कॉंग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतील आठ जणांनी बिहारमध्ये पाऊलही ठेवला नाही

बिहारमध्ये अखेरीस एनडीएला १२५ जागांसह पुर्ण बहूमत मिळाले आहे. त्यामुळे भाजपच्या पाठिंब्यावर लवकरच नितीशकुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. पण या विजयानंतरही चर्चा आहे ती महागठबंधनच्या पराभवाची. आणि त्यातही प्रामुख्याने कॉंग्रेसच्या पराभवाची.

एकेकाळी याच राज्यात कॉंग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री पुर्ण बहुमतासोबत विराजमान होता. पण या गोष्टीला आता ३५ वर्ष उलटली आहेत. लालू-नितीशच्या उदयानंतर बिहारच्या राजकारणात अगदीच वाताहत झाली. इतकी की २०१० मध्ये २४३ जागा लढवून केवळ ४ जागा जिंकता आल्या होत्या.

मागील निवडणूकीत कॉंग्रेसला जेडीयू आणि राजद सोबत युती करुन कशाबशा २७ जागा जिंकवून आणल्या होत्या. त्यामुळे या निवडणूक तरी कॉंग्रेस नव्या उत्साहासोबत निवडणूकीत उतरेल या आशेवर आणि मतविभाजन टळेल या कारणाने राजदने सोबत घेतले.

कॉंग्रेसने देखील भरपूर तयारी केली. पक्षाने १० ऑक्टोंबरला निवडणूक आयोगाला ३० स्टार प्रचारकांच्या नावाची यादी दिली. ज्यामध्ये अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी , महासचिव प्रियंका गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा प्रामुख्याने समावेश होता.

सोबत रणदीप सुरजेवाला, गुलाम नबी आझाद, मीरा कुमार, प्रभारी शक्तीसिंग गोहिल, रज बब्बर, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री अमरेंदसिंग, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, तारिक अन्वर, सचिन पायलट अशा तब्बल २६ जणांच्या नावाचा समावेश होता.

ही यादी बघून कार्यकर्ते पण खुश झाले. कोणा-कोणाला, कधी कधी, कुठे कुठे सभेला आणि प्रचाराला बोलवायचे याची तयारी सुरु झाली. प्रचार सुरु झाला. २८ ऑक्टोंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होते. त्यामुळे २६ तारखेपर्यंतच प्रचाराला वेळ होता.

पण २० ऑक्टोंबर उजाडले तरी हे स्टार प्रचारक बिहारमध्ये दिसत नव्हते. ना कोणती सभा, ना जाहिरनामा. कोणता स्टार प्रचारक कोणत्या प्रदेशात किती आणि कधी प्रचार करणार याविषयी पक्षाने अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नव्हती.

उमेदवार आणि कार्यकर्ते आपल्या स्थानिक पातळीवर प्रचार करतातय. पण मतदानाला आठ दिवस राहिले तरी अद्याप राष्ट्रीय पातळीवरील एकाही नेत्याची सभा नाही.

अखेरीस हळू हळू २१, २२ तारखेनंतर जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते असलेले रणदिप सुरजेवाला, गोहिल, राज बब्बर यांच्यासारखे नेते दिसू लागले. पण ते अद्याप प्रचारासाठी मैदानात उतरले नव्हते.

प्रचाराला शेवटचे तीन दिवस बाकी होते, तेजस्वी यादव दिवसाला चार सभा घेत होते; पण राहूल गांधी अद्यापही प्रचाराच्या फ्रेममधून बाहेर होते. ते चार दिवसांसाठी शिमलामध्ये सुट्टीला गेले होते. सुट्टीनंतर २३ ऑक्टोंबरला ते बिहारमध्ये आले. त्यानंतरच्या काळात ही ५ नोव्हेंबर पर्यंत ते मोजून चार दिवस बिहारमध्ये होते आणि त्यांनी केवळ आठ सभा घेतल्या.

त्या यादीमध्ये दुसरे मोठे नाव होते सोनिया गांधी यांचे. पण त्या बिहारमध्ये आल्याच नाहीत. मुळात त्या बर्‍याच दिवसांपासून आजारी आहेत. आणि अनेक काळापासून जनतेमध्ये गेलेल्या नाहीत. बिहार निवडणुकीतही त्यांनी नवी दिल्लीतील त्यांच्या सरकारी निवासस्थानावरून साडेपाच मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला. तोच त्यांच्या प्रचारचा शुभारंभ आणि शेवटही संपन्न झाला.

