बिग बॉसच्या वाघिणीचा म्हणजेच शिवानीचा नेमका प्रॉब्लेम काय आहे?

घर म्हणलं कि भांड भांड्याला लागणारच. आत्ता अशी भांडी १०० दिवस एकमेंकाना आदळत रहाणार म्हणाल्यावर आवाज बी लई होणार. बिगबॉसच्या सिझन २ मध्ये असला भांड्यांचा आवाज,राडा पहायला मिळणार याची पूर्ण कल्पना प्रेक्षकांना होती मात्र खटके उडायला इतक्या लवकर सुरवात होईल अस कोणालाही वाटलं नसणार!!
पहिल्याच दिवशी ओळखीपाळखी चा कार्यक्रम होतोय कि नाही त्याच्या आतच वादाची पहिली ठिणगी पडली. प्रेक्षकांना पहिल्या एपिसोड पासूनच शिव ठाकरे हे मराठमोळ पोरग लई दंगा करणार कुरापती काढणार अशी शंका होतीच , पण झालं मात्र तिसरच!!
भांडायचा जोर आला आपल्या सर्वांच्या लाडक्या देवयानीला म्हणजे शिवानी सुर्वेला.
शिव ठाकरे पहिल्या दिवसापासून चेष्टा मस्करीच्या मूडमध्ये होता. चेष्टेत अभिजीत बिचकुलेला शिवानीच्या नावाने त्यानी चिडवलं! आता घर म्हणलं की असले डिवचायचे प्रकार होणारच. मग काय धरल शिवानी मॅडमनी शिवला धारेवर! घरच्यांच्या मध्यस्ती नंतर शिवला माफी मागावी लागली.
म्हणतात ना वाघिणीच्या तोंडाला रक्त लागल्यावर तिला स्वस्थ बसवत नाही.
झालं तेच! शिवानीन आपल पुढच टार्गेट केलं शेफ पराग कान्हेरेला. या पोराला तर असा धारेवर धरला कि सांगायलाच नको. पहिल तर त्याच्या तोंडावर जोरात पाणी फेकलं, त्याला पाडायचा प्रयत्न केला. तो चिडून आपल्यावर रागानं धावून आला पाहिजे अस नियोजन चालू होतं मॅडमच!
शेवटी, बिगबॉस महेश मांजरेकर रविवारी प्रकट झाले आणि ताई जरा दमानं घ्या सल्ला दिला काही दिवस शिवानी मॅडमचा पारा शांत होता. पण शिवानी ताई पुढच्या संधीच्या शोधात होत्या.
लवकरच ती संधी त्यांना मिळाली ‘चोर बाजार’ या साप्ताहिक कार्यादरम्यान शिवानीला राग अनावर व्हायला लागला. जुना बदला या कार्यक्रमामुळे पुन्हा बाहेर आला. शिवानी आणि पराग पुन्हा तंडले, शिवानीने डायरेक्ट पराग वर हातच उचलला. परागभाऊ चांगलाच भेदारला. त्यांनी डिकलेऱच करून टाकल,” शिवानी हा टास्क खेळणार असेल तर मी खेळणार नाही खेळणार जा “
परागने टास्क मधून एक्सिट घेतला पण वाघिणीला काय फरक पडणार होता? ये शिकार नही तो कोइ और सही म्हणत तीन आपला मोर्चा वळवला ‘राधा प्रेम रंगी रंगली’ फेम वीणा जगताप कड.
पण वीनासुद्धा गप बसणाऱ्यातली नव्हती “इट का जवाब पत्थर से” म्हणत तिन वाघिणीवरच म्हणजे शिवानीवरच हात उगारला. मग काय वाघिणीनं झडप मारली तिच्यावर आणि कचकून छातीत लाथच घातली. वीणाची हि झुंज बिगबॉस मंडळी गप पाहत होती, शिवानीचा रागराग करत होती परंतु, मारामारीत पहिली झडप वीणानं घातली असं तिनं स्पष्ट केलं मग कोण काय करणार?
शिवानीच पुढचं टार्गेट होत जेष्ठ सिनेनायिका किशोरी शहाणे. मौकेकी तलाश मध्ये असणाऱ्या शिवानीला संधी मिळाली ती एका टास्कमुळे.
