फक्त बंडातात्याच नाही तर जगभरात बिल गेट्सने कोरोना आणला हि अफवा फेमस आहे

हा कोरोना म्हणायचं कि आणि काय कळेना. रोज नवनव्या बातम्या आणि रोज नवनव्या अफवा. आपली तर सुरवात काय तर घंटा वाजवून झाली. रोज कोमट पाणी आणि काढा हा तर जीवनाचा भाग झाला. युट्युब वाल्यानी तर उच्छाद मांडलाय. सारखं उठून कुठल्या तर डॉक्टरच नाव घेत काय न काय उपचार सांगितले जात आहेत.

कोण प्राणायाम सांगालय तर कोण होमिओपथी. हे सगळं चालू असताना मृत्यूची संख्या कमी होताना दिसत नाही. काय खरं काय खोटं कळेना. चीनच्या नावाने बोटं मोडून मोडून दुखायची वेळ आली पण कोरोना काय थांबायचं नाव घेईना.

त्यात लसी आल्या आणि अजून कन्फ्युजन वाढलं. रशिया वाले म्हणत्यात आमची लस ९०% इफेक्टिव आणि कोण काय वेगळा दावा करतंय. सगळं गोंधळ झालाय.

अशातच हे सगळं कमी कि काय म्हणून हभप महाराज बंडा तात्या कराडकर यांनी  आज एक प्रसिद्धी पत्रक काढलं. ते यात म्हणाले,

“कोरोनाला नागरिकांनी घाबरून जाऊ नये. हा जीवघेणा रोग नाही. तो बिल गेट्स यांच्या डोक्यातील कल्पना आहे. आयुर्वेदात त्याच्यावर उपचार आहेत पण सरकार त्याला प्राधान्य देत नाही. त्यांना गेट्सने बनवलेली औषध खपायची आहेत म्हणून हा सगळा बनाव सुरु आहे.”

हे ऐकल्यावर जनतेच्या बत्त्या उडाल्या. अनेक जण तर वारकरी संप्रदायातील एवढे मोठे महाराज म्हणतात तर त्यात काही तरी खरं असणार असं मानून जातायत. यापूर्वी देखील श्री.शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरुजी यांनी देखील कोरोना हा काही रोग नाही वगैरे मते मांडली होती.

सोशल मीडियावर या सगळ्यांना जोरात ट्रोल करण्यात आलं. नेटकऱ्यांनी त्यांचे अक्षरशः वाभाडे काढले. इकडं लोक मरत आहेत आणि महाराज शहाणपणा शिकवालेत असंही काहीजण म्हणत होते. 

पण मुख्य प्रश्न आला की पंढरपूरच्या महाराजांना बिल गेट्सने कोरोना आणलाय असं का म्हणावसं वाटलं? बिल गेट्सचं का ? मार्क झुकरबर्ग, गेला बाजार आपले अंबानी वगैरे यांची नाव त्यांनी का घेतली नाहीत? 

आमच्या एका भिडूने याची लिंक दिली आणि आमचं डोकं भिरभीरलं. बिल गेट्स ने कोरोना तयार केलाय हि अफवा फक्त भारतात नाही तर जगभरात फेमस आहे. मोठमोठ्या देशातले सुशिक्षित लोक याला खरं मानतात, त्यावर चर्चा करतात.

बिझनेस टुडे या वृत्त संस्थेच्या दाव्यानुसार गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाची साथ सुरु झाली तेव्हा फक्त फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांचा डाटा बघितला तर जगभरात तब्ब्ल १२ लाख वेळा टीव्ही चॅनेल आणि सोशल मीडियावर बिल गेट्सचा कोरोना निर्माण करण्यात हात आहे का यावर चर्चा झाली. न्यूयॉर्क टाइम्स सारख्या वृत्तपत्रात त्याचा डिटेल ऍनालिसीस छापून आलाय.

आता बिल गेट्स कोण हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही.

मायक्रोसॉफ्ट सारख्या क्रांतिकारी कंपनीचा निर्माता, आपल्या घरी कॉम्युटर दिसायला लागले ते गेट्समामा मुळे हे तर सगळ्यांना ठाऊक आहे. कित्येक वर्ष जगातला श्रीमंत माणूस म्हणून तो एक नंबरला राहिला. या साठी त्याने पण हजार भानगडी केली असतीलच, नाही असं नाही. कोणाची तरी आयडिया चोरली, कोणाला दगा दिला असं आपण खूप काही वाचत देखील असतो.

पण गेट्स मामा आपल्या पैसे कमवण्यासाठी करोडो लोकांना मारणारा रोग शोधून काढेल हे सांगूनही पटत नाही.   

विशेषतः आता जेव्हा तो मायक्रोसॉफ्ट मधून रिटायर झालाय. तो आपल बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन बनवून त्यातून पैसे दान करत सुटलाय. असं म्हणतात की त्याने आजवर आपली ९० % संपत्ती दान देऊन टाकली आहे.

मग असं असलं तरी त्याच्यावर हे कोरोनाचे आरोप कुठून सुरु झाले?

