भूकंपानंतर उध्वस्त शहरं पुन्हा कशी उभी राहतात हे सांगतं मोदींचं ‘भुज’ मधलं ‘गुजरात मॉडेल’

तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या मनुष्यहानी, वित्तहानी मन हेलावून टाकतेय.  देशात १६ हजारांहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडलेत. शहरणांमध्ये तर केवळ जमीनदोस्त झालेले इमारतींचे ढिगारे दिसत आहे. अगदी चार दिवसांपूर्वीच संपन्न असणारी शहरं आता बकाल झालेत. त्यामुळे ही शहरं आता पुन्हा उभा राहणार का ? या शहरांना पुन्हा संपन्नता मिळवता येणार का? या शहरणांमध्ये पाहिल्यासारखं जीवनमान कसं सुरु होणार असा प्रश्न पडतो?

मात्र या असा संकटांना तोंड देऊन मानवजात अनेकदा उभारी घेते आणि पुन्हा आपल्या जीवनाला सुरवात करते. याची अनेक उदाहरणे जगात सापडतात. त्यातालचे एक गुजरातमधील भुजचं उदाहरण.

भुजचा भूकंप किंवा कच्छचा भूकंप म्हणून या घटनेला ओळखलं जातं. सगळ्यात भीषण आणि न विसरता येणारी घटना म्हणून त्याकडे बघितलं जातं. आजही नाव काढलं तरी अंगावर काटे येतात. मात्र प्रत्यक्षात आता त्या भूकंपाच्या ठिकाणी गेलात तर परिसर बघून कधीकाळी याच ठिकाणी भयंकर भूकंप आला होता हे तुम्हाला सांगितलं तरी विश्वास बसणार नाही. 

म्हणूनच नक्की २००१ चा भूकंप कसा होता? आणि त्यानंतर आज भुजने स्वतःचं चित्र कसं बदललं आहे? हे बघणं महत्वाचं ठरतं… 

२००१ चं साल होतं. दिवस होता २६ जानेवारी. अक्खा भारत प्रजासत्ताक दिन साजरा करत होता आणि अचानक अशी एक बातमी आली की सगळा देश हादरला आणि लक्ष लागलं ते फक्त गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील ‘भुज’कडे. त्याच दिवशी सकाळी ८.४५ च्या सुमारास भूजमध्ये भीषण भूकंप आला होता. 

७.७ तीव्रतेच्या या भूकंपाची भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण भूकंपाच्या लिस्टमध्ये एंट्री झाली. या भूकंपाने जवळपास ३.७८ कोटी लोकांच्या आयुष्यावर परिणाम केला होता. यात २० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता तर जवळपास १ लाख ६६ हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते. सोबतच सुमारे ६ लाख लोक बेघर झाले होते, कच्छमधील ४५० गावांचा नायनाट झाला होता. 

भूकंपाचा परिणाम सुमारे ८ हजार गावांमध्ये दिसून आला. भुज सोडून इतर गावांमध्ये अनेक लोकांची घरं, शाळा, रस्ते सगळं जमीनदोस्त झालं. भूकंपानंतर देखील काही दिवस धक्के जाणवतच होते. 

अशा या भूकंपानंतर गुजरातला परत पूर्वपदावर येण्यास अनेक वर्षे लागतील, असं अनेकांना वाटत होतं पण २० वर्षांत गुजरातने भुजचं चित्र बदलून टाकलं आहे. आपत्तीनंतर भूजमधील विकासाचा वेग अभूतपूर्व वाढला. हे शहर आता ५६ चौरस किमीमध्ये पसरलेलं आहे. 

२००१ मध्ये त्याचा आकार जेवढा होता त्याच्या जवळजवळ चौपट आता भुज झालं आहे. 

कसं?

भूजच्या पुनर्बांधणीत गुजरातचा रिकन्स्ट्रक्शन दृष्टिकोन महत्वाचा ठरतो. ‘गुजरात रिकन्स्ट्रक्शन मॉडेल’ म्हणून त्याला बघितलं जातं. २०१५ मध्ये नेपाळमध्ये झालेल्या भूकंपानंतरच्या पुनर्बांधणीपासून ते २००५ च्या काश्मीर भूकंपापर्यंत मोठ्या प्रमाणात गुजरात मॉडेलच वापरलं गेल्याचं दिसतं.

