खोपडे साहेबांनी दंगल रोखणारा ‘भिवंडी पॅटर्न’ जन्माला घातला, ही त्याचीच गोष्ट..

हिंदू मुस्लीम दंगल रोखण्यासाठी भिवंडी प्रयोग राबवण्यात आला होता अस ऐकण्यात आलं होतं. हा प्रयोग नक्की काय होता. याचा फायदा झाला का?

आज सकाळी bolbhidhu1@gmail.com वरती आम्हाला मेल मिळाला. भिवंडी पॅटर्न नक्की काय होता? 

भिवंडी पॅटर्न समजून घेण्यासाठी भिवंडी शहराचा इतिहास समजून घ्यायला हवा.

भिवंडी हे यंत्रमागाच्या मागे धावणार शहर. अस सांगतात की जेव्हा मुंबईच्या गिरणी कामगारांनी मुंबईत गिरणी कामगारांचा संप घडवून आणला तेव्हा एकट्या भिवंडीने देशभरातल्या कापडाची गरज पुर्ण केली. भिवंडीत काम करणारा मजूर उपाशीपोटी झोपू शकत नाही इतकं काम इथे मिळून जातं असा उल्लेख या शहराचा केला जातो.

सर्वसाधारण गरिब, मजूर, कष्टकरी वर्ग भिवंडीत मोठ्या प्रमाणात आहे. ज्याप्रमाणे उल्हासनगरमध्ये सिंधी लोक मोठ्या प्रमाणात आहेत त्याचप्रमाणे भिवंडीत मुस्लीम मोठ्या प्रमाणात. साहजिक देशभर मुस्लीम समाजाबद्दल काही वाईट गोष्टी घडल्या तर त्याचा उद्रेक भिवंडीत पहिला उमटायचां अस चित्र होतं.

एक काळ होता जेव्हा भिवंडी हे देशाच्या कानाकोपऱ्यात फक्त आणि फक्त दंगलीसाठी ओळखलं जातं असे. मुस्लीम समाजाची संख्या जास्त होती. कोणतेही कारण दंगलीसाठी पूरक ठरायचं. इतकच काय तर कित्येक दंगलीच्या मुळापर्यन्त पोहचण्याचा प्रयत्न केला तर पोलीसांना त्यांची कारण देखील सापडली नाहीत.

१९६०,१९६५,१९७०,१९८४ अशा मोठ्या दंगलीचा इतिहासाच भिवंडीचा राहिला आहे. 

अशा दंगलीमध्ये कित्येक घरातील चुली कायमच्या बंद व्हायच्या. वित्तहानी तर होतच असे पण कधीच न भरून येणारी जिवीतहानी हा विषय देखील गंभीर असायचा. दंगल रोखण्यासाठी किंवा दंगलसदृश्य परिस्थिती तयार झाल्यानंतर पोलीसांचा पॅटर्न ठरलेला असायचा.

जिथे तणावपुर्ण परस्थिती आहे तिथे पोलीस मोठ्ठा फौजफाटा घेवून हजर होत असत. परिसरात संचारबंदी लावली जातं. कमांडो फोर्सकडून लाठीहल्ला होतं. अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या जात. प्रसंगी गोळीबार करावा लागत असे. काही दिवस जात आणि वातावरण शांत होतं असे.

शांत झालेल्या वातावरणात आत्ता पुढची दंगल कधी याचीच वाट पहावी लागत असे अस चित्र होतं. भिवंडीतल्या दंगली कोणीच रोखू शकणार नाही अस वातावरण होतं तेव्हा तत्कालीन पोलीस उपायुक्त सुरेश खोपडे यांनी हे शिवधनुष्य हाती घेतलं व त्यातूनच दंगलींना रोखणारा भिवंडी पॅटर्न जन्माला आला. 

पोलीस उपायुक्त सुरेश खोपडे यांनी दंगलीचा अभ्यास करण्यास सुरवात केली. ते साल होतं १९८८.

