अन् रशियन तरूणीनं चक्क बीडच्या आमदाराच्या मिशीचा मुका घेतला!

1972 चा काळ होता. देशात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता होती. बीडमध्ये कम्युनिस्टांचे प्राबल्य वाढत होतं. या कम्युनिस्टांना काँग्रेसच्या नेत्यांनी शह दिला होता. त्या शह देणाऱ्या नेत्यात आघाडीवर होते बाबुराव आडसकर.

पिळदार मिश्या, रांगडं शरीर, गावरान बोलीभाषा. डोक्यावर टोपी. बोलणं चतुराईचं पण मिश्कील, डोळ्यात करारीपणा, कमी शिकलेला पण प्रश्नांची अचूक जाण असणारा, भल्या भल्यांना आडवा करणारा असा अस्सल जातीवंत मराठा गडी म्हणजे बाबुराव अडसकर.

1972 ला दुष्काळ पडलेला. बाबुराव आडसकरांना जनसामान्यांची जाण होती.

तळागाळातले प्रश्न माहीत होते. त्यामुळे दुष्काळात राब राब राबून आडसकरांनी लोकांचे प्रश्न सोडवले. अनेकांच्या हाताला दुष्काळात कामं दिली. अनेकांचे संसार तारले, पोरा-बाळांना जगवलं.

त्याच्या बोलण्यात गावरान गोडवा होता. त्यामुळे जनसामान्यांशी त्यांची नाळ अजूनच घट्ट झाली. पंचायत समितीचा सभापती असतांना केलेल्या कामांचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. त्यामुळे 1972 च्या विधानसभेची काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली.

बाबुराव आडसकरांच्या विरोधात समाजवादी पार्टीचे बापू काळदाते होते. बापूच्या सभेला हजारोंची गर्दी व्हायची. बैलगाड्या सजवून लोक बापूचे भाषण ऐकायला यायची. मात्र बाबुराव अडसकरही फर्डै वक्ते होते. ते पारा-पारावर जात आपल्या अस्सल गावरान रांगडी भाषेतून भाषत ठोकत.

‘औंदा हाबाडा देणारच, विरोधकांचा टांगा पलटी करायचाच, मतदारसंघाचं टिकूर माझ्या हाती द्या मंग दाखवतो विकास’

अशा धडकी भरवणाऱ्या भाषणाला लोकांचा उत्स्फुर्द असा प्रतिसाद मिऴत गेला आणि मतदारांनी बाबुराव अडसकरांना विजयी केले.

बाबुराव जेव्हा विधानसभेत गेले तेव्हा काळदातेंना पराभूत करणाऱ्या या रांगड्या व्यक्तिमत्त्वाला पाहण्यासाठी पत्रकार व आमदारांचीही गर्दी झाली होती.  झुबकेदार मिशा, डोईवर टोपी, पांढरा शुभ्र नेहरू अन् धोतर अशी वेशभूषा असलेल्या बाबूरावांना पत्रकारांनी गराडा घातला.

‘काळदाते कसे पराभूत झाले ?’ असा प्रश्न केला, त्यावर क्षणाचाही उसंत न घेता बाबूराव म्हणाले ‘दिला हाबाडा’. इथूनच हाबाडा शब्द राज्याच्या राजकारणात प्रसिद्ध झाला.

एकदा पवारांनी बीड मधल्या एका कार्यक्रमात आडसकरांना रशियन मुलीने दिलेल्या मुक्याची गोष्ट सांगितली.

बाबुराव आडसकरांनी आपल्या रांगड्या बोलीच्या भाषणानं विधानसभा गाजवली होती. आपला दबदबा तयार केला होता. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. रशियाच्या अभ्यास दौऱ्यासाठी काही आमदारांचं शिष्टमंडळ पाठवायचं होतं.

बाबुराव आडसकर यांना पवारांनी विचारले की रशियाला जाता का? आपल्याला कशाला बाबा रशिया, बिशिया’ असे म्हणत आडसकरांनी आधी नकार दिला. 

तिकडची भाषा येत नाही, तिकडे जायचं म्हटल्यावर आधुनिक पेहराव करायला लागेल याच त्यांना टेन्शन होतं. मात्र, पवारांनी त्यांना सोबत दुभाषा असेल वगैरे सांगून तयार केलं. अखेर आडसकर म्हणाले,

“साहेब धोतर- कोट काढून शर्ट-पँट घालतो पण मिशा काढायला तेवढं सांगू नका.”

पवारांनी मुंबईतल्या एका टेलरकडून आडसकरांच्यासाठी एक शेरवानी शिवून घेतली गेली. महाराष्ट्राच्या शिष्टमंडळासोबत आडसकर आकडीबाज मिशी वळवून मॉस्कोला गेले.

तिथं एका कृषी विद्यापीठात त्यांनी भेट दिली असता त्यांचा पेहराव, त्यांच्या मिशा बघून ‘स्टॅलिन, स्टॅलिन’ करत तरुण तरुणींचा घोळका त्यांच्याभोवती पडला. त्यांच्या सोबत फोटो काढून घेतले. त्यातीलच एका खट्याळ पोरीने त्यांच्या मिशाचा मुका घेतला.

बिचारे आडसकर लाजून गोरेमोरे झाले. परत आल्यावर हा किस्सा कोणी तरी मुख्यमंत्री पवारांच्या कानावर घातला.

त्यांनी मस्करीत आडसकरांना रशियन दौरा कसा झाला हे विचारलं. तेव्हा ते म्हणाले,

“देश चांगलाय आणि पोरी मायाळू आहेत. पण साहेब मी म्हणून सुटलो. मरतुकड्या माणसाची काही खैर नाही.”

असे हे निरागस मनाचे बाबुराव आडसकर. काळ्या मातीतला रांगडा नेता आपल्या प्रामाणिकपणामुळे आपलेपणामुळे लोकांच्या मनावर राज्य करत राहिला. बीडच्या राजकारणात अजुनही या हाबडा फेम नेत्याचं नाव आदरानं घेतलं जातं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.