बिहारच्या या गावात घरटी एक पोरगं IIT मध्ये आहे..

बिहार हे राज्य कधीकाळी संपूर्ण जगाचं शिक्षणाचं केंद्र होतं. त्यावेळी बिहारमध्ये नालंदा, तक्षशिला अशी जागतिक दर्जाची विद्यापीठं होती. मात्र कालांतराने बिहारचं हे ‘शैक्षणिक केंद्र’ म्हणून नाव मागे पडलं. स्वातंत्र्यानंतर ही परिस्थिती अधिकच बिघडत गेली.

जरी सध्या देशाला सार्वधिक अधिकारी देणारं राज्य बिहार असलं तरीही तिथल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल बोलायला नको. मात्र, सगळ्या अडथळ्यांवर मात करत बिहारमधील एका गावाने ‘आयआयटीयन्सचं गाव’ म्हणून ओळख निर्माण केली आहे.

यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना कसलाही अधिकचा खर्च करावा लागत नाही. फक्त त्या विद्यार्थांची मेहनत करण्याची तयार हवी. बिहारच्या गया जिल्ह्यातील ‘पटवाटोली’ हे गावं काही वर्षांपूर्वी हातमाग कामगारांचं गाव म्हणून ओळखलं जातं होतं. आता या गावातून आयआयटीयन्स निघत आहेत.

आयआयटीच्या विद्यार्थ्यांची खाण असणाऱ्या पटवाटोली गावची ही कहाणी…

या गावातील शेकडो विद्यार्थी दरवर्षी कुठल्याही मोठ्या क्लासमध्ये न शिकता जेईईची परीक्षा पास होतात. याचं सगळं श्रेय गावात असणाऱ्या एका लायब्ररीला जातं. ही लायब्ररी चालवण्यासाठी सरकार  एकही रुपया देत नाही. तर जे गावातील विद्यार्थी आयआयटी पास होऊन परदेशात नोकरी करणाऱ्यासाठी गेले आहेत, अशा माजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीवर ही लायब्ररी चालते.

एका मोठ्या खोलीत ही लायब्ररी आहे. इथंच मुलांना शिकविण्यात येतं. त्यानंतर ही मुलं अभ्यासाला या लायब्ररीत बसतात. इथल्या लायब्ररीत पुस्तकांची संख्या कमी आहे. विद्यार्थांना अनेकवेळा नोट्स, गाईड, पुस्तकांची कमी असते. मात्र, तरीही इथले विद्यार्थी आयआयटीमध्ये डमिशन मिळवतात. इथं अभ्यास करायला मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा असते. 

१९९६ मध्ये गावातील जितेंद्र सिंग नावाच्या मुलाला आयआयटीमध्ये डमिशन मिळालं होतं.

त्यांच्यामुळे गावातील इतर मुलांना पण आयआयटी ॲडमिशन घेण्याची प्रेरणा मिळाली. जितेंद्रने ‘वृक्ष – बी चेंज’ नावानं एक संस्था उभारत गावात लायब्ररी सुरु केली. पटवाटोली गावासह खिजरसराय, बारा आणि डेल्हा यांसारख्या गावांमधून नक्षलवादी कारवायांचा फटका बसलेले विद्यार्थी या क्लाससाठी येतात. 

इथं आयआयटीचे तयारी करणारे १० वी आणि १२ वीचे विद्यार्थी येऊन अभ्यास करू शकत होते. यासाठी त्यांना कुठलेही पैसे देण्याची नाही. तसंच इथं परीक्षेसाठी लागणारे पुस्तकं उपलब्ध करून देण्यात येतात इथं ऑनलाईन क्लासची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. 

या गावातील सिनियर विद्यार्थी हे लायब्ररीत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना मार्गदर्शन करतात.    

आयआयटीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता. गया जिल्हा प्रशासनाच्या मदतीने बोध गया मठाच्या आवारात पटवाटोली गावातील लायब्ररीप्रमाणे एक नवीन लायब्ररी एप्रिल २०२२ पासून सुरु करण्यात आली आहे. 

माजी विद्यार्थांनी दिलेली पुस्तकं आणि नोट्स विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ठेवण्यात आल्या आहेत. पुढच्या काही वर्षात गया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारची लायब्ररी सुरु करण्यात येणार आहे. आयआयटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थांना याचा फायदा होईल.

मागच्या २५ वर्षांत पटवाटोली आणि आसपासच्या गावातील ३०० विद्यार्थांनी देशभरातील आयआयटीमध्ये प्रवेश मिळविला आहे. या गावातील आयआयटीमध्ये प्रवेश मिळविणारा पहिला विद्यार्थी जितेंद्र सिंग होता. तो आता अमेरिकेत स्थायिक झाला आहे.

जितेंद्र बरोबरच या गावातील इतर २५ विद्यार्थी आयआयटीचं शिक्षणपूर्ण करून अमेरिकेत स्थायिक झाले आहेत, असं स्थानिक रहिवासी आलोक कुमार यांनी सांगितलं.

सध्या वृक्ष संस्थेची लायब्ररी चंद्रकांत पाटेश्वरी सांभाळता. त्यांच्या म्हणण्यानुसार, पटवाटोली हे गाव  बिहारचं ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखलं जातं. इथं हातमाग यंत्राचा वापर करून बेडशीट, टॉवेल, रुमाल, तयार करण्यात येतो. 

मात्र या गावची ओळख आयआयटीयन्सचं गाव म्हणून झाली आहे.   

आजही पटवाटोली या गावात हातमाग यंत्र सुरु असतात. मात्र, त्या आवाजाने आयआयटीची तयारी करणाऱ्या मुलांच्या अभ्यासात खंड पडत नाही. इथल्या मुलांचा अभ्यासाचा पॅटर्न सुद्धा वेगळा आहे. त्याला ‘तेरा मुझको अर्पण’ असं नाव दिलं आहे. इथल्या विद्यार्थ्यांचं प्रेरणस्थान हे त्यांचे सिनियर आहेत. त्यांच्याकडून ते गायडन्स घेत असतात.  

तसंच पटवाटोली गावातील विद्यार्थी आयआयटीकडे वळण्याचं कारण म्हणजे १९९८-९९ यंत्रमाग हे विजेच्या कमतरतेमुळे बंद करावं लागलं. व्यवसायाच्या संधी कमी झाल्यामुळे अनेक कुटुंबं शिक्षणाकडे वळली, त्यामुळे फायदा झाल्याचं हे गावकरी सांगतात. आता गावातील प्रत्येक घरात एक इंजिनियर झाला असून तो जगभरात पोहचला आहे. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.