बिहारमध्ये दिवसाला ६ लाख खर्चाचं हेलिकॉप्टर आणलंय, तेही फक्त दारूचे अड्डे शोधायला

आपल्यातले कित्येक जण लहानपणी हेलिकॉप्टर दिसलं, की उगा त्याच्याकडे बघून हात फिरवायचे. काय काय जणं मोठेपणी पण करतात. अगदी रीसेंटमधला ट्रेंड कसला आला असेल, तर लग्नात नवरा-बायको हेलिकॉप्टर मधून लागाच्या ठिकाणी एंट्री मारतात. ग्रँड एंट्री किंवा रॉयल एंट्रीच्या नावाखाली हे चालतं. तर निवडणुकांमध्येही अशा स्कीमा दिल्या जातात की लकी ड्रॉमध्ये जर महिलांचं नाव आलं तर त्यांना हेलिकॉप्टरने एक चक्कर मारायचं भाग्य लाभेल.

आता हे सगळं दाखवून देतं की आजही हेलिकॉप्टरबद्दल भारतीयांना काय जाम आकर्षण आहे. पण आजपर्यंत हेलिकॉप्टर ज्या-ज्या कामांसाठी वापरलं जात होतं त्यामध्ये एका लय अतरंगी कारणाचा समावेश करण्यात आलाय आणि हे केलंय देशाच्या लाडक्या बिहार राज्यानं. बिहार नेहमीच आगळे वेगळे कारनामे करण्यामध्ये एक पाऊल पुढे आहे, हेच याने पुन्हा एकदा सिद्ध झालंय.

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारने दारूबंदीचं इतकं मनावर घेतलंय की, चक्क दारूचे अड्डे शोधण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टर मैदानात उतरवलंय.

हो मित्रांनो, जे वाचलंय ते बरोबरच आहे. बिहारमध्ये दारूबंदी करण्यात आली आहे. मात्र तरीही गेल्यावर्षी अनेक जणांचा विषारी दारू पिल्याने मृत्यू झाला. म्हणजे दारूबंद करूनही घटना कमी होईनात याने पाणी कुठे तरी मुरतंय हे शासनाच्या लक्षात आलं. तेव्हा बिहारमध्ये हे छुपे दारूचे अड्डे शोधण्यासाठी पोलिसांचे फ्लाइंग स्क्वॉड आणि त्यानंतर ड्रोनचा वापर केला गेला. याद्वारे सर्वेक्षण करून अवैध दारू व्यावसायिकांना पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. 

तरीही यावर्षीच्या सुरुवातीलाही विषारी दारूमुळे मृत्यूच्या घटना समोर आल्या. दारू पिण्याच्या घटना काही कमी होत नाहीत हे लक्षात आल्यावर परत बिहार सरकारने वरचढ शक्कल लढवायला सुरुवात केली आणि त्यांना हेलिकॉप्टरचा पर्याय घावला. त्यांच्या या पर्यायाला ‘बूस्टर डोस’ म्हणून लॉन्च केलं आहे.

आता हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अक्ख्या बिहारमध्ये अवैध दारूची दुकानं शोधली जाणारेत. आणि ती सापडली की लगेच त्याची माहिती पोलीस आणि अधिकाऱ्यांना देऊन काम तमाम केलं जाणारेय. दारूबंदी विभागाने यासाठी एक प्लॅन तयार केलाय. त्यानुसार सगळं ऑपरेशन चालणार आहे. या प्लॅननुसार बक्सरपासून कटिहारपर्यंत गंगा नदी आणि ११ भागात लगातार हेलिकॉप्टरने सर्वेक्षण केलं जाणार आहे.

या हेलिकॉप्टरमध्ये पायलट व्यतिरिक्त अजून ५ लोक बसू शकतात. तेव्हा या हवाई सर्वेक्षणादरम्यान, उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांसह इंजिनिअर्स आणि सपोर्ट डिटेक्शन एक्सपर्ट्स हेलीकॉप्टरमध्ये असणार आहेत.  दररोज ६ ते ७ तास हे ऑपरेशन चालणार आहे. त्यानुसार २२ फेब्रुवारीला याचा शुभारंभ होऊन हेलिकॉप्टरने तासाभराहून अधिक काळ उड्डाण घेतलं होतं.

मात्र आता सगळ्यांच्या मनात येणारा साहजिक प्रश्न म्हणजे, भाई हेलिकॉप्टर इतकं महाग असतं की इथे लग्नाच्या एंट्रीपुरतं आणायचं तर लाखो खर्च होतात तेव्हा आता रोज हे हेलिकॉप्टर उडणार त्याला किती खर्च येणार?

तर या हेलिकॉप्टरच्या प्रत्येक तासाचा खर्च सुमारे ७५ हजार ते एक लाख रुपये असणार आहे, असं संगितल्या जातंय. म्हणजे ऑपरेशनचे तास धरले तर जवळपास ६ लाखांपर्यंत रोजचा खर्च आरामात जातो.

याच खर्चामुळे तर मोठा राडा सुरु झालाय बिहारमध्ये. लालूंच्या आरजेडी पक्षाने नितीश कुमारांच्या सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केलीये. इथे शाळेत शिकणाऱ्या पोरांना पुस्तकं मिळत नाहीयेत, शाळांच्या अवस्था दयनीय झाल्यायेत, शिक्षण क्षेत्राची पार रया गेलीये आणि यांना लोकांना फिरवण्यात मज्जा येतेय. दारूबंदी यशस्वी करण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतणं चालूये, ज्याचा काहीच फायदा होणार नाही, अशा टीका केल्या जातायेत.

राजकारण तर असंच असतं. एकमेकांवर हल्लाबोल करणारं. मात्र याच्या व्यतिरिक्त जर थोडा तर्क लावला तर जमिनीवरून सर्वेक्षण सोडून हवेतून सर्वेक्षणाचा मार्ग कितपत योग्य आहे? अशा शंका उपस्थित होताना दिसतायेत. काय आहे ना, दारूचे अड्डे आधीच जंगलात, गोदाम, घरात लपून चालवले जातात. अशात पोलिसांच्या पथकाला डॉग स्क्वाडच्या मदतीने ते शोधणं जास्त सोयीस्कर असल्याचं देखील बोललं जातंय.

 पण हे बिहार आहे, इथे असेच काहीसे अतरंगी कारनामे दिसणारच!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.