चेष्टा नाय, अभिजित बिचुकलेंमुळे साताऱ्याला थेट आंध्रमधून ईव्हीएम मशीन मागवावे लागले होते.

अभिजीत बिचुकले. आपल्या सातारा जिल्ह्यातील सगळ्यात फनी पण तेवढचे जिद्दी व्यक्तीमत्व. जिद्दी एवढ्यासाठी की २००४ पासून नगरपालिका ते देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपर्यंत त्यांनी नशीब आजमावले आहे.

पण त्यांनी लढवलेल्या सगळ्या निवडणूका ते हारले. पण त्यानंतरही आजतागायत त्यांनी जिद्द सोडलेली नाही.

पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले बिचुकले सातारा नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते. पण सतत गैरहजर म्हणून त्यांना सेवेतुन कमी करण्यात आले. त्यानंतर गेली काही वर्षं ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

२०१९च्या लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागा लढवणार असल्याचे बॅनर सगळ्या साताऱ्यात लावल होते. २०१९चा मुख्यमंत्री मीच ठरवणार असेही या बॅनरवर लिहिले होते.

यानुसार त्यांनी छ. उदयनराजे आणि अगदी आदित्य ठाकरेंच्या विरोधात निवडणूक लढवली. पण इथेही त्यांचा पराभव झाला.

त्यानंतर २०२० मध्ये त्यांनी पुन्हा  पराभवातुन उठून पुणे पदवीधर निवडणूकीसाठी आपला अर्ज भरला. निवडणुकीचा निकाल काही बिचुकलेंसाठी बदलला नाही.

आता परत एकदा त्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. कसबा पोटनिवडणूक ते लढवणार आहेत. यावेळी मात्र त्यांच्या उमेदवारी अर्जापेक्षा जास्त चर्चा झाली ती काल त्यांनी केलेल्या राड्याची. राडा केला तोही थेट पत्रकारांसोबत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी अर्वाच्च भाषेचा वापर केला. त्यामुळे, पत्रकारही नाराज झाले आणि तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरांतून बिचुकलेंवर टीका केली जातीये.

आजवर त्यांनी राजकारणात जितकी जिद्द बाळगली तितक्या जिद्दीने जर त्यांनी एमपीएससी केली असती तर कधीच पोस्ट काढून रिकामे झाले असते.

पण बिचुकले जसे त्यांच्या विरोधकांचे निवडणूकीतील गणित चुकवण्यासाठी आणि घाम फोडण्यासाठी ओळखले जातात अगदी तसेच ते जिल्हा प्रशासनाचे निवडणूकीचे गणित चुकवण्यासाठी ओळखले जातात.

दहा वर्षांपूर्वीचा हा किस्सा आहे. २००९ च्या लोकसभा निवडणूकीत सातारा लोकसभा मतदारसंघात छ. उदयनराजे विरुद्ध अभिजीत बिचुकले अशी लढत होती.

निकालानंतर विजयी होवून छ. उदयनराजे पहिल्यांदाच खासदार झाले.

यानंतर या निकालावर आक्षेप घेत बिचुकलेंनी न्यायालयात एक याचिका दाखल केली. आणि त्यात सुनावणीवेळी लोकसभेचे इव्हीएम पुन्हा न वापरण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.

बिचुकलेच्या निकालाविरोधातील एका तक्रारीमुळे जिल्हा प्रशासनाचे निवडणुकांचे संपुर्ण गणित कोलमडले होते.

न्यायालयाच्या या आदेशानुसार सर्व ईव्हीएम आणि त्यातील अंतर्गतप्रणाली सुरक्षा यंत्रणेच्या देखरेखीखाली ठेवावी लागणार होती.

याच दरम्यान, तत्कालीन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या पत्रकार परिषदेत

‘उदयनराजेंच्या विरोधात अभिजित बिचुकलेंनी दाखल केलेल्या याचिकेचे काय झाले,’

असा सवाल पत्रकारांनी विचारला. त्यावर ‘अभिजित बिचुकलेंमुळे जिल्हा प्रशासन ‘चुकले’, अशी कबुलीच त्यांनी दिली.

कारण लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार होत्या आणि तातडीने दुसरे ईव्हीएम उपलब्ध करणे अवघड होते.

परिणामी सातारा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघासाठी आंध्रप्रदेशहून ईव्हीएम मागवून घ्याव्या लागल्या होत्या.

असे हे अभिजित बिचुकले आता फक्त सातारा जिल्ह्यालाच नव्हतेर महाराष्ट्राला कळून चुकले आहेत. कवी मनाचा नेता, राजकारणी ते बिग बॉसचे स्पर्धक अशा अनेक रुपात आपण त्यांना ओळखतो. त्यामुळे आता या निवडणूकीत ते कोणाला घाम फोडतात पाहू.

माहिती संदर्भ : दै. पुण्यनगरीचे वरिष्ठ वार्ताहर मोहन मस्कर पाटील.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.