भूकंपानंतर लगेच जगभरातून मदत मिळाली, त्यातला बराचसा भाग परदेशात राहणाऱ्या गुजराती समाजाकडून येत होता. सुमारे १३० दशलक्ष डॉलर्सची मदत भुजला करण्यात आली होती.

त्यात भर पडली ती २००१ मध्येच गुजरातचे मुख्यमंत्री झालेल्या नरेंद्र मोदी यांची. मोदींनी भुजच्या पुनर्बांधणीच्या मॉडेलकडे भारत सरकारचं लक्ष वेधलं. भारत सरकारने या दुर्लक्षित प्रदेशावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. 

या संकटाच्या काळात मदत करण्यासाठी लष्कराला पाठवण्यात आलं, पुनर्बांधणीच्या २ अब्ज डॉलर्स निधीचं वाटप संपूर्ण प्रदेशात करण्यात आलं. मदतकार्य  आणि सरकारी अनुदानाचा प्लॅनिंगनुसार उपयोग करण्यात आला. भूकंपानंतर पहिल्या दोनच वर्षांत जवळपास सगळ्या नुकसानग्रस्त गावांची पुनर्बांधणी करण्यात आली.

भुज जवळचं मिठपाश्वरिया हे एक छोटंसं गाव आहे, जे पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. यूकेकडून आलेल्या मदतनिधीच्या आधारे ते पुन्हा उभारण्यात आलं. 

भूकंपानंतर काही दिवसांतच तंबूंमध्ये तात्पुरती आरोग्य केंद्रं सुरू करण्यात आली. आरोग्य सेवा आणि रोगांवर पाळत ठेवण्यासाठी भुजमध्ये प्री-फॅब्रिकेटेड रचनेत सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली. रोगांचा उद्रेक रोखण्यासाठी जीआयएस-आधारित रोगनिरीक्षण ही यंत्रणा उभारण्यात आली जेणेकरून रोगांची पूर्व चेतावणी देता येईल. 

राज्य सरकारने २००१ च्या भूकंपादरम्यान पूर्णपणे कोसळलेल्या कच्छचं जिल्हा रुग्णालय, जी. के. जनरल हॉस्पिटल यांची पुनर्बांधणी केली. बेस आयसोलेशन टेक्निक चा वापर करून बांधण्यात आल्या होत्या. ही एका स्ट्रक्चरल टेक्निक असते जिचा वापर करून इमारतींना भूकंपरोधक बनावता येतं.

नवीन बांधकामाकडे जास्तीत जास्त लक्ष देण्यात आलं. फक्त इमारतीच नाही तर रस्त्यांच्या बांधकामाकडे विशेष लक्ष देत त्यांच्या रुंदीकरणाला भर देण्यात आला. २०११ पर्यंत भूजमध्ये दोन नवीन रिंग-रोड, एक विमानतळ, उद्याने आणि आणि रस्त्यांच्या बाजूला मोठमोठी दुकाने, शोरूम्स उभे राहिले होते. 

प्रदीप शर्मा या सरकारी अधिकाऱ्याला या विकास कामांसाठी श्रेय देण्यात आलं होतं. रस्त्यांचं रुंदीकरण, पाणीपुरवठा यंत्रणा आणि भूमिगत ड्रेनेज सिस्टम तयार करण्यात आली होती. उभा राहिलेल्या कामांतून अजून पुनर्बांधणीची कामं हाती घेण्यात आली. भारत सरकारने नवीन टॅक्स-फ्री झोन तयार केल्यामुळे हे सुरू सर्व सुरु झालं होतं आणि परिणामी खासगी गुंतवणूकीत तेजी निर्माण झाली.

भूकंपाच्या पुढच्या १० वर्षांत म्हणजे २०११ पर्यंत १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक भूजमध्ये करण्यात आली होती. सुमारे ३०० कंपन्यांनी कच्छमध्ये त्यांचे व्यवसाय स्थापित केले होते आणि गुंतवणूकदारांची संख्या वाढतच होती. 

मुंद्रा हे कच्छमध्ये झालेल्या विकासाचं उदाहरण म्हणून बघता येईल. भूकंपापूर्वी मिठागारांनी वेढलेलं मासेमारीचं ते छोटस बंदर होतं. आता हे भारतातील असं एक औद्योगिक केंद्र बनलं आहे जिथून दररोज शेकडो टन मालाची ने-आण होते. 

