धरण तर उभारलंच शिवाय स्वतःची बागायती जमीन धरणग्रस्तांना देऊन टाकली…
नेता हा फक्त आपल्या अनुयायांचे नेतृत्व करणारा त्यांना आदेश देणारा नसावा. तो जनतेचे प्रश्न समजून घेणारा, त्यासाठी आपल्या जीवाचं रान करणारा असावा. महाराष्ट्राच्या राजकारणात असे फारच मोजके नेते होतुं गेले जे फक्त राजकारणी नव्हते तर जनतेचे नेते होते. सत्तेची पदे असोत किंवा नसोत त्यांचं लोकनेता हे पद कोणी कधी काढून घेऊ शकलं नाही.
या परंपरेचे एक महत्वाचे शिलेदार म्हणजे भाऊसाहेब संतुजी थोरात.
शेतकरी वारकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. तो काळ ब्रिटिश पारतंत्र्याचा होता. अगदी लहान वयात भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. अठराव्या वर्षी शालेय शिक्षणाचा त्याग करून चलेजाव आंदोलनात सहभागी झाले.
अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील अनेक तरुण भूमिगत झाले. भाऊसाहेब थोरात व हे सर्व तरुण यांनी तहसीलदार ऑफिस वर हल्ला करणे, रस्त्यावरचे पूल तोडणे,टेलिफोनचे खांब मोडून टाकणे,सरकारी मालमत्तेला आगी लावून नुकसान करणे अशी अनेक आंदोलने त्यांनी केली.
अहमदनगर जिल्ह्यात एक प्रकारचे प्रतिसरकार स्थापन केले होते.
स्वातंत्र्यलढ्याच्या आंदोलनात त्यांना अनेकदा तुरुंगातही जावं लागलं.पुढे तुरुंगातून सुटका झाल्यावर त्यांनी शेतकऱ्यावर जुलूम करणाऱ्या सावकारशाही विरुद्ध लढा सुरु केला.
त्यांच्याच पुढाकाराने सावकारी दस्तऐवजाची होळी करून खिरविरे शिवारात आदिवाशी व शेतकऱ्यांना कर्ज व वेठबिगारीच्या जोखडातून मुक्त केले.
पुढे स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेसची धुरा यशवंतराव चव्हाणांच्या कडे आली. त्यांनी खेडोपाड्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांना पक्षात आणले. सहकाराची चळवळ त्यांच्या माध्यमातून रुजवली. भाऊसाहेब थोरात हे देखील यशवंतराव चव्हाणांच्या ध्येयधोरणांकडे ओढले गेले.
संगमनेर तालुक्यातील ओसाड रानांना हिरवंगार करायचं त्यांचं स्वप्न होतं.
यासाठी सिंचन हा महत्वाचा धागा पकडून त्यांनी मुळा नदीचे पाणी उपसासिंचना द्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची योजना आखली, आपलं सरकारदरबारी वजन वापरून ती मंजूर करून आणली. अन बघता बघता संगमनेरच्या दुष्काळी भागाचा कायापालट झाला.
इथल्या मळ्यात पिकणारा भाजीपाला पार चंदीगडपर्यंत जाऊन पोहचला. कोट्यवधींची उलाढाल सुरू झाली. टोमॅटो कोबी बरोबर मुळा नदीच्या पाण्यात सतेज झालेली पालेभाजी मुंबईकरांची खास झाली.
भाऊसाहेब थोरतांनी संगमनेरच्या दुष्काळी ओसाड रानात उसमळ्यांचं हिरवं नंदनवन फुलवलं.
शेती फुलली यांच्यासोबत पूरक उद्योग सुरू केले तर शेतकऱ्यांची दैन्यवस्था जाऊन हातात चार पैसे खेळू लागतील हे त्यांनी ओळखलं. यातूनच गुजरातच्या आनंदला जाऊन अमूल डेअरीचा अभ्यास केला व अशीच दुधक्रांती संगमनेर तालुक्यात आणली.
दुधसंघपासून ते साखर कारखान्यापर्यंत, सहकारी पतपेढी पासून ते सहकारी बँकेपर्यंत विकासाचं जाळं तालुक्यात विणल. काँग्रेसमध्ये जाऊनही आपले डावे विचार जपणाऱ्या भाऊसाहेब थोरतांनी सहकार सम्राटाची संस्कृती स्वीकारली नाही. सहकारातले नीती मुल्य तंतोतंत पाळले ,आर्थिक शिस्त जपली.
