद्धा प्रसिद्ध होते.
उमेदीच्या काळात त्यांनी ६ पट्टेरी वाघांना लोळवलं होतं त्यामुळे त्यांचं नाव त्या काळात प्रसिद्ध झालं होतं.
त्यांच्याकडे अधिकृत शिकारीचा परवाना होता. कालांतराने शिकारीवर कायद्याने बंदी आली पाटणकरांनी शिकारीचा नाद सोडला.
पुढे दृष्टिदोषामुळे त्यांनी त्यांना वकिली सोडावी लागली. पण वाचन आणि अध्ययन चांगलं असल्याने ते कविता वैगरे प्रकाराकडे वळले. यात त्यांनी नावीन्य शोधून काढलं आणि मराठीत शायरी प्रकार आणला. त्यांनी रचलेल्या कविता ते त्यांच्या पत्नीला ऐकवत आणि त्यांच्या पत्नी इंदुताई त्या लिहून घेत.
हळूहळू त्यांच्या रचना लोकप्रिय होऊ लागल्या. त्यांच्या शायरीचे कार्यक्रम पुणे, नाशिक, मुंबई आणि महाराष्ट्रभर होऊ लागले. इतकंच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील हैद्राबाद वैगरे शहरात सुद्धा होऊ लागले. त्यांच्या शायरीच्या मैफिलीत वाह वाह आणि प्रेक्षकांचा जल्लोष अविरत चालू असे.
वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी मराठी शायरीची सुरवात केली. सुरवातीला त्यांच्या शायऱ्यांमध्ये विनोद आणि प्रणय यांची रेलचेल असायची पण जेव्हा त्यांनी शायरी या प्रकार खोलवर अभ्यासला तेव्हा जीवन आणि तत्वज्ञान अशा विविध विषयांवर त्यांनी शायरी लिहिली. त्यांचं लेखन हे कायम आनंद देणारं, कधी गंभीर आणि हसवून जाणारं असायचं.
भाऊसाहेबांनी पुढे मराठी शायरी, मुशायरा, दोस्त हो, मैफिल, जिंदादिल अशी पुस्तके काढून मराठी रसिकांच्या अभिरुचीमध्ये नव्याने भर घातली. दोस्तहो आणि जिंदादिल या संग्रहांनी मराठी रसिकांना वेड लावलं होतं. २० जून १९९७ ला भाऊसाहेब पाटणकर यांचं निधन झालं.
त्यांची शायरी हि उर्दू शायरीपेक्षा अत्यंत वेगळी आणि स्वतंत्र होती त्यामुळे ती मराठीत जास्तच लोकप्रिय झाली. त्यांच्या काही गाजलेल्या शायऱ्या खास पाटणकर चाहत्यांसाठी….
सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे, तो कवींचा मान तितुकी पायरी माझी नव्हे..
आपुल्याच दाती ओठ आपुला चावणे नाही बरे,
हक्क आमुचा आमच्या समोरी मारणे नाही बरे….
मृत्यूची माझ्या वंदता सर्वत्र जेव्हा पसरली,
घबराट इतुकी नर्कलोकी केव्हाच नव्हती पसरली
कफन माझे दूर करुनि पाहिले मी बाजूला
एकही आसू डोळ्यात कुणाच्याही ना मी पाहिला
बघुनी हे माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासूनही मी रडलो असा मेल्यावरी……
भिन्न मद्यांच्या चवी आम्हा क्रमाने चाखतो
पेल्यातली घेवुन आधी ओठातली मग चाखतो
वेगळी काॅकटेल, ऐसी एकत्र ना मिसळायची
सांगतो याची मजा चौघात नाही यायची……
आहो असे बेधुंद आमची धुंदही साधी नव्हे
मेलो तरी वाटेल मेला दुसरा कुणी आम्ही नव्हे….
हे हि वाच भिडू :
- UPSC वाला शेवटी तलाठी होतो इतक खरं “नेमाडे” सांगतात.
- तिची आठवण कायम राहावी म्हणून माणिक सीताराम गोडघाटे “ग्रेस” बनले..
- पुलंनी हात ठेवलां की माणसाचं सोनं व्हायचं, पण रानकवीचं सोनं करण पुलंना देखील जमलं नाही.
- सुरेश भटांनी लिहिलेलं मराठी अभिमान गीत गाण्यासाठी तब्बल ४५० गायक पुढे आले होते…