अक्ख्या जगात जी भिवापुरी मिरची तिखट ठसके देते, ती आपल्या महाराष्ट्राची आहे भावांनो

मिरची म्हटलं कीच ठसका लागतो. पण एखाद्या समारंभात तिखट झणझणीत पदार्थ नसेल तर काहीतरी गंडल्यासारखं वाटतं याला कुणीच नकार देणार नाही. त्यातही जर तुम्ही नॉन-व्हेज लव्हर असाल तर मग विषयच नाही. तिखट तर्री रस्सा हवाच भावांनो. आता रस्सा म्हटलंय तर सावजी मटण रस्सा कुणाला माहित नाही, असा क्वचितच कुणी सापडेल. पण या सावजी मटण रस्स्याच्या झणझणीतपणामागे जे रहस्य आहे ते म्हणजे भिवापुरी मिरची.

या भिवापूरीचा नाद भारतालाच नाही तर जगाला लागलाय. परदेशातही ही मिरची भल्याभल्यांच्या डोळ्यात पाणी आणते. पण तरीही सगळ्यांना ही हवीच असते. नायतर सरळ “मज्जा नाय” असं म्हणतात.

पण एक कॉलर टाईटवाली गोष्ट सांगू?

ही वर्ल्ड फेमस भिवापुरी मिरची आपल्या महाराष्ट्राने जगाला दिलीये भिडू.

बऱ्याच जणांना माहित नाहीये पण महाराष्ट्राच्या नागपूरने फक्त संत्राचं नाही तर भिवापुरी मिरचीही आपल्याला दिलीये. नागपूर – गडचिरोली मार्गावर उमरेडनंतरचंं दुसरं मोठं तालुक्याचं ठिकाण म्हणजे भिवापूर. आणि इथलं हे मुळ पीक असल्याने या गावावरून भिवापुरी मिरची असं नाव पडलं. या मिरचीला इतकी मागणी आहे की देशभरातील व्यापारी ही मिरची खरेदी करण्यासाठी या छोट्याशा गावात येतात. इतकंच नाही तर चीन, मेक्सिकोसह इतर देशांना ही मिरची निर्यात केली जाते.

असं काय खास आहे मग या मिरचीत?

या मिरचीची चव आम्लीय तिखट नाहीये. तिचा रंग गडद लाल असतो. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ या मिरची पावडरच्या रंगात कोणताही बदल होत नाही. तिच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. ‘अ’ जीवनसत्त्वाचा समावेश या मिरचीत आहे. या मिरचीच्या आवरणाची जाडी इतर मिरचीच्या वाणांच्या तुलनेत अधिक आहे आणि त्यामुळे टिकवण क्षमता सुद्धा जास्त आहे. मिरचीची लांबी तर एक ते दीड इंच इतकी आहे.

अशा सर्व गोष्टींमुळे या मिरचीचा वापर वऱ्हाडी मिरची ठेचा आणि मसाला अशा खाद्यपदार्थांत तर होतोच पण सौंदर्य प्रसाधन उद्योगातही या मिरचीचा वापर होतो.

या मिरचीची लागवडही सोपी आहे. भिवापुरी मिरचीला एका पाण्याची गरज असते. मात्र ती सोय नसेल तरी देखील हे पीक तग धरू शकतं बरं का! परिणामी, एकही पाणी न देता हे पीक घेणं शक्य होतं. या मिरचीचं व्यवस्थापनही इतर वाणांच्या तुलनेने सोपे आहे. या मिरची पिकाला एकरी सरासरी १५ ते २० हजार रुपयांचा खर्च येतो.

या भिवापुरी मिरचीला भौगोलिक मानांकन म्हणजेच जी आय टॅग सुद्धा प्राप्त आहे.

चव आणि आकाराच्या बाबतीत वेगळेपण जपणाऱ्या या भिवापुरी मिरचीच जतन आणि प्रसार करण्याच्या उद्देशानं भिवापुरी मिरची उत्पादक समूह गटाची उभारणी करण्यात आली होती. याच गटाने भिवापुरी मिरचीला भौगोलिक निर्देशांक मिळावा म्हणून प्रस्ताव दाखल केला होता. आणि त्यानुसार या मिरचीचा हटकेपणा जाणत तिला भौगोलिक निर्देशांक मिळाला आहे.

हे पीक घेणाऱ्या गावातील लोक भिवापुरी मिरचीची शुद्धता जपण्याला सगळ्यात जास्त प्राधान्य देतात. आता तर या मिरचीच्या वाणाच्या अभ्यासावरही भर दिला जातोय. कारण भिवापुरी मिरचीमध्ये वैविध्य दिसून आला आहे. भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांची मदत घेऊन त्यानुसार गॅमा किरणांचा वापर करून वाण विकसित करण्याचंही प्रस्तावित आहे.

या मिरचीने भिवापूर गावातील कित्येकांना रोजगार मिळवून दिला आहे. अनेकांची उपजीविका याच मिरची व्यवसायातून भागवली जाते. अनेक शेतकरी गेल्या ४० ते ५० वर्षांपासून हे पीक घेतात. असं असलं तरी या मिरचीचा अस्तित्व टिकवण्याचा संघर्ष सध्या सुरू आहे.  पूर्वी मोठ्या प्रमाणावर लागवड होणारं या मिरची खालील क्षेत्र आज दीड हजार एकरापर्यंतच मर्यादित झाले आहे.

या सगळ्यांचा विचार करून भिवापूर मिरची उत्पादक समुह गटाच्या शेतकऱ्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला या वाणाची उत्पादकता वाढवण्यासाठी संशोधन करण्याचाही आग्रह केला आहे. आपली खासियत आणि पारंपरिक ओळख असलेली ही मिरची नामशेष होऊ नये म्हणून हे प्रयत्न आहेत. गेल्या वर्षी नागपूर कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर पहिल्यांदा या वाणाच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. आणि यानंतर फिल्ड ट्रायल सुरु आहे.

तेव्हा जर तुम्ही खवय्ये असाल तर अशी ही ठसकेबाज भिवापुरी मिरची एकदा नक्कीच चाखायला हवी. तिचा तिखटपणा अनुभवायला हवा. आणि ज्या गावांने या मिरचीच्या जोरावर आपल्या महाराष्ट्राचं नाव जगभरात गाजवलंय त्या गावाची भेट नक्कीच घ्यायला हवी भिडू.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.