याच बंदरामुळे अदानी समूहाची वॅल्युशन २०११ पर्यंत ७ अब्ज डॉलर इतकी झाली होती. त्यांनी ऑस्ट्रेलियातील कोळसा खाण खरेदी केली होती आणि कंटेनर्सच्या मार्फत तो कोळसा भारतात आणून देशातील सर्वात मोठ्या वीज केंद्राला तो पुरवला जात होता. हे शक्य झालं ते कच्छच्या भूकंपानंतर त्याभागात झालेल्या औद्योगिक विकासामुळे.

भूकंपाच्या ठिकाणाच्या आजूबाजूच्या गावांमध्ये पारंपरिक कलाकुसरीचं काम लोक करायचे. नोकऱ्यांचं साधन नसल्यामुळे त्यांना अशाच स्थानिक व्यवसायावर पोट भगवावं लागायचं. ज्याला शक्य होईल ते हा भाग सोडून बाहेर जात नोकरी करायचे. मात्र इंडस्ट्रियलायजेशनमुळे हजारो नव्या नोकऱ्या, व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या. 

सुषमा ओझा या अशाच साध्या कामगार होत्या ज्या आता अदानी फाऊंडेशनच्या प्रमुख आहेत.

भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या अंजार शहराजवळ जगातील सर्वात मोठा टॉवेलचा कारखाना वेलस्पनने अवघ्या नऊ महिन्यांत उभारला. इथे दिवसाला २,५०,००० टॉवेल यंत्राद्वारे विणले जातात. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यामुळे कच्छची निवड करण्यात आली असं वेलस्पनचे अध्यक्ष बालकृष्ण गोएंका सांगतात. 

पहिली पाच वर्षे स्थानिक कर नव्हता आणि उत्पादन शुल्कही नव्हतं. सरकारला अप्रत्यक्ष करही द्यावा लागत नव्हता. त्यांना पाच वर्षांसाठी सूट देण्यात आली होती, अशी माहिती गोएंका यांनी देतात. म्हणूनच टॉवेल फॅक्टरीच्या बाजूला वेलस्पन स्टील प्लांटही उभारण्यात आला. 

अशाप्रकारे कंपन्यांना कच्छकडे आकर्षित करण्यासाठी सवलती देण्यात आल्या आणि परिणामी भूकंपानंतर कच्छमध्ये फक्त १० वर्षांत १ लाख १०,००० हून अधिक नवीन रोजगार निर्माण करण्यात आले होते. लवकरच नर्मदा नदीतून ४०० किमी पाण्याची पाइपलाइन झाल्याने रोजगाराच्या संधी वाढत गेल्या.

सरकारी योजनांच्या आधारे झालेल्या घरांच्या बांधकामामुळे भूकंपाआधी भाड्याने राहणाऱ्या अनेकांना स्वतःची घरं मिळाली. गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणही कच्छच्या पुनर्वसनातील महत्त्वाची संस्था म्हणून उदयास आली. अग्रगण्य स्वयंसेवी संस्था,आयआयटी आणि सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट प्लॅनिंग सारख्या नामांकित संस्थांचा या पुनर्वसनाच्या प्रक्रियेत समावेश करण्यात आला.

कच्छच्या पुनर्वसनासाठी ४,०७० कोटी रुपये खर्च करण्यात आले असून ४०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम एकट्या भूजला गेली आहे.

आज भूजमध्ये उंच अपार्टमेंट्स, सुपरमार्केट, ब्युटी सलून, मनोरंजन केंद्रे, रुंद चार पदरी महामार्ग, आधुनिक भूकंपरोधक रुग्णालय आणि कार्यान्वित विमानतळ तुम्हला दिसतील. जागतिक तज्ञ, पत्रकार, कॉर्पोरेट्स आणि प्रत्येक संप्रदायाचे धार्मिक गट आज भूजमध्ये राहतात. विकास बँका आणि राज्य सरकारांनी पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. जमीन ही तर एक महत्वाची गुंतवणूक बनली आहे.

हॉटेल्स आणि सायबर कॅफेमध्ये हिंदी बोलली जाते जेणेकरून स्थलांतरितांना या भागात जास्त आकर्षित करण्यात येईल. भूकंपापूर्वी अनेक लोकांना कच्छ सोडून परदेशात स्थायिक व्हावं लागत होतं तर २००१ च्या भूकंपाने हजारो लोक या प्रदेशात आले. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.