आठवड्याच्या २५ रुपये पगारावर अमिन सयानींबरोबर ‘बिनाका’ने करार केला अन् इतिहास घडला 

सध्या युट्यूब, फेसबुक अशा सोशल मिडीयामुळे रेडीओ वगैरे ऐकायला कोणाकडे इतका वेळ असतो. टी.व्ही.चं प्रस्थही वाढत चाललंय. मालिका, सिनेमे अशा गोष्टी टी.व्ही.वर पाहण्यास लोकांचं प्राधान्य असतं.

पण भिडूंनो, थोडं मागे डोकावल्यास असं लक्षात येतं, घरामध्ये स्वतःची खास जागा असणारं एक उपकरण असायचं,

ते म्हणजे रेडीओ.

सध्या टी.व्ही.वर क्रिकेट सामन्यांचं थेट प्रक्षेपण पाहता येतं. हेच सामने जेव्हा रेडीओवर ऐकतो, तेव्हा मात्र सामन्याचा थरार क्षणाक्षणाला उत्कंठा शिगेला पोहचवत असतो. हर्षा भोगले सारखी मंडळी जेव्हा रेडीओवर स्वतःच्या आवाजाने क्रिकेट सामन्याचं समालोचन करायचे, तेव्हा संपुर्ण सामन्याचं दृश्य आपल्या डोळ्यांसमोर साकार व्हायचं.

असाच रेडीओवरील एक आवाज ४० वर्ष रेडीओ ऐकणा-या सर्वांच्या मनात घर करुन राहिला, तो आवाज म्हणजे अमीन सयानींचा. 

अमीन सयानी हे नाव वाचताच अनेक जणांच्या मनात सहज जुना काळ तरळला असेल. टी.व्ही. चा जन्म तेव्हा झाला नव्हता. यावेळेस अमीन सयानींच्या जादुई आवाजाचा सुंदर असा ‘बिनाका गीतमाला’ हा रेडीओवरील कार्यक्रम आवर्जुन ऐकला जायचा.

या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की या कार्यक्रमाने ‘बिनाका’ या टूथपेस्ट ब्रँडला घराघरात पोहचवले. तसेच भारतासोबतच दक्षिण आशिया, युरोप अशा देशांमध्ये सुद्धा ‘बिनाका गीतमाला’ कार्यक्रमाचे असंख्य चाहते होते. 

सर्वप्रथम ‘बिनाका गीतमाला’ कार्यक्रमातील ‘बिनाका’ विषयी तुम्हाला सांगतो…

‘ओरल हायजीन एफएमजीसी ब्रँड रेकिट बेंकिसर’ या कंपनीद्वारे १९५१ साली ‘बिनाका’ची निर्मिती केली गेली. १९७० च्या दशकात टूथपेस्ट म्हटलं की ‘पेप्सोडेंट’, ‘कोलगेट’ यासोबतच ‘बिनाका’ला सुद्धा लोकांची पसंती होती. ‘बिनाका’ टूथब्रश आणि टूथपेस्टच्या पाकीटांमध्ये छोटी खेळणी आणि वाॅटरप्रुफ स्टिकर सुद्धा ठेवण्यात आले. या गोष्टींमुळे लहान मुलांच्या मनात ‘बिनाका’बद्दल आकर्षण निर्माण झाले.

पुढे ‘बिनाका’ला अमीत सयानींच्या आवाजाची साथ मिळाली आणि हा ब्रँड अधिक जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचला. 

‘जी हाँ भाइयो और बहनो|

मै आपका दोस्त अमीनसयानी बोल रहा हूँ

और आप सुन रहे है बिनाका गीतमाला|’

हा आवाज कानावर पडताच घरातले सर्व सदस्य रेडीओ ऐकायला बसायचे. रेडीओ सिलोन या रेडीओस्टेशनवर १९५२ ते १९८९ या काळात, तर पुढे १९९४ पर्यंत आकाशवाणीच्या विविध भारती नेटवर्कवर ‘बिनाका गीतमाला’ कार्यक्रम प्रसारीत व्हायचा.

पुढे बाजारात अनेक डेंटल ब्रँड आल्यामुळे ‘बिनाका’ स्वतःचं अस्तित्व टिकवु शकलं नाही. १९९६ साली ‘डाबर’ कंपनीने १२ मिलीयनमध्ये ‘बिनाका’ला खरेदी केलं. असं असलं तरी, आजही अमीन सयानींच्या ‘बिनाका गीतमाला’ कार्यक्रमामुळे ‘बिनाका’ हे नाव अजरामर झालंय. 

अमीन सयानींचा आवाज हा श्रोत्यांसाठी जवळचा विषय.

भिडूंनो, आवाजाचा जादूगार असलेल्या या माणसाला सुरुवातीला रेडीओवर कार्यक्रम करण्यासाठी नापसंती देण्यात आली होती.

१९५० पासुन अमीनजी रेडीओ जाॅकी बनण्यासाठी प्रयत्न करत होते. सेंट झेव्हियर्स काॅलेजमधुन अमीन सयानींनी पदवी शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर ऑल इंडीया रेडीओसाठी ‘हिंदी ब्राॅडकास्टर’ या पदासाठी त्यांनी अर्ज केला. ‘स्क्रिप्ट वाचण्याचं उत्तम कसब तुमच्याकडे आहे, परंतु तुमच्या उच्चारणात गुजराती आणि इंग्रजी भाषेचं मिश्रण आहे, जे रेडीओसाठी योग्य नाही.’ असं सांगुन अमीन सयानींना नाकारण्यात आलं होतं. 