या टास्कनुसार चोर म्हणून किशोरीताई शिवानीच्या ड्राॅव्हरमध्ये कपडे चोरण्यासाठी बाहेर काढू लागल्या. तेव्हा पोलीस झालेल्या शिवानीनं उलट त्यांच्याचं ड्रॉव्हरमधील कपडे उपसायला सुरुवात केली. आणि झाली मग सुरु झाली शहाणे आणि शिवानीत बाचाबाची .
‘पोलीस या टास्कमध्ये चोरी करू शकत नाहीत’ असं शिवानीला तिच्या टीममधले लोकही समजावत होते परंतु, तिनं त्यांचंही ऐकलं नाही. शिवानीची मैत्रीण देऊळ सिनेमावाली नेहा शितोळे हिनं देखील ती असं का वागतेय हे मला समजत नाहीए अशी कबुली सगळ्यांसमोर दिली . घरातील सगळेच आता पुरते हैराण झालेत.
बिग बॉसच्या घरातील दुसरा आठवड्यावरही याच वाघिणीच्या आणि वीणाच्या भांडणांचा होता . एवढ्या कालव्यानंतर बिग बॉसच्या घरातील नियम फाटयावर मारल्याने दोघीना शिक्षा तर झालीच वरून महेश मांजेरकरांनी झापलं ते वेगळ!
वीणा तू दादागिरी करते , स्वतःची मतं इतरांवर लादते असं म्हणत मांजरेकर तिला ओरडले. त्यानंतर मांजरेकरांनी आपला मोर्चा शिवानीकडे वळवला. तिचा राग, ती देत असलेल्या शिव्या, गेम खेळण्यास आणि बिग बॉस यांनी बिग बॉस यांनी देलेली अडगळीच्या खोलीत रहाण्यास नकार , परागशी तीने केलेली डिवचाडिवची असा सगळाच समाचार घेत मांजरेकरांनी शिवानीला चांगलीच झापली. असलं वागलेलं इथं खपून घेतला जाणार नाही रागावर ताबा ठेवायला शिका असा दम भरला.
याच वादावादीत घरात सीझनचा पहिला खटला भरण्यात आला. आता सगळ्यांचं लक्ष होत एलिमिनेशन कोणाच होणार याकडं!!
बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमधील पहिलं एलिमिनेशन रविवारी पार पडलं. बिग बॉसच्या घरातील १५ दिवसांच्या प्रवासानंतर ‘पोपटाचा पिंजरा’ या टास्क नंतर अभिनेत्री मैथिली जावकर एलिमिनेट झाली. घरातून मैथिली जावकर बाहेर आल्यावर महेश मांजरेकरांनी तिला घरातले अनुभव विचारले. तेव्हा ती म्हणाली की,
“माझ्यासोबत सगळेच अगदी उद्धट, उर्मट अगदी निवडून या घरामध्ये आणले आहेत,जे दुसऱ्यांचं अजिबात ऐकत नाहीत.”
घरात तुझे कोण कोण मित्र झाले या प्रश्नावर मैथ्थिली म्हणाली की,
” नेहा सोडून घरामध्ये सगळेच मला जवळचे होते आणि आहेत…सगळ्यांशी माझी घट्ट मैत्री झाली.बिचुकले यांनी मला धाकटी बहीण तर माधवने मला मोठी बहीण म्हंटलंय, मला या घरामध्ये दोन भाऊ मिळाले.”
आता येणाऱ्या काळात कोणालाच ना जुमानणारी वाघिण शिवानी महेश मांजरेकरांचं बोलणं मनावर घेईला का? कोण असणार तिचे पुढचे टार्गेट? कोण असणार पुढचं एलिमिनेशन? कोणाच होणार याची उत्तर? बिगबॉसचे पुढचे एपिसोडच देतील.
हे ही वाच भिडू.
- ‘बिग बॉस चाहते है..’ हा लोकप्रिय आवाज नेमका कुणाचा..?
- मांजरेकर विरुद्ध नागराज !
- बलात्कार कसा करावा पुस्तक लिहणारे अनिल थत्ते.