धारावी उभी ब्रिटिशांनी केली, पण तिला साम्राज्य बनवलं ते मुंबईच्या पहिल्या हिंदू डॉननं
धारावी. आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी. कित्येक बॉलिवूड पिक्चरमधून दिसलेली, निळ्या रंगाच्या ताडपत्रीनं झाकलेली आणि जिच्या पोटात हजारो रहस्य दडलेली असतात अशी ही वस्ती. धारावीच्या चिंचोळ्या बोळांमध्ये तुम्हाला भेटलेला माणूस सज्जन होता की गुन्हेगार, हे एका भेटीत पटकन समजून येत नाही. इथं गरीब लोकं गरीबांसारखी राहतातच, पण श्रीमंत लोकंही गरीबांसारखीच राहतात. इथली गरीबी बघायला फॉरेनमधूनही गर्दी होते आणि इथली जवळपास निम्मी जनता तमिळ बोलते. पण कुणामुळं?
मुंबईत तमिळ माणसांना आणलं कुणी? पोलिसांच्या टेबलवर काळा चहा येणं ही कुणाच्या आगमनाची वर्दी असायची? मुंबईच्या अंडरवर्ल्डचा पहिला हिंदू डॉन कोण होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका नावावर येऊन थांबतात…
वरदराजन मुनीस्वामी मुदलियार उर्फ वरदा
तमिळनाडूच्या वेल्लोरमध्ये जन्मलेला वरदा आपल्या गरिबीला कंटाळून मुंबईत आला. इथं स्वप्न बघायलाही मर्यादा नव्हती आणि पोटापाण्याचे मार्ग शोधायलाही. वरदा स्टेशन जवळच्या एका गल्लीत राहायचा आणि हमाली काम करायचा. त्यातून उरलेला दिवस चांगली आणि वाईट अशी दोन्ही कामं करणाऱ्या मित्रांसोबत घालवायचा. या मित्रांकडून तो चोरी करायला शिकला नसला, तरी विनाकष्ट पैसे कमवायचं मात्र शिकला होता.
हमालीतून कमी पैसे येत असले, तरी वरदा न चुकता दर्ग्याबाहेरच्या लोकांना खायला घालायचा. पण मग वरदा गुन्हेगारी विश्वाकडे कसा वळला? तर याचं उत्तर सापडतं दारुबंदीमध्ये. सरकारी नियमांनुसार दारु बंद झाली असली, तरी हातभट्टीच्या व्यवसायाला आणि व्यसनाला मात्र बळ मिळालं.
याच हातभट्टीच्या व्यवसायात डेरिंगबाज पोरांची गरज होती.
वरदामध्ये डेरिंग तर होतीच, पण त्याचा महत्त्वाचा गुण होता तो म्हणजे बोलबच्चनगिरी. कधी पोलिसांच्या तावडीत सापडलाच, तरी आपल्या बोलण्याच्या जोरावर वरदा बाहेर पडायचा. हातभट्टया मुंबईतल्या वर्दळीच्या झोपडपट्ट्यांमध्येच बस्तान बसवून होत्या. हा व्यवसाय करणाऱ्या तत्कालीन दादांसाठी वरदा सारखा डेरिंगबाज आणि बोलबच्चन माणूस कामाचा होता.
पण वरदाच्या डोक्यात वेगळीच चक्र सुरू होती…
त्यानं स्वतः दादा व्हायचं ठरवलं. बाकीचे हातभट्टीवाले आपला धंदा आहे तेवढीच दारु बनवायचे आणि पैसे कमवून थंड व्हायचे. पण वरदानं हातभट्टीच्या धंद्यातून आलेला पैसा, पुन्हा याच धंद्यात गुंतवला. हळूहळू पैशांचा ओघ वाढला, कामाचा व्याप वाढला आणि माणसांची गरजही.
वरदाचा धंदा धारावीमध्ये होता. धारावीमध्ये तेव्हा तमिळ जनता भरपूर प्रमाणात होती. पण त्यांच्या हाताला भरपूर पैसा देणारं काम मात्र नव्हतं. वरदानं ही कोंडी फोडली, तो आता वरदाभाई झाला होता. कारण तो लोकांना काम देऊ लागला, साहजिकच कामाच्या शोधात तमिळनाडूवरुन कुठलाही माणूस आला, तरी तो मदत मागायला वरदाभाई कडेच जायचा.
वरदा स्वतः गरीब पार्श्वभूमीतून आलेला असल्यानं लोकांची करुण कहाणी ऐकली की तो त्यांना लगेच काम द्यायचा. त्यामुळं तो मसीहा वाटत असला, तरी त्याची कामं करणं हाच गुन्हा होता. तमिळनाडूमधून माणसं आणून वरदानं मुंबईतलं आपलं साम्राज्य वाढवलं. या माणसांना राहायला जागा मिळाली, ती धारावीमध्येच.
धारावी फुगत गेली आणि वरदाचं साम्राज्य नावारुपाला आलं.
