नोटांनी भरलेली ब्रिफकेस घेऊन धर्मेंद्र स्व.बिमल रॉय यांच्या घरी पोहचला..

धर्मेंद्र हा बॉलिवुड मधला एक वेगळा कलाकार. धर्मेंद्र अभिनेता म्हणून जितका ग्रेट आहे तितकाच तो एक माणूस म्हणून पण काहीसा वेगळा आहे. वयाची ८० ओलांडली तरीही धरमपाजी कायम उत्साहात असलेले दिसतात. धर्मेंद्र बॉलिवुडमध्ये एक यशस्वी कलाकार असले तरीही हे यश गाठण्याचा त्यांचा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. धर्मेंद्रला स्ट्रगलच्या काळात बिमलदा यांनी खूप मदत केली.

बिमलदा म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक बिमल रॉय. धर्मेंद्र आणि बिमल रॉय यांच्यामध्ये असलेल्या वेगळ्या नात्याचा हा किस्सा…

अभिनेता होण्याचं स्वप्न उराशी बाळगून धर्मेंद्र भारतीय सिनेसृष्टीत दाखल झाला. सुरुवातीला काम मिळतं नव्हतं. तेव्हा बिमल रॉय यांच्याकडे धर्मेंद्रने सिनेमात काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. बिमल रॉय यांची नामवंत दिग्दर्शक म्हणून हिंदी सिनेसृष्टीत ओळख होती. ‘दो बिघा जमीन’ हा बिमल रॉय यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा प्रचंड गाजला होता.

त्यामुळे बिमल रॉय यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमामध्ये काम मिळावं, ही त्याकाळी प्रत्येक नवख्या कलाकाराची इच्छा होती.

जेव्हा धर्मेंद्रचा स्ट्रगलचा काळ होता तेव्हा त्याने बिमल रॉय यांच्याकडे काम मिळवण्याची आशा केली. बिमल रॉय यांनीही धर्मेंद्रला मदतीचा हात दिला. नवख्या धर्मेंद्रला त्यांनी सिनेमाच्या तंत्राविषयी आणि अभिनयाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या.

त्यांनी धर्मेंद्रला घेऊन एक सिनेमा सुद्धा बनवला. त्या सिनेमाचं नाव ‘बंदिनी’.

धर्मेंद्रच्या करियरमधला हा एक उत्कृष्ट सिनेमा मानला जातो. या सिनेमामुळे एक अभिनेता म्हणून धर्मेंद्रला वेगळी ओळख मिळाली.

‘बंदिनी’च्या आधी १९६१ साली आलेल्या ‘शोला और शबनम’ या सिनेमात धर्मेंद्र प्रथमच प्रमुख भूमिकेत झळकणार होता. तेव्हा धर्मेंद्रने सिनेमातले त्याचे काही शॉट्स बिमल रॉय यांना आवर्जून दाखवले आणि त्यांचं मत जाणून घेतलं. बिमल रॉय यांचं धर्मेंद्रच्या आयुष्यात विशेष स्थान होतं.

हळूहळू धर्मेंद्र एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमांमध्ये अभिनय करून मोठा स्टार झाला. बिमल रॉय यांनी ‘बंदिनी’नंतर धर्मेंद्र सोबत आणखी एक सिनेमा बनवण्याची तयारी सुरू केली. सिनेमाचं नाव होतं ‘चैताली’. सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली. बिमल रॉय यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता.

सिनेमाचं अर्ध शूटिंग पूर्ण झालं. आणि या दरम्यान ८ जानेवारी १९६६ रोजी बिमल रॉय यांचं निधन झालं.

मनोबीना रॉय यांना पतीचा अपूर्ण राहिलेला प्रोजेक्ट पूर्ण करण्याची इच्छा होती. परंतु त्यांना लोकांची साथ मिळत नव्हती. ‘चैताली’ सिनेमाशी संबंधित जे कलाकार आणि तंत्रज्ञ होते, त्यांनी मनोबीनाजींकडे राहिलेल्या पैशांची मागणी करायला सुरुवात केली.

तुम्ही आमचे उरलेले पैसे द्या तरच हा सिनेमा आम्ही पूर्ण करू, अशी सर्वांनी भूमिका घेतली.

या गडबडीत सिनेमाच्या नायिका शर्मिला टागोर यांनी हा सिनेमा सोडला.

हे सर्व प्रकरण धर्मेंद्रच्या कानावर आलं.

आर्थिक समस्यांमुळे बिमल रॉय यांच्या पत्नी बिमलदांचा अपूर्ण राहिलेला ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करू शकत नाहीत’,

ही गोष्ट धर्मेंद्रला कळाली. एक दिवस हातात एक ब्रिफकेस घेऊन बिमल रॉय यांच्या घरी धर्मेंद्र गेला. धर्मेंद्रला पाहताच बिमलदांच्या पत्नीला आश्चर्य वाटलं. धर्मेंद्रच्या हातात त्यांनी ब्रिफकेस बघितली. तेव्हा त्यांची खात्री पटली की, धर्मेंद्र सुद्धा इतरांसारखे सिनेमाचे राहिलेले पैसे मागायला आला आहे.

बिमल रॉय यांची पत्नी धर्मेंद्रला काही बोलणार इतक्याच धर्मेंद्र म्हणाला,

“मला ठाऊक आहे की बिमलदांचा अपूर्ण राहिलेला ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यात तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बिमलदांचं माझ्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान होतं. त्यामुळे त्यांचा हा अपूर्ण राहिलेला प्रोजेक्ट पूर्ण होणारच. तुम्ही काळजी करू नका.”

धर्मेंद्रने अधिक काही न बोलता हातातली ब्रिफकेस उघडली. त्यामध्ये भरपूर पैसे होते. नोटांनी भरलेली ती ब्रिफकेस धर्मेंद्रने बिमलदांच्या पत्नीच्या हातात दिली.

फक्त पैशांची मदत करून धर्मेंद्र थांबला नाही. तर शर्मिला टागोरच्या ऐवजी सायरा बानो यांना धर्मेंद्रने सिनेमात काम करण्यास तयार केले. तसेच बिमल रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले त्यांचे सहाय्यक ऋषिकेश मुखर्जी यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली.

अखेर हा सिनेमा पूर्ण व्हायला काहीसा वेळ लागला. परंतु हा सिनेमा पूर्ण झाला. आणि १८ सप्टेंबर १९७५ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला.

अशाप्रकारे धर्मेंद्रने घेतलेल्या पुढाकाराने बिमल रॉय यांचा ड्रीम प्रोजेक्ट ते गेल्यानंतर पूर्ण झाला. ज्या बिमल रॉय यांनी धर्मेंद्रला त्यांच्या सुरुवातीच्या काळात मदत केली होती त्याच बिमल रॉय यांच्या उपकारांची अनोखी परतफेड धर्मेंद्रने केली.

सिनेमा चांगला असो वा वाईट, धर्मेंद्र आजही त्याच उत्साहात अभिनय करताना दिसतात. या वयात तरुणांना लाजवेल अशी त्यांची एनर्जी थक्क करणारी आहे. लोकांच्या मनात या एव्हरग्रीन कलाकाराविषयी कायमच एक विशेष स्थान राहिलं आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.