बाळासाहेबांनी फक्त बोट केलं आणि नगरसेवकानं “मास लिडर भुजबळांना” पाडलं..

भुजबळ गेले तेव्हा लोकं म्हणाली सेना संपली. सेनेला भगदाड पडलं. बाळासाहेबांचा हात निखळला. भुजबळांनी सेनेला सुरूंग लावला. गद्दार म्हणून भुजबळांचा उल्लेख करण्यात आला. भुजबळ एकूण १२ जणांना घेवून बाहेर पडलेले.

पण भुजबळ पण साधे नव्हते. १२ जणांना घेवून जाणारे भुजबळ साधे तरी कसे असतील. भुजबळ कधीकाळी मुंबईचे महापौर राहिले होते. माझगाव मतदारसंघातून ते प्रतिनिधित्व करत होते. ते आमदार होते. विरोधी पक्षाचे नेते होते. त्याचं मुळ जरी नाशिकचं असलं तरी नाशिकमध्ये त्यांच स्वत:च अस काहीच नव्हतं. जे काही होतं ते मुंबईतच.

पक्षांतर करून भुजबळ कॉंग्रेसमध्ये गेले. त्यांच्या डोक्यावर थेट शरद पवारांनी हात ठेवला. चोवीस तास पोलीस सरंक्षणाखाली भुजबळ राहू लागले. पण इकडे लखोबा लोखंडे यांना हरवायचंच हा पण शिवसैनिकांनी घेतला होता. 

पक्षांतर बंदीतच भुजबळांची आमदारकी घालवण्याचा प्लॅन होता. पण तत्कालीन विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्यामुळे भुजबळांसह इतरांची आमदारकी वाचली. पण याचवेळी शिवसैनिकांनी एक पण केला तो तो म्हणजे,

या गद्दारांना पण विधानसभेत पाय ठेवून द्यायचा नाही..

वेळ गेली आणि १९९५ च्या निवडणूका लागल्या..

भुजबळांचा मतदारसंघ होता माझगाव. याच मतदारसंघातून भुजबळ कॉंग्रेसकडून मैदानात उतरणार होते. भुजबळांच्या विरोधात बाळासाहेब कोणीतरी तुल्यबळ प्रतिस्पर्धी देतील असा अंदाज होता. कारण भुजबळांना निवडणूकीत पाडणं देखील कठिण होतं..

बऱ्याच चर्चा झडल्या. माजी महापौर, आमदार अशांची नावे चर्चेत आली. कारण भुजबळांना पाडायचं होतं..

उत्सुकता ताणली गेली आणि बाळासाहेबांनी बोट केलं एका नगरसेवकाकडे…

तो नगरसेवक होता बाळा नांदगावकर..

भुजबळांना फक्त पाडायचं नव्हतं तर बदला घ्यायचा होता. अशा वेळी भुजबळांसमोर बाळासाहेबांनी बाळा नांदगावकरांना उमेदवारी दिली. बाळा नांदगावकर.. एक साधा नगरसेवक मनी पॉवर नाही की मसल पॉवर नाही. पण बाळासाहेबांनी पक्क केलतं. बाळासाहेबांच मत होतं की भुजबळला माझा एक नगरसेवक देखील बास आहे..

बाळा नांदगावकरांच तेव्हा वय होतं फक्त ३७ वर्ष. नाही म्हणायला ते चांगल काम करत होते चर्चेत होते पण थेट भुजबळांना पाडावं इतकं काही नव्हतं. भुजबळ निवडून येतील असे आडाखे सर्वांनीच बांधले.

गेल्या दोन टर्म भुजबळांनी हा मतदारसंघ मारला होता. मागच्या गतवेळी भुजबळांनी ७ हजारांच मताधिक्य घेतलं होतं आणि त्यांच्यापुढे शिवसेनेकडून साधा नगरसेवक लढत होता. राज ठाकरे तेव्हा विद्यार्थी संघटनेत काम करत होते. राज यांनी बाळा नांदगावकरांना मदत केली. बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर अशी प्रचारसभा रंगत गेली..

निकाल लागला आणि,

बाळा नांदगावकरांनी १२ हजार २७५ मतांची आघाडी घेतली. भुजबळांना २९ हजार मतं पडली तर बाळा नांदगावकरांना ४१ हजार मत पडली. भुजबळांसारख्या मास लिडरला एका नगरसेवकाने अस्मान दाखवलं. त्यानंतर राज्यभर बाळा नांदगावकरांची चर्चा सुरू झाली.

या निवडणूकीचा निकाल म्हणजे त्यानंतर परत कधी भुजबळांनी मुंबईतून निवडणूक लढवण्याचा विचार पण केला नाही. ते कायमचे नाशिकला शिफ्ट झाले..

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.