म्हणून किशोर बियाणी यांना बिग बझार विकावा लागला..
“आम्ही ते सारं नष्ट करण्यावर विश्वास ठेवतो, जे आम्ही निर्माण केलं आहे’. आधीची गणितं मोडून नव्यानं गणितं मांडायचा हा डाव आतापर्यंत तरी यशस्वी ठरलेला दिसतो”
किशोर बियाणी यांचं हे सुप्रसिद्ध वाक्य.
आधी ‘पॅन्टालून’ नंतर फ्यूचर कॅपिटल होल्डिंग, स्टेशनरी जॉईंट व्हेंचर, AND मधील भागीदारी आणि आता फ्यूचर ग्रुपच्या बिग बझार सह फुड बाजार फॅशन बिग बाजार (एफबीबी), ई-झोन, ब्रॅण्ड फॅक्टरी, होम टाऊन आणि सेंट्रल अशी आधीची जुनी सगळी गणित मोडून वयाच्या ६० व्या वर्षी ते नवी गणितं मांडायला सज्ज होत आहेत.
किशोर बियाणी म्हणजे भारताचे रिटेलकिंग.
भारतातील मध्यम वर्गाला मॉल संस्कृतीची गाठ-भेट प्रथम घालून देणारे उद्योगपती. १९९९ चा काळात ‘क्रॉसरोड’ नावाचा भारतातील पहिला फुलप्लेज मॉल मुंबईमधील हाजी अली येथे सुरु झाला. निकोलस पिरामल फार्मास्युटिकल्सने तयार केलेला हा मॉल १ लाख ५० हजार चौरस फूट क्षेत्रफळामध्ये विस्तारलेला होता.
सर्व काही एकाच छताखाली म्हणत ‘मॉल’ संस्कृतीची भारताला ओळख करुन देण्यात आली. पण ही ओळख फक्त श्रीमंत वर्गापुरतीच मर्यादित होती.
गाव-खेड्यातील माणसं, शहरातील मध्यमवर्ग आणि गरीब अजून ही “ओ शेठ.. थोडं तर कमी करा, एवढं सामान घेतलयं…” अर्धा-एक तास गर्दीत उभं राहून परत त्या दुकानदाराच्या बार्गेनिंगसाठी पाठीमागेच होता. या वर्गाला मॉल संस्कृतीच आकर्षण असायचं, पण खिशाला परवडणारं नसायचं.
हिच मानसिकता ओळखून २००१ साली ‘इससे सस्ता और अच्छा कही नही’ अशी बोलकी टॅग लाईन घेवून कोलकत्यामध्ये ‘बिग बझार’ जन्माला आला.
मध्यम वर्ग आणि गरीबांनी प्रत्यक्ष मॉलमधील खरेदीचा अनुभव घेतला असो अथवा नसो, पण खूप साऱ्या जाहिरातींमुळं ग्राहकांना बिग बाजार माहिती होतं गेलं. अल्पावधीतच बिग बाजारसोबतच ‘फ्युचर ग्रुप’च्या ‘फुड बाजार’, ‘फॅशन बिग बाजार’ (एफबीबी), ई-झोन, ब्रॅण्ड फॅक्टरी, होम टाऊन आणि सेंट्रल या ब्रॅण्डना देखिल पसंती मिळाली.
बिग बझार पुर्वी बियानी यांनी आणखी एक ब्रॅन्ड उभा केला होता. ‘पॅन्टालून’ असं त्याचं नाव.
१९७६-७७ चा काळ. १५ वर्षांचे किशोर सेंचुरी बझार मध्ये कामाला जात होते. त्या सोबतच घरी परंपरागत चालत आलेल्या धोती आणि साडीच्या व्यवसायात ही लक्ष द्यायला चालू होतं. त्यांचे आजोबा राजस्थानमधून मुंबईत कापडाचा व्यवसाय करण्यासाठी आले होते. पण या व्यवसायात भाऊ-वडील यांची संकुचित वृत्ती तरुण किशोर यांना खटकत होती.
