इतिहासात भोसले आणि नाईक-निंबाळकर घराण्याचे एकमेकांसोबतचे संबंध कसे राहिले आहेत..

सातारा जिल्ह्याचं राजकारण फिरवू शकणारी जिल्ह्यातील दोन मातब्बर घराणी म्हणजे,

भोसले आणि नाईक-निंबाळकर.

दोन्हीही राजघराणी. त्यापैकी एक घराणं तर छत्रपतींचे थेट वंशज. संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपतींच्या गादीचे वारसदार. दूसरे निंबाळकर घराणे देखील राजघराणे. संस्थान घराणं.

आज दोन्ही घराण्यातून कधी विस्तव जात नसल्याच्या चर्चा होतात तर कधी एकमेकांना भेटून दोन्ही घराण्याचे वारसदार एकमेकांचा सन्मान देखील करत असतात.

म्हणूनच हे दोन्ही घराण्यांचा इतिहास मांडण्याचा हा प्रयत्न.

पैकी भोसले अर्थात शिवछत्रपतींची गादी याबाबत अनेकांना अनेक गोष्टी माहितच असतील.

मुळचे शिसोदिया, शिसोदे असणारे राजपूर राजवंशाशी संबधित हे घराणे. चौदाव्या शतकात या घराण्याला भैरावजी उर्फ भोसाजीराणा हे कर्तबगार पुरुष होऊन गेले. दक्षिणेकडे आल्यावर या घराण्याचे आडनाव भोसले पडल्याचा इतिहास आहे.

वेरुळचे बाबाजी भोसले हे भोसले घराण्यातील पहिले ज्ञात पुरुष.

त्यांच्याकडे वेरूळची पाटीलकी होती. शिवाय पांडे पेडगाव व इतर अशा आठ गावांची देशमुखी त्यांना सांभाळायला दिली होती. सोबतच शेतीवाडी सांभाळून देऊळगाव, पाटस इ. ठिकाणच्या पाटीलक्या विकत घेण्याइतके सधन होते.

त्यांना मालोजी आणि विठोजी ही दोन मुले. मालोजी राजांचा मुलगा शहाजी व शहाजी महाराजांचे पुत्र म्हणजे अखंड महाराष्ट्राचे दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज.

फलटणच्या निंबाळकर घराण्याचा ज्ञात उल्लेख १२४४ पासून सापडतात. 

धारच्या परमार राजावर दिल्लीच्या सुलतानांनी वारंवार हल्ले केले, अशात निंबराज परमार नावाचा एक पुरुष दक्षिणेतील फलटणनजीक शंभु महादेवाच्या रानांत सन १२४४ च्या सुमारास येऊन राहिला. निंबराज ज्या गावी राहिला त्यास निंबळक आणि त्यावरून त्याच्या वंशास निंबाळकर असे नाव पडले.

निंबराजाच्या वंशजांनी पुढे फलटण हे गाव वसविले आणि तेथे ते वतन स्थापन स्थापन करून राहू लागले. 

महंमद तुघलखाच्या काळात त्यांना ‘नाईक’ हा किताब व फलटणची देशमुखी असे दोन्ही मिळाले. पुढे आदिलशाहीत निंबाळकराचे महत्त्व वाढले. निंबराजापासून चौदावे पुरुष वणंगपाळ उर्फ जगपाळराव म्हणून झाले. 

जगपाळराव हे शूर व फौजबंद होते. सन १५६९ च्या सुमारास ते फटलणचा कारभार पाहू लागले.

भोसले प्रत्येक वर्षी चैत्रांत शंभु महादेवाच्या यात्रेस जात. वाटेत त्यांचा मुक्काम फलटणच्या निंबाळकरांकडे असे.

बाबाजी भोसल्यांच्या मालोजी व विठोजी या दोन्ही मुलांनी लष्करी कवायतीचे प्रशिक्षण घेतले होते. आणि ते दोघेही जगपाळराव यांच्या सैन्यात दाखल झाले. भोसले बंधूचा मान आणि हिंमत पाहून दोघांच्यात ॠणानुबंध वाढत गेला.

जगपाळराव आपला प्रदेश वाढवीत होते, त्यात त्यांना मालोजीराजे व विठोजीराजे यांनी बहुमुल्य मदत केली. असे म्हणतात की,

१५९०-९२ च्या सुमारास जगपाळरावांची फौज कोल्हापुरकडील काही प्रांत जिंकून घेत असताना त्यांच्यावर आदिलशहाच्या फौजेने हल्ला केला. तिथेही मालोजीराजे व विठोजीराजे यांनी जगपाळराव यांची बाजू राखली.

पुढे भोसले-निंबाळकर यांच्यात सोयरिक होऊन जगपाळरावांनी आपली मुलगी मालेजीराजे यांना दिली.

याच शहाजीराजे आणि शरीफजी यांच्या आई दीपाबाई होय. मालोजीराजे हे शस्त्रविद्या, घोडेस्वरीत प्रविण होते. ते सिंदखेड राजा इथल्या लखुजी जाधव यांच्या लष्करीत गेले. जाधव हे निजामशाहीतील एक बडे सरदार होते. १६११ मध्ये शहाजीराजे लहान असताना मालोजीराजे इंदापूरमधील लढाईमध्ये मारले गेले.

त्यानंतर जगपाळराव यांच्या मदतीने लहूजी जाधव यांची मुलगी जिजाबाई यांचे लग्न शहाजीराजेंशी झाले.

पुढे शहाजीराजे निमाजशाहीकडून शहाजहान विरुद्धचे युद्ध लढले. त्यांत त्यांना जगपाळराव नाईक-निंबाळकर यांनी मदत केली. याच लढाईमध्ये जगपाळराव १६२९ मध्ये अहमदनगरजवळ मरण पावले.

