बिगशॉट लोकं या लाईनमध्ये गंडतात मग “इंडिगो” सक्सेसफुल कसं झालं ते वाचा

एअर इंडिया, एअर डेक्कन, जेट एअरवेज, किंगफिशर सारख्या एअरलाईन्स कंपन्या एकतर विकल्या जातात किंवा बंद तरी पडतात. जभरातल्या मोठं मोठ्या एअरलाईन्स कंपन्यांचं आर्थिक गणित बिघडलंय.  

सगळ्या कंपन्या डबघाईला येत असताना अस्सल भारतीय ‘इंडिगो’ मात्र चांगली कमाई करतंय. इतर मोठ्या कंपन्या, भारत सरकारला जे करता आलं नाही ते इंडिगोनं केलंय. 

कसं? हाच आपला मेन मुद्दाय.

इंडिगोची सुरुवात झाली ती २००६ मध्ये. 

त्याचे संस्थापक आहेत राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल. भाटिया त्यापूर्वी इंटर ग्लोबचे एमडी होते, तर गंगवाल हे युएस एअरवेज ग्रुपचे सीईओ.

तसं भाटिया आणि गंगवाल यांना एअरलाईन्सचा परवाना २००४ मध्ये मिळाला होता. मात्र त्यांच्या कंपनीनं उड्डाण घेतलं २००६ मध्ये. तेही कागदापासून मार्केटपर्यंत सगळं प्लॅनिंग करून.

आता आपल्या आजूबाजूला असे काही कार्यकर्ते असतात, जे नियमित प्रवास करतात. त्यांना विचारून बघा, ते का विमानानं प्रवास करतात? विमानात लय भारी वाटतंय, खायला प्यायला मिळतंय अशी लक्झरी असती म्हणून नाही, तर वेळ वाचावा, वेळेत पोहचता यावं म्हणून.

 

इंडिगोनं आपलं टार्गेट ठरवलं मध्यमवर्गीय प्रवासी आणि त्यांना परवडेल असे तिकिटांचे दर ठेवले, त्यामुळं कस्टमर फिक्स झाले.

अगोदर त्यांनी इतर कंपन्यांची विमानं कुठल्या रूटवर जास्त चालतात हे पाहिलं आणि त्याच मार्गावर सेवा दिली. ज्या माणसाला वेळेत पोहोचायचंय आणि लक्झरीपण नकोय, तो माणूस विचार करतो पैशांचा. त्याच्यासाठी लेगरुम कमी असली, तरी चालून जातं.. पण २०० रुपये वाचणं महत्त्वाचं असतं.

दुसरी स्कीम इंडिगो बल्क मध्ये विमाने खरेदी करते. 

२००५ मध्ये एकदाच इंडिगोनं विमान तयार करणाऱ्या ‘एअरबस’ या कंपनीला १०० विमानांची ऑर्डर दिली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकदाच विमानं खरेदी केल्यानं त्यांना एअरबससोबत चांगली डील करता आली, त्यांचा फायदा तर झालाच पण वर पैसेही वाचले.

बाकी कंपन्या आपली कंपनी सुरु करताना जुनी विमानं खरेदी करतात. त्यामुळे एकतर मेंटेनंस वाढतो आणि जुन्या विमानाची फ्युअल इफिशीयंसी कमी असते. यामुळेच मधला लॉकडाऊनचा काळ सोडला तर २००९ पासून इंडिगो कायम फायद्यात राहिली आहे. 

बाकी कंपन्यांना वाटलं, की प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विमानाची वेगळी वेगळी मॉडेल असावी. मग एका मार्गावरचं विमान इतर कंपन्यांना दुसऱ्या मार्गावर किंवा कमी प्रवासी संख्या असणाऱ्या मार्गावर पाठवताना समस्या निर्माण होते. तीच समस्या कर्मचाऱ्यांबाबत पण होते.  

यावर इंडिगोनं एक उपाय शोधला. त्यांनी पहिली १०० विमाने ही एअरबस A 320 या एकाच मॉडेलची घेतली. त्यामुळे प्लॅनींग करताना अडचण निर्माण झाली नाही. कर्मचाऱ्यांना जॉब रोटेशन करताना सुद्धा कुठलीही तक्रार आली नाही. 

कमी भाडं आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा 

हे वाचून झाल्यावर तुम्ही देशाअंतर्गत सेवेचं विमान तिकीट चेक केलं, तर सगळ्यात अगोदर इंडिगो दिसेल. कमी भाडं आणि महत्वाच्या मार्गावर त्यांची जास्त विमानं आहेत. इंडिगोकडं असणारी विमानं ही १८० ते २२० प्रवासी बसू शकतील एवढ्याच क्षमतेची आहेत.   

यानंतर इंडिगोनं ‘एअरबस नियो’ या विमानांची खरेदी केली. फ्युअल इफिशीयंसी जास्त असणारी विमानं अशी त्यांची ओळख होती. विमानाच्या इतर मॉडेल्सपेक्षा नियो १२ ते १५ टक्के जास्त फ्युअल इफीशीयंसी असणारे आहेत. ताफ्यात नवीन विमानं असल्यानं त्यांचा मेंटेनंसही कमी आहे.     

इंडिगोनं सेवा लिमिटेड ठेवली पण केंद्रस्थानी कायम प्रवासीच राहिले 

मोफत जेवण, एन्टरटेन्मेंट यावर पैसे खर्च केले नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मार्ग फायद्यात होते त्याच मार्गावर सेवा सुरु ठेवली. एक विमान दिवसातून १२ तास उड्डाण करतं. टाइमवर विमानं उडतील यावर अधिक लक्ष दिलं. यामुळे इंडिगो भारतात सर्वात स्वस्त भाडं ठेवून सुद्धा फायद्यात असणारी कंपनी ठरली.

थोड्यात मजा असती, हे किंगफिशरला कळलं नाही, पण इंडिगो त्याच्याच जीवावर उलालालाला ले ओ म्हणत राहिलं. 

हे ही वाच भिडू 

    

 

Leave A Reply

Your email address will not be published.