बॉलीवूडने नाकारलेल्या या भिडूने स्पॅनिश भाषेत बॉलीवूड स्टाईल फिल्म बनवलीये..!!!

बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यातील गावातून तो मुंबईत आला होता. हिरो बनायला. मुंबईत दररोज असे हजारो तरुण-तरुणी येतात, बॉलीवूडमध्ये हिरो-हिरोईन बनण्याची स्वप्नं घेऊन. तो ही आला होता. मुंबईत गुजराण करण्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी होती, सगळं काही तो करतही होता. इंडस्ट्रीत वेगवेगळ्या लोकांना भेटत होता, कुठे काही काम मिळतंय का ते बघत होता, पण इंडस्ट्री काय दार उघडायला तयार नव्हती. शेवटी कंटाळला. कंटाळून एका क्षणी परत घरी जायचा विचार करत होता. पण मनातलं हिरो व्हायचं स्वप्न काही शांत बसू देत नव्हतं. मग त्याने एक जगावेगळा निर्णय घेतला. २०००  साली त्यानं थेट लॅटिन अमेरिकेतील ‘कोस्टा रिका’ देश गाठला आणि कोस्टा रिका मधील १७ वर्षाच्या संघर्षानंतर २०१७ मध्ये त्याची प्रमुख भूमिका असलेली ‘इनरेदादोस: ला कन्फ्यूजन’ ही स्पॅनिश फिल्म प्रदर्शित झाली. या फिल्मच्या रिलीजसह लॅटिन अमेरिकन चित्रपटसृष्टीत काम करणारा तो पहिला भारतीय अभिनेता ठरला. विशेष म्हणजे ही संपूर्ण फिल्म त्याने बॉलीवूडच्या स्टाईलमध्ये बनवलीये. लॅटिन अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीमधला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. प्रभाकर शरण त्याचं नांव.

PRABHAKAR SHARAN 1

२००० साली कोस्टा रिकाला जायचा निर्णय तर घेतला पण तिथं सगळ्याच अडचणी होत्या. राहायचं कुठे, खायचं काय, बोलायचं कुणाशी..? पारंपारिक भारतीय कुटुंबात वाढलेला प्रभाकर शुद्ध शाकाहारी आणि इंग्रजी शिवाय दुसरी कुठलीच परदेशी भाषा त्याला येत नव्हती. कोस्टा रिकात राहायचं तर स्पॅनिश भाषेला पर्यायच नव्हता. या सगळ्या अडचणींना सामोरे जाताना तो मोडायचाच बाकी होता, परत घरी जायचा विचार डोक्यात घोळायला लागला होता. पण घरी जायचं म्हणजे स्वतःची आणि कुटुंबाची नाचक्की करून घ्यायची, हे स्पष्टच दिसत होतं. हे काही प्रभाकरला मान्य नव्हतं. त्यामुळे काहीही झालं तरी माघार घ्यायची नाही हे त्यानं मनाशी पक्कं ठरवलं.

परक्या देशात टिकून राहण्यासाठी स्पॅनिश शिकून घेतली आणि उदरनिर्वाहासाठी बिहारमधील मुलतानी माती आणि भारतातील अन्य स्वस्त वस्तू जश्या की अगरबत्ती आणि कपडे त्याने कोस्टा रिकात आणून विकले पण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणं सोडलं नाही. या प्रवासात तो एका कोस्टारिकन मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न देखील केलं. २०१० येईपर्यंत त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अडचणींनी पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली. लग्नाच्या बायकोपासून वेगळं व्हायला लागलं आणि तोडका-मोडका व्यवसाय बुडाल्याने भारतात परतावं लागलं. भारतात आला परंतु त्याने आपला खटाटोप सोडलेला नव्हता. २०१४ साली तो परत कोस्टा रिकाला गेला आणि आपल्या फिल्मच्या संदर्भात लोकांना भेटू लागला. दरम्यान त्याची भेट तेथील टेरेसा रोड्रिग्ज केर्डास यांच्याशी झाली.

टेरेसा रोड्रिग्ज या कोस्टा रिकातील मोठं प्रस्थ. प्रभाकरने आपली स्पॅनिशमध्ये बॉलीवूड स्टाईल  फिल्म बनवण्याची कल्पना रोड्रिग्ज यांना सांगितली. त्यावेळी तेथील बहुतांश लोकांनी त्याला वेड्यात काढलं होतं, पण टेरेसा रोड्रिग्ज यांना प्रभाकरची कल्पना आवडली आणि आपण फिल्म प्रोड्यूस करायला तयार आहोत असं त्याला सांगितलं. निर्माते  तर मिळाले पण आता शोध सुरु झाला दिग्दर्शकाचा. त्यासाठी तो ‘खिलाडी ७८६’ बनवलेल्या आशिष मोहन यांना भेटला. त्यांनी सोबत काम देखील सुरु केलं पण नंतर दोघांमधील मतभेदामुळे आशिष मोहन यांनी फिल्म सोडली. आता काय करायचं, हा प्रश्न चित्रपटाच्या टीमसमोर उभा राहिला. या भिडूने काय केलं असेल तर तो स्वतःच चित्रपटाचा दिग्दर्शक झाला. अभिनेता म्हणून तो मुख्य भूमिकेत होताच आता तो दिग्दर्शक देखील झाला. एवढ्या अडचणींना तोंड देत तयार झालेली ‘इनरेदादोस: ला कन्फ्यूजन’ शेवटी ९ फेब्रुवारी २०१७ रोजी थेटरात दाखल झाली. प्रभाकर शरण व्यतिरिक्त नॅन्सी डॉबल्स आणि WWE मधील सुपरस्टार स्कॉट स्टाईनर यांच्या भूमिका असलेली ही फिल्म तुफान हिट ठरली.

https://www.youtube.com/watch?v=3pOZQNZ7dVk

स्पॅनिशमध्ये हिट झाल्यानंतर हा चित्रपट  ‘१ चोर २ मस्तीखोर’ नावाने भोजपुरी आणि हिंदी भाषेत देखील प्रदर्शित करण्यात आला पण भारतात चित्रपट फारसा चालू शकला नाही. बिहारमधल्या मोतीहारी सारख्या भागातील एक पोरगा हिरो बनण्याचं स्वप्न घेऊन सातासमुद्रापार जातो आणि तिथं जाऊन एका परक्या देशातील इंडस्ट्रीत बॉलीवूड टाईप चित्रपटाची निर्मिती करतो ही निश्चितच प्रेरणादायी कहाणी आहे. प्रभाकर शरणला आता भोजपुरीमध्ये एक भव्यदिव्य आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपटाची निर्मिती  करायची आहे. ते आपलं स्वप्न असल्याचं तो सांगतो. भिडू प्रभाकरच्या भविष्यकालीन वाटचालीस ‘बोल भिडू’च्या शुभेच्छा…!!!

 

Leave A Reply

Your email address will not be published.