आता प्रियंका गांधींबाबत सांगायचे झाले तर त्या देखील बिहारमध्ये गेल्या नाहीत. ना कोणताही व्हिडिओ अपलोड केला. मतदारांना अपील करणारे ट्विट नाही. पण विरोधकांवर टिका करणारे ट्विट मात्र झाले.

कॉंग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाम नवी आझाद, पंजबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, लोकसभेच्या माजी अध्यक्षा मिरा कुमार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, संजय निरुपम यांचीही नावे होती. मात्र यापैकी एक ही नेता प्रचाराकडे फिरकला नाही. काहींनी तब्येत अस्वस्थ्यामुळे, तर काहींनी वेळ नसल्याचे सांगत वेळ मारुन नेली.

राज्याबाहेरच्या नेत्यांमध्ये राजस्थानचे माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांचा २९ ऑक्टोंबर रोजी एका दिवसाचा तर छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचाही एका दिवसाचा बिहार दौरा पार पडला.

त्यामुळे पक्षाच्या प्रचाराची सगळी सुत्रे मुख्य प्रवक्ते आणि नवनियुक्त राष्ट्रीय सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांच्या हातात देण्यात आली होती. सगळ्या प्रचार प्रक्रियेमध्ये इतर नेत्यांच्या तुलनेत म्हणजे अगदी बिहारचे प्रभारी आणि राज्यसभेचे खासदार असलेले शक्ति सिंह गोहिल यांच्यापेक्षाही सर्वात जास्त सभा म्हणजे २० सभा सुरजेवाल यांनी घेतल्या.

तर बिहारमधील सदानंद सिंह, शत्रुघ्न सिन्हा, शकील अहमद, तारिक अन्वर, अनिल शर्मा, विरेंद्र सिंग राठोड, मोहम्मद जावेद, यांनी स्थानिक पातळीवर आपआपल्या पद्धतीने प्रचार केला. यात शत्रुघ्न सिन्हा हे आपल्या मुलगा आणि मुलगी यांच्याच प्रचारात जास्त दिसत होते.

माजी राज्यपाल निखील कुमार हे देखील स्वतःच्या पुतण्या म्हणजे राकेश उर्फ पप्पु यांच्याच मतदारसंघात होते. राकेश यांना त्यांनी लालगंज मधून तिकीट मिळवून दिले. पण ते विजय मिळवून देवू शकले नाहीत.

प्रमोद तिवारी – तीन सभा सोडल्या तर यांनी केवळ पत्रकार परिषद घेवून किंवा प्रेसनोट काढून टिका करण्यावर भर दिला.

बिहार कांग्रेस अध्यक्ष डॉ मदन मोहन झा, प्रचार समितिचे अध्यक्ष डॉ अखिलेश प्रसाद सिंह आणि विधान परिषदेचे आमदार प्रेमचंद मिश्रा, राज बब्बर – हे प्रचारामध्ये सुरजेवाला यांच्या खांद्याला खांदा लावून होते.

किर्ती आझाद – हे भाजपचे माजी खासदार आणि सध्या कॉंग्रेसमध्ये आहेत. ते केवळ पत्रकारांशी आणि माध्यमांशी बोलत होते.

इमरान प्रतापगढी – एकच सभा घेतली आणि त्यातही तीच सभा चालू असताना स्टेज मोडल्यामुळे जखमी झाले होते.

बिहारच्या शेवटच्या टप्प्यात जवळपास ७८ जागा होत्या. त्यातील कॉंग्रेस २५ जागा लढवत होती, त्यापैकी ११ जागा त्यांनी यापुर्वी जिंकलेल्या होत्या. असे असूनही राहुल गांधींनी या भागात चारच सभा घेतल्या. आणि बिहारमधील महागठबंधनचे सर्वात मोठे नुकसान तिसर्‍या टप्प्यातच झाले आहे. ७८ पैकी ५२ जागा एनडीएने जिंकल्या आहेत तर २० जागा महागठबंधनला मिळाल्या आहेत.

त्यामुळे या सगळ्या स्टार प्रचारकांनी केवळ यादीमध्ये नावाची उपस्थिती लावली, असचं म्हणावं लागेल. प्रत्यक्ष प्रचारसभामध्ये नितीश कुमार सगळ्यात आघाडीवर होते. त्यांनी जवळपास १६० सभा घेतल्या. त्यानंतर तेजस्वी यादव. त्यांनी देखील १२४ च्या आसपास सभा घेतल्या. त्या तुलनेत कॉंग्रेस बरीच मागे होती.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.