यावेळेस मार्गदर्शक आणि मोठा भाऊ हामिद सयानींनी अमीनला मदत केली. रेडीओ सिलोनचे हामिद निर्माते होते. त्यांनी अमीनला खचुन न जाता रेडीओवरील कार्यक्रम ऐकण्यास सांगीतलं. रेडीओवरील निवेदकांच्या शैलीचा अभ्यास करायला सांगीतला. अमीनने भावाच्या म्हणण्याचा गांभीर्याने विचार करुन, निवेदकांची शैली ऐकुन त्याचा कसुन अभ्यास केला. 

यादरम्यान रेडीओ सिलोनचे एक निर्माते बालगोविंद श्रीवास्तव यांनी अमीन सयानींचा आवाज ऐकला. जो माणुस रेडीओवर जाहिरात वाचत होता, त्याच्या आवाजावर श्रीवास्तव नाखुश होते. स्टुडीओमध्ये उपस्थित असलेल्या लोकांना त्यांनी जाहीर विचारलं,”तुमच्यापैकी कोणी आहे का, जो स्क्रिप्ट चांगली वाचु शकेल.”

योगायोग म्हणजे अमीन सयानी तिथेच उपस्थित होते. त्यांनी हात वर करुन स्क्रिप्ट वाचण्यास तयारी दाखवली. 

अमीन सयानींनी एकदम मोठ्या आवाजात स्क्रिप्ट वाचली. त्यांचा आवाज इतका टिपेला पोहोचला होता की, श्रीवास्तव यांनी स्वतःचे कान बंद केले. ‘ही काय युद्धाची घोषणा नाहीय’, असं श्रीवास्तव रागात अमीनजींना म्हणाले. अमीनजींनी पुन्हा प्रयत्न केला. तेव्हा मात्र त्यांचा आवाज ऐकुन श्रीवास्तव प्रभावित झाले.

त्यांनी जाहीरातींचं वाचन करण्यासाठी अमीन सयानींचं नाव पक्क केलं. आणि इथुन अमीन सयानींचा रेडीओ प्रवास सुरु झाला. 

१९५१ साली ‘बिनाका’चा पाश्चात्त्य गाणी आणि संगीतावर आधारीत एक कार्यक्रम रेडीओ सिलोनवर सुरु होता. भारतीय श्रोत्यांना डोळ्यासमोर ठेऊन या कार्यक्रमाला हिंदी रुप देण्याचा निर्णय ‘बिनाका’ने घेतला.

एक कमी अनुभवी व्यक्ती जी या कार्यक्रमाचं लिखाण आणि निवेदनाची जबाबदारी सांभाळु शकेल, अशा व्यक्तीचा शोध प्रायोजकांना होता. प्रायोजकांना अमीन सयानींच्या रुपात असा माणुस मिळाला.

आठवड्याच्या २५ रुपये पगारावर अमिन सयानींबरोबर ‘बिनाका’ने करार केला. 

श्रोत्यांची येणारी पत्रं वाचणं, त्यांच्याकडून आलेल्या प्रतिक्रियांच्या अनुषंगाने हिंदी गाणी निवडणं, हे अमीन सयानींसाठी जबाबदारीचं काम. अमीन सयानींनी ही जबाबदारी आत्मविश्वासाने सांभाळली.

‘बिनाका गीतमाला’च्या पहिल्या प्रसारणानंतर अमीन सयानींना २०० पत्रं आली. दुस-या आठवड्यात ९००० तर पुढच्या आठवड्यात ६०००० इतकी पत्रं अमीन सयानींना मिळाली. २००० साली ‘बिनाका गीतमाला’ला रेडीओवरील उत्कृष्ट कार्यक्रम या वर्गवारीत गोल्डन एब्बी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

४० वर्ष या कार्यक्रमाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या काळात खुप गोष्टी बदलल्या. परंतु श्रोत्यांवर मोहिनी घालणारा अमीन सयानींचा आवाज तसाच राहिला. लोकांकडून आलेली पत्रं मनापासुन वाचणं, त्यांच्या गाण्यांच्या फर्माईश पूर्ण करणं, गोष्टी आणि किस्से सांगणं अशा सर्व गोष्टींमुळे ४० वर्ष हा कार्यक्रम श्रोत्यांचं मनोरंजन करत राहीला.

एकावेळी ९ ते २० लाख इतकी माणसं हा कार्यक्रम ऐकायचे. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की, सुरुवातीला कार्यक्रमाची वेळ अर्धा तास होती ती वाढवुन एक तास करण्यात आली. 

आज अमीन सयानी ८७ वर्षांचे झाले आहेत. अस्सल रेडीओ ऐकणा-यांच्या मनात ‘बिनाका गीतमाला’ कार्यक्रमामधील ‘जी हाँ भाइयो और बहनो’ हा अमीन सयानींचा सदाबहार आवाज कायम रुंजी घालत राहील. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.