बर्ड फ्लूला हलक्यात घेऊ नका, त्याचा इतिहास कोरोनापेक्षा जास्त जीवघेणा आहे…

देशात सध्या कोरोनाच्या आजारावर नियंत्रण मिळतय असं वाटत असतानाच आता बर्ड फ्लू या जुन्या आजारानं नव्यानं डोकं वर काढलं आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ आणि पंजाब या राज्यात हा आजार प्रामुख्याने आढळून आला आहे. ‘बर्ड फ्लू’मुळे मोठ्या संख्येने पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याने या राज्यात अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

त्यातल्या त्यात महाराष्ट्रासाठी दिलासादायक बाब म्हणजे राज्यात ‘बर्ड फ्लू’मुळे मृत्यू झालेले पक्षी अजून तरी आढळून आलेले नाहीत. पण खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारनेही राज्यभर अलर्ट जारी केला आहे.

पण मित्रांनो, तुम्ही म्हणाल हा तर पक्षांना होतोय, आम्ही कशाला घाबरू तर तसं अजिबात समजू नका. आम्ही घाबरवत नाही, पण ह्या आजाराला अजिबात हलक्यात घेऊ नका. कारण तो माणसांना पण होतो जो की कोरोनापेक्षा जीवघेणा आहे.

कोरोनामध्ये मृत्यूदर ३ ते ५ टक्के असाच आतापर्यंत राहिला आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारी नुसार या बर्ड फ्ल्यूचा मृत्यूदर तब्बल ६० टक्के इतका आहे.

आता कसा आणि कधीपासूनच ते पण सांगतो.

पण त्याआधी जरा बर्ड फ्ल्यूची शास्त्रीय माहिती आणि इतिहास शांतपणे वाचून समजून घ्या. म्हणजे पुढचं समजायला सोपं जाईल.

बर्ड फ्लू (Bird Flu) अर्थात एवियन इंफ्लूएंजा (Avian Influenza) असं नाव आहे. या इंफ्लूएंजाचे एकूण ११ वायरस आहेत जे मनुष्याला संक्रमित करतात. पण त्यात एकूण ५ वायरस मानव जातीला जास्त जीवघेणे असल्याचं समोर आलं आहे.

यात H5N1, H7N3, H7N7, H7N9 आणि H9N2 असे ५ वायरस आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार यात पण H5N1 हा बर्ड फ्लू वायरस सर्वात आढळून येतो आणि तोच जीवघेणा देखील आहे. त्याच्या देखील २ स्ट्रेन आहेत. पहिली नॉर्थ अमेरिकन म्हणजे Low pathogenic avian influenza H5N1 (LPAI H5N1) आणि दुसरी एशियन लीनिएज Asian lineage HPAI A(H5N1).

नॉर्थ अमेरिकन H5N1 बर्ड फ्लू वायरसने १९६६ पासून आतापर्यंत ८ वेळा म्यूटेशन केलं आहे. तर एशियन लीनिएज म्यूटेशनची शास्त्रज्ञांना गिनतीच करता आलेली नाही.

H5N1 बर्ड फ्लू वायरसने सगळ्यात पहिल्यांदा १९५९ साली स्कॉटलंडमध्ये कोंबड्याना मारलेलं. त्यानंतर १९९१ साली इंग्लंडमधील पक्षांचा जीव घेतला होता. पण तो पर्यंत हा वायरस माणसांमध्ये आढळला नव्हता.

माणसांना H5N1 बर्ड फ्लू वायरसने पहिल्यांदा संक्रमित केलं ते १९९७ मध्ये. या केसेस चीनच्या गुआंगडोंगमध्ये मिळाल्या होत्या. त्यानंतर हॉंगकॉंगमध्ये १८ लोक बाधित झाली होती. यातील ६ जणांचा मृत्यू झाला. पहिल्यांदाच कोण्या मनुष्याचा या आजाराने जीव गेला होता. 

चीन नंतर बर्ड फ्लू वायरसने २००३ मध्ये दक्षिण कोरियामध्ये आपलं स्वरूप बदललं आणि लोकांना बाधित करण्यास सुरुवात केली होती.

H5N1 बर्ड फ्लू या वायरसने आतापर्यंत सगळं जग बाधित केलं आहे. तर ६० पेक्षा देखील जास्त देशांमध्ये महामारीच स्वरूप घेतलं होत. यात बाधित जास्तीत जास्त दक्षिण-पूर्व आशियामध्ये सापडतात.

भारतात २००६ मध्ये महाराष्ट्रातील नंदुरबारमधील नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा पहिला रुग्ण सापडला होता.

त्यानंतर २००८ मध्ये चीन, इंडोनेशिया, पाकिस्तान आणि व्हिएतनाममध्ये ११ वेळा या आजारची साथ आली होती.

आता जरा मृत्यूच्या काही आकड्यांकडे बघू.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार साल २००३ ते आतापर्यंत H5N1 बर्ड फ्लू वायरसमुळे ८६१ जण बाधित झाले आहेत. आता तुम्ही म्हणाल एवढीच तर बाधित आहेत, पण मित्रांनो त्यातील ४५५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.  

त्यातील सगळ्यात जास्त म्हणजे २००७ ते २००८ या एका वर्षाच्या कालखंडादरम्यान मृत्यू झाले आहेत. त्या एका वर्षात ३४९ जणांना बाधा झाली होती. त्यापैकी २१६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावर्षीचा मृत्यूदर जवळपास ६२ टक्के होता.

तर एकूण सरासरी मृत्युदर ६० टक्के इतका आहे.

व्हायरस कसा पसरतो?

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्यानुसार,

या विषाणूच्या जवळपास सर्वच केसेस या बाधित व्यक्तीच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे किंवा बाधित मृत पक्षाच्या संपर्कात आल्याने पसरतो. किंवा हवेतून देखील पसरू शकतो. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ज्या पोल्ट्रीमध्ये बाधित पक्षांना मारलं जात त्याच्या आसपासचा १ ते ५ किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलं जात.

पण सोबतच हा वायरस व्यवस्थित शिजवलेल्या अन्नांतून पसरतो अश्या प्रकारचा कोणताही पूर्व उपलब्ध नसल्याचं सांगितलं आहे.

H5N1 वायरस बदकासारख्या माइग्रेटरी पक्षांच्या मार्फत देखील पसरतो. हा जर पक्षी बाधित झाला तर ज्या देशात जाईल त्या देशात याची बाधा पोहचवतो. आपल्या संपर्कात आलेल्या इतर पक्षांना देखील बाधित करतो.

तसेच कावळे, कोंबड्या आणि कबुतर यासारख्या पक्षांमधून देखील बर्ड फ्ल्यू पसरतो.

या H5N1 बर्ड फ्लू वायरस वर लस उपलब्ध आहे, जी ब्रिटन, अमेरिका, फ्रांस, कॅनाडा सारख्या देशांमध्ये वापरली जाते.

या सगळ्या माहितीवरून आता एक मनाशी पक्क करा की, हा आजार घाबरण्यासारखा नाही पण गंभीर नक्कीच आहे. त्यामुळे त्याला अजिबात हल्ल्यात घेऊ नका. लस उपलब्ध असल्यामुळे जास्त काळजी करण्याची देखील गरज नाही.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.