म्हणून भुजबळांनी दिवाळी फराळाच्या बॉक्समध्ये मनोहर जोशींना कांदे पाठवले होते

छगन भुजबळ आणि मनोहर जोशी. दोघेही ऐकेकाळचे शिवसेनेतील सहकारी आणि कट्टर शिवसैनिक. मनोहर जोशी शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत. तर भुजबळ यांनी भाजीपाला विक्रेत्यापासून राजकारण्यापर्यंत मजल मारली होती. नगरसेवक, महापौर ते आमदार असा भुजबळांचा प्रवास.

भुजबळ हे मुळचे आक्रमक स्वभावाचे.

त्यामुळे एक काळ असा होता की शिवसेना म्हणजे छगन भुजबळांची आक्रमकता. अमरावतीमधील दुर्गा पुजेवरुन झालेल्या दंगलीला त्यांनी नागपुर अधिवेशनात वाचा फोडली होती. यावेळी त्यांचा राग उभ्या महाराष्ट्राने पाहिला होता.

त्यानंतर १९८६ मध्ये कर्नाटकमध्ये सीमाप्रश्न पेटला होता, त्यावेळी छगन भुजबळांचं नाव एका वेगळ्याच कारणामुळे देशभरात गाजले. त्यावेळी महाराष्ट्रातल्या नेत्यांना कर्नाटकमध्ये प्रवेशबंदी होती. पण भुजबळ मात्र व्यापाऱ्याचा वेश करून बेळगावात अवतरले.

बुल्गानिन दाढी, डोक्यावर फेल्ट हॅट, पांढऱ्या रंगाचा कोट आणि हातात पाईप अशा वेशात कानडी पोलिसांना गुंगारा देऊन ते थेट बेळगावमधल्या एका ग्राउंडवर आले. त्यांनी तिथे भाषण ठोकून मराठी भाषिकांची मनं जिंकली. त्यातच त्यांना अटक करण्यात आली.

त्यांच्या या ‘कामगिरी’नंतर बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या मेळाव्यात त्यांचा सत्कारही केला होता.

तर मनोहर जोशी काहीसे ‘थंडा करके खावो’ असे शांत डोक्याने काम करणारे. शिवसेनेत शांतीत क्रांती करणारे नेते अशी ओळख. भुजबळ शिवसेनेत असातना दोघांचेही संबंध तसे चांगले होते. पण १९९१ मध्ये विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदी बाळासाहेबांनी जोशींची नियुक्ती केली आणि वितुष्ट आले.

दोघांच्यातील मतभेद वाढतं गेले आणि १९९१मध्ये भुजबळांनी शिवसेना सोडत कॉग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा उल्लेख लखोबा म्हणून केला. शिवसैनिकांनी तर त्यांच्या नावापुढे गद्दार असे विशेषणच जोडले. मात्र कॉंग्रेसमध्ये गेल्यावर देखील त्यांची आक्रमकता कायम होती.

गोष्ट १९९८ च्या दिवाळीमधली आहे.

कांद्याच्या दराने त्याकाळात ४५ रुपयांचा आकडा गाठला होता. या वाढलेल्या दराने जनता हैराण होती. ऐन दिवाळीत कांद्याने डोळ्यातून पाणी काढले होते. त्यावेळी युती सरकार सत्तेत होते, आणि मुख्यमंत्री होते शिवसेनेचे मनोहर जोशी.

विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने या वाढलेल्या दारावर सरकारला निशाणा बनवले. आंदोलन आणि टिकांनी सरकारला अक्षरशः जेरीस आणले. विरोधातील आमदारांनी मुख्यमंत्री जोशींना घेरायला सुरुवात केली. यात आघाडीवर होते काँग्रेसचे नेते छगन भुजबळ. ते रस्त्यांवर तर आक्रमक आंदोलन करत होतेच पण त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टिका करण्यासाठी एक नवीनच शक्कल लढवली.

दिवाळीच्या दिवशी गोड-धोड आणि मौल्यवान पदार्थ भेट म्हणून पाठवायची प्रथा असते. भुजबळांनी नेमके हेच हेरले.

त्यांनी मुख्यमंत्री असलेल्या मनोहर जोशींना कांद्याने भरलेला एक डब्बा दिवाळीला भेट म्हणून पाठवला.  आणि त्यावर लिहिले,

दिवाळीत आपल्या आप्तेष्टांना गोड-धोड आणि मौल्यवान वस्तू भेट द्यायच्या असतात. यावेळी कांद्याच्या किमती जास्त आहेत, आणि त्यामुळे तीच मौल्यवान गोष्ट मानून मी तुम्हाला भेट म्हणून पाठवत आहे.

मनोहर जोशींना यातून राजकीय संदेश मिळायला वेळ लागला नाही. यानंतर जोशींनी ४५ रुपये किलोच्या कांद्याना १५ रुपये प्रतिकिलो किमतीने रेशनींगच्या दुकानावर विकायला सुरुवात केली.

पुढे जोशींनी भुजबळांच्या या कृतीचा इतका धसका घेतला होता की, त्यानंतर त्याचवर्षी जोशींनी मंत्रालयासमोर एक बोर्डच लावला होता. त्यात साखर, गहू, तांदूळ अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले नसल्याचे सांगितले होते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.