हे सगळं झालं बिल गेट्सने ६ वर्षांपूर्वी केलेल्या एका भाषणामुळं. गोष्ट आहे २०१५ सालची. आता युट्युबवर वगैरे फेमस झालेल्या टेड टॉक मध्ये गेट्स मामांना पण आमंत्रण आलं होतं. कॅनडाच्या  व्हॅन्कुव्हर मध्ये असलेल्या कॉन्फरन्स मध्ये आपलं नेहमीच इन्स्पिरेशनल भाषण देता देता बिल गेट्स म्हणाला,
“येत्या काही दशकांमध्ये जर जगातली कोट्यवधी माणसे मेली तर त्याच कारण हे युद्ध नसून एखादा जीवघेण्या आजाराची साथ असणार आहे.”
गेट्स मामा बोलून गेले. तेव्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि विसरून देखील गेले. पण मागच्या वर्षी जेव्हा कोरोना सुरु झाला तेव्हा कुठल्या तरी महाभागाने हे भाषण उकरून काढलं. 
झालं तिथून राडा सुरु झाला. आधीच मास्क, सोशल डिस्टंसिंग वगैरे ऐकून लोकं वैतागले होते, लॉक डाऊन मुळे वेळ देखील भरपूर होता. मग काय डालगोना कॉफी फेटत फेटत चर्चा सुरु झाली.  संशयाच्या सुया चीन नंतर बिल गेट्सवर रोखल्या गेल्या.
बिल गेट्सला आधीच माहित होतं इथं पासून ते त्याने स्वतःच कोरोना निर्माण केलाय इथं पर्यंत आरोप झाले. त्याने या महाभयंकर रोगावर औषध शोधून ठेवलंय आणि तो ते मोठ्या किंमतीत विकणार असा अनेकांचा समज झाला.

आजवर आपण हॉलिवूड सिनेमात बघतोयच कि. एक सुपर रिच माणूस असा एखादा रोग बनवतोय, एखाद्या शहरावर हल्ला करतोय. मग सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन वगैरे मंडळी आकाशातून उगवतात आणि सुपर व्हिलनला संपवून गावाचं रक्षण करतात. (आपल्या भारतीयांनी शक्तिमान, ज्युनियर जी चे एपिसोड आठवावेत. ) असो. तर अशा सुपरहिरो कॉमिकमुळे आपली मानसिकता तशी तयार झाली होती.

शिवाय घरातल्या कटकटी, भांडी धुणे, सासू सुनांची भांडणे सोडवणे, वर्क फ्रॉम होम करता करता बॉसच्या शिव्या खाणे यात डोकं आउट होऊन गेलेलं. अशातच बिल गेट्स सापडलाय तर लोकांनी त्याला आडवा करून टाकले.

एव्हेंजर पब्लिकच तर म्हणणं आहे कि गेट्सला जगाची लोक संख्या कमी करायची आहे म्हणून तो सगळं उपद्व्याप मांडलाय.

एकूण काय तर गेट्सने हे केलाय यावर खात्री बसली होती. पण मूळ प्रश्न आहे कि कॉम्प्युटरची ओएस बनवणारा बिल मामा कोरोनाच औषध का तयार करेल? करत असला तर ते कुठं करतोय? आणि जगाची लोकसंख्या कमी केला तर त्याचेच कस्टमर कमी होणार नाहीत काय?

पण असले लॉजिकल प्रश्न कोरोना काळात विचारायचे नाहीत असं म्हणतात.

इस्रायली इतिहास तज्ज्ञ युवाल नोव्हा हरारी सांगतात कि आजवर जेव्हा जेव्हा मोठी संकटे आली आहेत तेव्हा अशा वेगवगेळ्या कॉन्स्पिरसी थियरीची अफवा पसरणे पाहण्यात आलंय. त्यातही बिल गेट्स सारख्या गडगंज श्रीमंत, सुप्रसिद्ध व्यक्तींची यात सालं काढली जातात हे नक्की.

पण म्हणून लगेच कॉन्स्पिरसी थिएरीला वेड्यात काढून रिकामं होणे हे सुद्धा बरोबर नव्हे. त्यांची खच्चून तपासणी करायची हे सुद्धा सुजाण नागरिकच काम आहे असं सुद्धा हरारी म्हणतात.

तिकडं बिल गेट्स मामा जगभरात कोरोना विरुद्ध लढ्यासाठी लाखो कोटी रुपये खिशातनं खर्च करलाय आणि त्याच्याच देशातले लोक त्याला सुपर व्हिलन म्हणालेत.

आता ज्या देशाचे राष्ट्राध्यक्ष स्वतः डोनाल्ड ट्रम्प तात्या राहून गेलेत, जे व्हेपोरब वापरून कोरोना पळवून लावणार होते तिथं लॉजिकची अपेक्षा ठेवणं तस धाडसाचं काम आहे.

पण एक मात्र नक्की की कराड असो की कॅलिफोर्निया, अफवाच मार्केट सगळ्यात जास्त पळतंय. त्यामुळं दोस्तांनो सावधान रहा , सतर्क रहा, कोमट पाणी प्या आणि व्हाट्स विद्यापीठापासून काळजी घ्या.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.