अखेरीस १९८० साली वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी स्वतःची मिल चालू करुन स्टेनवॉश विकण्यास सुरुवात केली. छोट्या-छोट्या दुकानांवर जावून ते आपलं प्रोडक्ट विकतं असतं. त्यांची मिल एवढी छोटी होती की ट्रेड मिलमध्ये देखील समाविष्ट केलं गेलं नव्हतं. स्टेनवॉश विकत असतानाचं त्यांना तरुणांच्या जीन्स पॅन्टनं प्रभावित केलं. यापुर्वी हा प्रकार तरुण जास्त घालत नसायचे, पण आता हे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण त्यांनी केलं.
आणि १९८७ साली Erstwhile Manz Wear नावानं त्यांनी ट्राऊजरचं रिटेल काम चालू केलं.
किशोर यांच ट्राऊजरचे हे काम चांगले चालू लागले. थोड्याचं दिवसात ऊर्दू शब्द पतलून वरुन त्यांनी ‘पॅन्टालून’ या नावानं हे ट्राऊजर विक्रीचे काम चालू केलं. व्यवसाय वाढत होता तसा किशोर यांचा उत्साह आणि व्यवसाय वाढविण्यासाठीची धडपड देखील वाढत होती.
१९९१ साली त्यांनी ‘पॅन्टालून’चे पहिले अधिकृत स्टोअर कोलकात्यामध्ये सुरु केले. पुढच्या एका वर्षातच त्यांनी ‘पॅन्टालून’ला स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड केलं आणि रिटेलची एक इको सिस्टीम सेट केली.
स्टॉक एक्सचेंजमुळे मार्केट आणि ग्राहकांचा पॅन्टालूनवरील विश्वास वाढतं होता. ग्राहकांच्या आवडी-निवडी जपण्यासाठी आणि नवीन बाजारातील नवीन ट्रेन्ड जाणून घेण्यासाठी ‘पॅन्टालून’च्या स्टोअर मध्ये कधी कधी ते स्वतः जावून बसत असतं. ‘पॅण्टालून’ने किशोर यांना रिटेल क्षेत्राचा पुरेपूर अनुभव दिला आणि त्या अनुभवातून ‘बिग बझार’चा जन्म झाला.
असा झाला ‘बिग बझार’चा जन्म :
बार्गेनिंग हा भारतीय माणसाचा किती ही नाकारला तरी ती सुप्त गुण आहे. आपल्या पदरात अधिकच पाडून घेणं हे त्यामागचं उद्दिष्ट. पण बार्गिनिंग करण्यापेक्षा ग्राहकांना न मागताच डिस्काऊंट आणि कमी किंमतीत जास्त फायदा देणं अर्थात ‘सेल’ ही संकल्पना देखील बियानींनी बिग बझारच्या माध्यमातुन बाजारात आणली.
१०५ रुपयांना खरेदी केलेली वस्तू साधारणपणे १४९ रुपयाला विकली जात असते. त्यात ऑफर देऊन तीच वस्तू १२९ रुपयाला विकताना ग्राहक आणि विक्रेता दोघंही खूश राहतात. हे सरळ साधं तंत्र त्यांनी मांडलं. शिवाय बिग बाजारसाठी जागा खरेदी करताना गरजेपेक्षा जास्तच जागा विकत घेऊन ठेवल्यानं भविष्यात विस्तार करणं सोपं जातं. हा धोरणीपणा त्यांनी व्यवसायात वापरला.
बिग बाजारचा ‘फॅशन बिग बाजार’ हा महत्त्वाचा ब्रॅण्ड. पूर्वी हलक्या दर्जाच्या कपडय़ांमुळे मर्यादित ग्राहक वर्गापुरता राहिलेल्या या ब्रॅण्डला फ्यूचर ग्रुपने अधिक दर्जेदार केलं. असीन, कतरीना कैफ, महेंद्रसिग धोनी यांनी या ब्रॅण्डची जाहिरात केली. आणि हा ब्रॅण्ड स्वस्त ते महाग सर्व श्रेणीतील कपडय़ांसाठी नावाजला जाऊ लागला.
२००८ च्या जागतिक महामंदीची जबर झळ :
२००१ साली स्थापन झालेलं पहिल्या स्टोअरवरुन २००६ सालापर्यंत बिग बझारनं ५६ पर्यंत झेप घेतली होती. तर २०१८ पर्यंत ही संख्या ११६ वर पोहचली. बिग बझार आणि पॅन्टालूनसह फ्यूचर ग्रुपच्या इतर ब्रॅन्डची यशस्वी घौडदौड चालू असतानाच २००८ सालची जागतिक महामंदी आली. या संकटाची ग्रुपला जबरदस्त झळ बसली. ग्रुपवरील कर्जाचा बोजा वाढतं गेला. एसेट्सला डाइवेस्ट करण्याशिवाय दुसरा पर्यायचं उरला नाही.