हातभट्टीचा धंदा त्यानं धारावीच्या बाहेर, सायन-कोळीवाडा, माटुंगा आणि चेंबूरच्या वस्त्यांमध्येही वाढवला. कामाला फक्त तमिळ माणसंच नाही, तर निवृत्त पोलीसही ठेवले. १९६० च्या दशकात जिथं शंभर रुपये म्हणजेही प्रचंड मोठी रक्कम होती, तिथं वरदाचा धंदा होता वर्षाला १२ कोटींचा. तो पोलिसांना हप्ताच अड्ड्यामागं पाच हजार द्यायचा. साहजिकच त्याला पोलिसांकडून अभय मिळालं होतं.
वरदाच्या पोलिसांवर असलेल्या वर्चस्वाबाबत एस हुसैन झैदी लिहितात,
“अनेक पोलिस स्टेशनमध्ये ठरलेल्या वेळी चहा यायचा. पण चहा देणारा पोऱ्या अचानक स्टेशनमध्ये आला आणि दूध न टाकलेला कोरा चहा (पोलिसांच्या भाषेत काला पानी) टेबलवर ठेऊन पैसे न घेता गेला, तर स्टेशनमधले अधिकारी लोकांना बाहेर काढायचे आणि हातातली कामं थांबवायचे.
कारण ती काला बाबू येतोय, याची वर्दी असायची.”
आता पोलिसांवर होल्ड असलेला काला बाबू कोण हे वेगळं सांगायला नको.
सगळ्या प्रतिस्पर्ध्यांना संपवून दारुच्या धंद्यातून वरदा प्रचंड पैसे छापत असला, तरी त्यानं दुसऱ्या धंद्यातही आपले पाय रोवले होते. तो होता वेश्याव्यवसाय. या धंद्यात त्यानं उघडपणे भाग घेतला नसला, तरी कधी आपल्या माणसांना विरोधही केला नाही. हा धंदा पूर्णपणे तृतीयपंथीयांच्या हातात दिला होता. तृतीयपंथीयांना समाजात इज्जत मिळत नव्हती, त्यांना वरदानं काम दिलं. हे काम किती विकृत आहे, याकडे दुर्लक्ष करत त्यांनीही वरदाला मसीहा बनवण्यात धन्यता मानली.
वरदाच्या महत्त्वकांक्षा वाढल्या होत्या. सरकारी मालमत्ता चोरण्याच्या प्रकरणात तो जेलमध्ये गेला आणि तिथं त्याला हाजी मस्तान भेटला.
वरदाची डेरिंग आणि माणसांचं प्रचंड नेटवर्क यामुळं मस्ताननंही वरदाला आपल्या धंद्यात सामील करुन घेतलं. आता दोघं मिळून तस्करी करू लागले. वरदानं सरकारी कारभारातल्या त्रुटी शोधून काढल्या आणि तो माल येणाऱ्या बंदरांवरही एकहाती सत्ता गाजवू लागला.
फक्त बुद्धीच्या जोरावर त्यानं रक्तपात न करता कोट्यावधी रुपये कमावले.
त्याच्या माटुंग्यातल्या गणपतीचा थाट मोठा असायचा, इतका की मोठमोठे अभिनेतेही तिथं हजेरी लावायचे. यामुळंच वरदानं पहिला हिंदू डॉन म्हणून आपली ओळख निर्माण केली. वरदाराजननं मध्य मुंबई आपल्या टाचेखाली आणली. त्याची दहशत मुंबईवर कायम राहिली असतीच, मात्र वाय. सी. पवार या मराठमोळ्या पोलिस अधिकाऱ्यानं वरदाला जेलमध्ये इतका धुतला की त्यानं मुंबई सोडली. पुढं चेन्नईत त्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला.
हाजी मस्ताननं खासगी विमानानं वरदाराजनचं पार्थिव मुंबईत आणलं, त्यावेळी त्याचा अंमल असणाऱ्या भागातली लोकं रडली, दुःखी झाली, पण घाबरली नाहीत. हमाली कामापासून सुरुवात करत सगळ्या अवैध धंद्यांमध्ये वरदानं जम बसवला.
काही लोकांसाठी तो मसीहा असला, तरी पोलिस खात्यात त्याची नोंद क्रूरकर्मा अशीच आहे आणि राहीलही…
संदर्भ: डोंगरी ते दुबई, एस. हुसेन झैदी
हे ही वाच भिडू:
- एका घटनेतल्या प्रामाणिकपणामुळे हाजी मस्तान मुंबईच्या गुन्हेगारीचा ‘ सुलतान ‘ बनला तो कायमचाच….
- महालक्ष्मी पापामणी: कोटींचं साम्राज्य झोपडपट्टीतून चालवणारी मुंबईची श्रीमंत ड्रगलॉर्ड
- कृष्णेचा वाघ बापू बिरू जेव्हा अरूण गवळीला भेटला तेव्हा…