सहकारातील प्रत्येक सहकारी संस्था हि शेतकरी मालकीची असल्याने ती मोडकळीस येता कामा नये याची ते हमखास काळजी घेतली.
शेतकरी जगला तर राष्ट्र टिकेल याची खूणगाठ त्यांनी बांधली होती. गांधीटोपी, दुटांगी धोतर अशा वेशातला शेतकऱ्यांना कायम आपला वाटत असलेला हा कॉम्रेड नेता. भाऊसाहेबांनी शेतकरी हितासाठी असे निर्णायक लढे देऊन मोठे कार्य केले.
संगमनेर ,अकोले तालुक्यातील,राहाता या तालुक्यातील जिरायत शेतीला कॅनॉल चे पाणी मिळवून दिले तर दुष्काळग्रस्त शेतकरी बागायतदार होईल या रास्त भूमिकेतून भाऊसाहेब थोरात यांनी त्यावेळी निळवंडे धरण झालेच पाहिजे अशी मागणी लावून धरली त्यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील,शरदचंद्र पवार, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांचेकडे शेतकऱ्यांचे शिष्ट मंडळे नेऊन मागणी केली. काही वेळा शेतकऱ्यांचे मोर्चे काढून लढेही उभारले.
अखेर राज्य सरकारने भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी प्रवरा नदीवर साडे आठ टीएम सी क्षमतेच्या ‘निळवंडे’ धरण उभारणीस मंजुरी दिली.
जिरायत आणि दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना कॅनॉल चे पाणी मिळवून देण्याचे वडिलांनी उराशी बाळगलेले स्वप्न साकारण्यासाठी भाऊसाहेब थोरात यांचे पुत्र बाळासाहेब थोरात पुढे सरसावले. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच पाटबंधारे राज्य मंत्री महणून वर्णी लागताच बाळासाहेबांनी निळवंडे धरणासाठी भरघोस निधी देऊन या धरणाचे काम मार्गी लावले. त्यांच्याच कालखंडात धरण बांधून पूर्ण झाले.
विशेष म्हणजे प्रकल्प बाधित शेत्कात्यांना भाऊसाहेब थोरात यांनी त्यांचे नावे असलेली ‘जोर्वे’ या गावातील पाच एकर बागायत जमीन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला देणगी म्हणून नावावर करून टाकली आणि राज्यापुढे एक आदर्श निर्माण केला.
धरण बांधण्या पूर्वीच प्रकल्प ग्रस्तांचे १०० टक्के पुनर्वसन पूर्ण झालेला हा राज्यातील पहिला प्रकल्प आहे तो केवळ थोरात यांच्या अथक प्रयत्नामुळेच !
सहकार,बँकिंग व शेतकरी प्रश्नावर निष्ठेने काम करणाऱ्या भाऊसाहेब थोरात या नेत्याने वृद्धापकाळात ही आपली वेगळी ओळख करून दिली. भाऊसाहेबांनी संगमनेर तालुक्यात डोंगराळ व उजाड परिसरात झाडे लावण्याचा निर्णय घेतला.
दरवर्षी बियांची पेरणी करून दंडकारण्य उभारणी साठी प्रयत्न सुरु करून समतोल पर्यावरण वृद्धीसाठी चांगला संदेश महाराष्ट्रासमोर ठेवला. या उपक्रमाची जागतिक पातळीवर नोंद झाली आहे. भाऊसाहेब थोरात यांचे सारखे आगळे वेगळे नेतृत्व सहकार क्षेत्रांत आज तरी दुर्लभ झाले आहे.
हे ही वाच भिडू.
- निधी नाही म्हणून उपोषणाला बसणाऱ्या आमदारांना सांगा, हा नेता नारळ फोडून मग मंजूरी घ्यायचा
- बाजारात तंबू ठोकून जनतेच्या समस्या सोडवणारा आमदार पुणे जिल्ह्यात होऊन गेला.
- आमदाराच्या घरचे रोजगार हमीवर कामाला जातात ही त्याकाळची वस्तुस्थिती होती