भूसंपादन कायद्याच्या जन्माची गोष्ट..

जगदीश कदम हे जेष्ठ लेखक आहेत. साहित्यिक असणारे जगदीश कदम नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाचे मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. त्यांनी आपल्या फेसबुकवर भूसंपादन कायदा कसा मंजूर झाला होता त्याचा किस्सा लिहला आहे.
त्यांनी लिहलेला हा किस्सा त्यांच्याच शब्दात.
भूसंपादन कायद्याच्या जन्माची गोष्ट..
नांदेडहून पुण्याकडे जाताना सुप्याहून गाडी पारनेरकडे वळवावीच लागते. पारनेर हे साहित्यिक गणगोताचं हक्काचं ठिकाण. भाकरीचा पूर्णवादी सिध्दांत मांडणाऱ्या पारनेरकर महाराजांचं हे गाव. काही दिवसांपूर्वी आम्ही याच मार्गे पारनेरला पोहचलो.
मातोश्री प्रतिष्ठान तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पारनेर शाखेचे अध्यक्ष मित्रवर्य दिनेश औटी उर्फ बापू यांनी आमचं आत्मीय स्वागत केलं. सुप्याकडून राळेगण सिध्दीकडे जाताना गावाच्या अलिकडेच दिनेशदादा यांचे घर आहे. दिनेशदादा या भागात बापू नावानं परिचित.
यशवंराव चव्हाण हा बापूंचा आस्था विषय. भूमी संपादन कायद्याच्या संदर्भात यशवंतरावानी जे कर्तृत्व दाखवलं त्याविषयीची बापूंनी सांगितलेली हकीकत सांप्रत राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.
यशवंरावजी देशाचे संरक्षणमंत्री असतानाची ही हकीकत. नगर जिल्ह्यात कुठल्याशा कार्यक्रमनिमित्त ते आले होते.
एका खेड्यात कार्यक्रम. त्यांना ओवाळण्यासाठी गावातल्या सुवासिनी हातात कुंकवाचे करंडे घेऊन सज्ज असतात. संरक्षणमंत्री असल्यामुळे भक्कम सुरक्षाकवच. यशवंतरावजी आल्याबरोबर सुवासिनी त्यांना ओवाळणार तेवढ्यात एक वयस्कर स्त्री वाऱ्याच्या वेगाने तिथे येते. एका सुवासिनीच्या हातातील तबक हिसकावून घेते..
झटापटीत सगळं कुंकू यशवंतरावांच्या सदऱ्यावर पडतं..
हे पाहून सुरक्षा कवच त्या महिलेला प्रतिबंधित करण्यासाठी सरसावतं. यशवंतरावजी खुणेनंच त्यांना रोखतात. त्या महिलेची चौकशी करतात.
“रागवू नकोस माऊली. मी उद्या तुला भेटायला येतो. तुझा हा त्रागा कशासाठी आहे, मला सांग. आता माझ्याकडं वेळ नाही.”
असे सांगतात आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी जातात.
यशवंतरावजी शब्द बदलणारे राजकारणी नव्हते. त्यांनी त्या सामान्य महिलेला दिलेला शब्द पाळला.
दिलेल्या शब्दप्रमाणे उद्या सकाळी कलेक्टरला घेऊन त्या महिलेच्या गावी पोहचतात. तिचं दुखणं काळजीपूर्वक ऐकून घेतात. त्या माऊलीची जमीन तलावात गेलेली. त्या धक्क्यानं मालकाचा मृत्यू झालेला. घरची परिस्थिती बिकट. घरात लग्नाचा मुलगा. जमीन गेल्यामुळे कुटुंब भूमीहिन होणार या धारणेनं त्या मुलाला मुलगी द्यायला कोणी तयार नाही.
जमीन गेली. मोबलला नाही. तो मिळणार की नाही माहीत नाही. साहेब आम्ही जगायचं कसं. त्या माऊलीचं गाऱ्हाणं ऐकून यशवंतरावजींचे डोळे पाणावतात. ते कलेक्टरला तिथल्या तिथे सूचना करतात.
आठ दिवसात अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन दिल्लीला यायला सांगतात.
कलेक्टर आणि सर्वसंबंधीत अहवाल घेऊन अन्यायपिडितांसह दिल्लीला येतात. सरकारी कामासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या प्रश्नाचे स्वरूप नेहरूंना समजावून सांगतात.
पंतप्रधान असलेल्या पंडितजींना ग्रामस्थांची कैफियत त्यांच्याच तोंडून ऐकायला लावतात. पंडितजी हा सगळा प्रकार सुन्न होऊन ऐकतात.
आणि जन्माला येतो एक नवा भूसंपादन कायदा. शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घ्यायची असेल तर आधी योग्य मोबदला द्या आणि मगच जमीन संपादन करा. देशाच्या इतिहासातील हा क्रांतीकारी निर्णय. हा इतिहास आहे.
यशवंतरावजींचे हे काम ऐतिहासिक आहे.
बापूनं सांगितलेली ही हकीकत. भूसंपादन कायद्यात यशवंतरावजींचं काम किती थोर आहे याची प्रचिती आणणारी. आज शेतकऱ्याची जमीन ताब्यात घ्यायची असेल तर सगळे कायदेशीर सोपस्कार पाडावे लागतात. याचे श्रेय अर्थातच यशवंतरावजींकडे जाते. म्हणून आधुनिक महाराष्ट्राचा हा शिल्पकार थोरच.
– जगदीश कदम यांच्या फेसबुक पेजवरून साभार.
हे ही वाच भिडू
- यशवंतराव मोहित्यांच्या पत्नीने आयडिया सुचवली आणि बाळासाहेबांना कलानगर मिळाले
- फक्त चांगुलपणा पायी यशवंतराव चव्हाणांनी दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी गमावली.
- आर.आर.पाटील आणि यशवंतराव चव्हाणांचा एक अफलातून किस्सा…