जगपाळराव यांच्या नंतर त्यांचा मोठा मुलगा मुधोजीराव (दुसरे) फलटणचे अधिकारी झाले.

त्यांची २ लग्न झाली होती. त्यापैकी मोठ्या पत्नीला साबाजीराव व जगदेवराव, आणि धाकट्या पत्नीला बजाजी राव आणि सईबाई अशी मुलं होती. मात्र या सावत्र मुलांमधील गृह कलह वाढून साबाजी व जगदेव हे दोघे घर सोडून आईसोबत विजापुरला निघून गेले.

तिथे त्यांना दरबारामधील अनेक प्रयत्नांनंतर दहिगांव आणि भाळवणी अशी २ हे दोन गांव मिळाली.

या गृहकलहामुळे जहागिरांचे प्रचंड नुकसान झाले.

मुधोजीराव यांच्यावर आदिलशहाची फौज चालून आली; त्यात त्यांचा पराभव झाला. आदिलशहाने त्यांना बंडखोर ठरवून सातारच्या किल्ल्यावर कैदेत ठेवले. यावेळी फलटणची जहागीर जप्त होती.

मुधोजीराजेंनी आपली धाकटी बायको आणि मुले बजाजी व सईबाई यांना साताऱ्याला आपल्याजवळ बोलावून घेतले.

पुढे शहाजी विजापूरच्या दरबारात होते तेव्हा त्यांनी आपला शब्द वापरून मुधोजीराजेंची सुटका केली. या उपकारातून मुधोजीराजेंनी आपली मुलगी सईबाई शिवाजी राजेंना दिली.

शिवाजी राजेंनी स्वराज्य स्थापनेसाठी प्रयत्न चालू केले. या प्रयत्नांना मुधोजी राजे यांचा पाठींबा होता, आणि नेमकी हीच गोष्ट विजापूरच्या दरबारास रुचत नव्हती. त्यामुळे ते मुधोजीराजेंवर लक्ष ठेवून होते.

अशातच आपल्या नंतर फलटणचा कारभार धाकट्या पत्नीचा मुलगा बजाजीला मिळावा अशी मुधीजींची इच्छा होती. ही गोष्ट त्यांच्या मोठ्या पत्नीची मुले साबाजीराव व जगदेवराव यांना कबुल नव्हती. आणि ते विजापुरची मदत घेऊन मुधोजी राजेंवर चालून आले.

शिरवळ जवळच्या भोळीमध्ये बाप-बेट्यामध्ये लढाई होऊन मुधोजीराजे एका वडाच्या झाडाखाली दोन्ही पुत्रांच्या हातून मारले गेले. (त्यास आता बापमारीचा वड असे म्हणतात.)

यानंतर बजाजीस कैद करून विजापुरला नेले. तेथे बापाच्या अपराधाबद्दल बजाजीरावांना जीवे मारण्याची आज्ञा झाली. परंतु तिथे घाटगे, माने आणि घोरपडे या प्रतिष्ठीत सरदारांनी मध्यस्थी केली. आणि त्यांची शिक्षा रद्द झाली.

परंतु तेव्हा त्यांच्यासमोर धर्मांतराची अट ठेवण्यात आली. फलटणची जहागीर मिळणार असेल आणि आदिलशहाची कन्या रोशनबेग हिच्याशी लग्न होणार असेल तर आपण मुसलमान होण्यास तयार आहे असे त्यांनी सांगितले. त्यानुसार बजाजी मुसलमान झाले.

पुढे बजाजी काही काळ विजापुरमध्ये राहिल्यावर देशमुखीचे फर्मान घेऊन फलटणमध्ये आले.

(फलटणमध्ये आजही बजाजी यांची समाधी (घुमट) आहे.) पुढें जिजाऊनी शंभु महादेवाच्या देवळांत त्यांचे शुद्धीकरण करून आणि प्रायश्चित्त देऊन परत मराठा जातीत घेतले आणि त्यांचा मुलगा महादजी यांना शिवाजी राजेंची मुलगी सखूबाई दिली.

महादजी हा शिवाजीराजेंचा जावई असून त्यांचा एक सरदार होता. तसेच राजेंनी मौजे वाल्हे (जिल्हा पुणे) येथील पाटिलकी जावयास आंदण दिली होती. पण ते बहुतांश वेळेला कर्नाटकमध्येच असायचे.

संभाजीराजेंनाही त्यांची चांगली मदत झाली. संभाजी राजेंच्या पश्चाच औरंगझेबाने महादजी आणि सखुबाई यांना पकडून ग्वाल्हरीच्या किल्ल्यावर जिवंत असेपर्यंत कैदेत ठेवले.

हा इतिहास इथेच थांबत नाही.

पुढे शिवाजी राजेंच्या मृत्युनंतरही भोसले नाईक-निंबाळकर घराण्यात सोयरिक दिसून येते. महाद्जींचा पुत्र बजाजी (दुसरे) हे सन १७७४ पर्यंत जिवंत होते.

महादजी यांचा धाकटा भाऊ मुधोजी. त्यांचा मुलगा बजाजी (तिसरा) यांना राजाराम छत्रपतीची मुलगी सावित्रीबाई दिली होती.

आज अडीचशे-तीनशे वर्षानंतर जरी या दोन्ही घराण्यांमधील त्यांचे वारसदारांमध्ये राजकारणामुळे एकमेकांच्यात वादाचे संबंध तयार झाले असतील. पण एकमेकांप्रती कौटुंबिक आणि राजकारणातील मदतीचा हा गौरवशाली इतिहास काळाच्या ओघात आजही अजरामर आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.