त्यातुनच २०१२ साली कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी पॅन्टालून हा ब्रॅन्ड त्यांनी आदित्य बिर्ला ग्रुपला विकला.
या कराराची रक्कम १६०० कोटी होती, त्यामध्ये ८०० कोटी रुपयांच्या कर्ज हस्तांतरणाचा समावेश होता. सोबतच २०१२ मध्ये बियाणी यांनी फ्यूचर कॅपिटल होल्डिंगमधील बहुतांश हिस्सा अमेरिकन खासगी कंपनी इक्विटी Warburg Pincus यांना पुन्हा पैसे उभा करण्यासाठी विकला. त्याच वेळी, स्टेपल्स ऑफ अमेरिकेसोबत सुरू केलेल्या एका स्टेशनरी जॉईंट व्हेंचरमधील संपूर्ण भाग भागीदार कंपनीला विकून ते बाहेर पडले.
त्यावेळी फ्युचर ग्रुप जवळपास ५००० कोटींच्या कर्जाच्या बोज्याखाली गेला होता.
त्याचप्रमाणे २०१३ मध्ये फ्यूचर लाइफस्टाईल फॅशन लिमिटेडने एथनिक वियर फर्म बीबा अप्पेरल्स आणि डिझायनर अनिता डोंगरे यांच्या मालकीच्या AND मधील ४५० कोटी रुपयांची भागीदारी विकली. ऑगस्ट २०१९ मध्ये किशोर बियाणी यांनी फ्यूचर कुपन्समधील ४९ टक्के हिस्सा एमॅझॉन. कॉम एनव्ही इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्ज एलएलसीला विकला.
२०२० साली संकट आणखी गडद :
२०१७ आणि २०१८ या आर्थिक वर्षांच्या तुलनेत २०१९ च्या तीन तिमाहीपर्यंत बिग बझार रुळावर होता. पण डिसेंबर २०१९ मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात १५ टक्के घट झाली होती. याशिवाय महसूलात ३ टक्के घट झाली. त्यानंतर कोरोनाच्या संकटाने या समस्येला अधिक गंभीर रुप दिले. रेटिंग एजेंसी ICRAने मार्च २०२० मध्ये फ्युचर ग्रुपचे रेटिंग नकारात्मक केले. कंपनीच्या कर्जात सातत्याने वाढ होत गेली.
मार्च २०१९ मध्ये १० हजार ९५१ कोटी असलेले कर्ज सप्टेंबर २०१९ पर्यंत १२ हजार ७७८ कोटींवर गेल्याचे ICRA म्हटले होते.
त्यानंतर किशोर बियानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कंपनीतील ३३.५ टक्के हिस्सा गहाण ठेवला आहे. एक बाजूला कंपनीचा व्यवसाय कमी होत चालला होता, दुसऱ्या बाजूला कर्ज वाढत असताना शेअर गहाण ठेवून ही फ्यूचर रिटेलला कर्जाची परतफेड करता आली नाही. हे संकट तेव्हा अधिक गडद झाले जेव्हा बँकांनी कंपनीचे शेअर जप्त केले.
२०१९ साली फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत किशोर बियानी ८० व्या स्थानावर होते. बिग बाजार देखील २५६ स्टोअर्सच्या माध्यमातून भारतातील तळागाळातील भागापर्यंत पोहोचलं आहे. बिग बाजारची नवी टॅग लाइन, ‘नये इंडिया का बाजार’ नव्या पिढीला लक्ष्य करते. पण आता कर्ज फेडण्यासाठी त्यांना पूर्ण व्यवसाय २४ हजार ७१३ कोटींना विकावा लागला.
हे ही वाच भिडू
- डी मार्ट खरच दाऊदचं आहे काय..?
- वॉलमार्ट-फ्लिपकार्ट डील मागे दडलंय तरी काय ?
- या वेड्या माणसामुळे अमेझॉन मंदीमध्ये देखील हजारो कोटी कमवत आहे.