चार वर्षांपूर्वीच म्हणजे १९८४ साली भिवंडीत मोठ्ठी दंगल झाली होती. या दंगलीचा समाजशास्त्रीय अभ्यास करण्यास त्यांनी सुरवात केली. सर्वसाधारणपणे पोलीस प्रशासनाचा असा समज असे की अशा दंगलीत समाजविघातक कृत्ये करणारी लोकं बाहेरून सहभागी होतं असतात. गुन्हेगार प्रवृत्तीचे लोकं अशा गोष्टींना प्रोत्साहन देत असतात.

पण दंगलीचा अभ्यास करताना सुरेश खोपडे यांच्या लक्षात आलं की दंगलीत सहभागी झालेल्या लोकांपैकी ९६ टक्के लोकं हे कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नाहीत. ज्यांच्या घरातील माणसे या दंगलीत मारले गेले, ज्यांच्यावर दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते अशा सर्वांसोबत बोलल्यानंतर लक्षात आले की नसलेला संवादातून अविश्वासाच नातं होतं होतं.

त्यातून एकमेकांविरोधात संशय बळावत चाललेला व याचा उद्रेक दंगलीत व्हायचा. लोक एकमेकांच्या विरोधात यायचे त्याला कारण दोन्ही समाजात नसलेला संवाद होतं.

हा अभ्यास करुनच सुरेश खोपडे यांनी भिवंडी पॅटर्न आणला. 

दहा हजार लोकसंख्या असलेल्या मोहल्यासाठी एक मोहल्ला समिती स्थापन करण्याचे ठरवण्यात आले. अशा मोहल्ला समितीत त्या भागातील हिंदू आणि मुस्लीम समसमान संख्येने सहभागी करुन घ्यायचे. त्यानंतर सर्व स्तरातील नागरिकांना, स्त्रीयांना व पत्रकारांना या समितीत आवर्जून स्थान देण्याचं ठरवण्यात आलं. मोहल्ला समितीतमध्ये एक पोलीस उपनिरिक्षक दर्जाचा अधिकारी अध्यक्ष म्हणून नेमण्यात आला.

या मोहल्ला समितीच्या दर पंधरा दिवसांनी बैठका पार पडू लागल्या. हिंदू-मुस्लीम तितक्याच संख्येने असल्याने सोबतचा संवाद वाढत गेला. एकमेकांप्रती असणारं अविश्वासचं वातावरण शांत होवू लागलं.

मोहल्ल्यातील फौजदारी, दिवाणी, अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे मोहल्ला कमिटीत सर्वानुमते सोडवण्यात येवू लागले. सहभागी झालेली लोक अधिक समंजस्यपणे काम पाहू लागली. छोटमोठ्या गोष्टीबद्दल देवाणघेवाण वाढली आणि विश्वास वाढतं गेला.

मोहल्ला कमिटीचा फायदा म्हणजे एकमेकांच्या घरासमोरुन देखील न जाणारे लोकं एकमेकांच्या घरी जावू लागले. बोलून सुखदुख समजून घेवू लागले. १९९० च्या दशकात मुंबईत दंगली पेटल्या.

मुंबईतील दंगलीचा विचार करता दंगलीची राजधानी समजली जाणारी भिवंडी कधीच संपून जायला हवी होती पण तस झालं नाही. सुरेश खोपडे यांच्या या अभिनव कल्पनेमुळे भिवंडी दंगलीपासून चार हात राहीलं. 

सुरेश खोपडे यांनी सुरू केलेल्या भिवंडी पॅटर्नच कौतुक झालं. राज्यासोबतच देशभरात असा प्रयोग राबवण्याच्या सुचना केंद्राकडून देण्यात आल्या. मोहल्ला कमिटी नावाची संकल्पना उदयास आली. जिथे प्रयोग प्रामाणिकपणे राबवण्यात आल्या तिथल्या दंगली कमी झाल्या. घटनातज्ञांनी मोहल्ला कमिटीचा समावेश राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये करावा अशी मागणी देखील केली होती.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Prakash waghmare says

    Nice information

Leave A Reply

Your email address will not be published.