हा भिडू कावळ्याचा आवाज काढून पिंडाला शिवायला कावळा बोलवू शकतोय…

इंदोरीकर महाराज एकदा आपल्या किर्तनात म्हणले होते,

काही दिवसानंतर पिंडाला शिवायला कावळा मिऴणार नाही. तेव्हा लोक कावळा पाळतेन अन् पिंडाला शिवायचं पैसे घेतेल.

पण असा कावळा कोणी पाळला का नाही ते माहित नाही पण पिंडासाठी कावळा बोलवणारा माणूस मात्र बोल भिडूला सापडला.

आमचा एक रूममेट एमपीएसी करणारा आहे. असाच दिवसभर क्लास, लायब्ररी करून संध्याकाळी रूमवर आला. अन् सांगायला लागला. दुपारी आमच्या क्लासमध्ये सरांनी एका पोराला बोलवलेलं. तो पोरगा अनेक पक्ष्याचे हुबेहुब आवाज काढत होता. पण महत्वाचं म्हणजे त्या पोराला दहाव्याच्या दिवशी अनेक ठिकाणी पिंडाला कावळा शिवावा म्हणून हमखास बोलवलं जातंय अन् त्याचा त्याला मोबादलाही दिला जातो.

कारण हा भिडू दहाव्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जातो कावळ्याचा आवाज हुबेहुब काढतो. त्याचा आवाज ऐकून बाकीचे कावळे आपोआप तिथं जमा होतात. अन् शेवटी ते पिंडाला शिवतात. त्यानंतर मेलेल्या माणसाला मोक्ष मिळाला असं गृहीत धरून हा दहाव्याचा कार्यक्रम आटोपला जातो.

आता हे ऐकल्यानंतर आमच्या डोक्यात ट्युब पेटली. हे सगळं शोधण्यासाठी त्याचं नाव मिळवलं. त्याला फेसबुकवर सर्च करून मेसेज टाकला. त्यांचा नंबर मिळवून त्याला फोन करून या प्रकरणाची खात्री पटवली. मात्र त्याच बरोबर या भिडूबद्दल अनेक नव्या गोष्टी समजल्या.

तर या अवलीया भिडूचं नाव आहे सुमेधबोधी वाघमारे.

सुमेध मुळचा मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या कलगाव या गावचा. लहानपण गावात गेल्यामुऴे तो निसर्गाच्या सानिध्यात वाढला. सगळ्या रानवाटा त्याला माहित होत्या. तिथले पक्ष्यांची ओळख झाली. फक्त आवाजावरून तो नर मादीदेखील ओळखू लागला.

रानात हिंडतांना तो पक्ष्यांचे आवाज काढायला शिकला. अनेक पक्षीही त्याला प्रतिसाद द्यायचे. प्राण्यांचे, पक्षाचे आवाज काढून त्यांच्याशी मैत्री केली.

खरं तर सुमेध पक्ष्यांशी गमंत म्हणून आवाज काढायचा. वेळ मिळाला तर त्याच्याशी गप्पा मारायचा. मात्र आपल्यामध्ये वेगळं काहीतरी आहे यांची जाणीव त्याला नव्हती. अकरावी- बारावीला शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील सासवडमधील वाघीरे काँलेजला अॅडमिशन घेतलं.

असंच एक दिवस तो पक्ष्यांचे आवाज काढत होता. त्यांच्याशी संवाद साधत होता. हे त्याच्या शिक्षकांनी पाहिलं. त्याची विचारपूस केली काॅलेजमध्ये त्याचा कार्यक्रम ठेवण्याच निश्चित केलं आणि त्याचा कार्यक्रम ठेवला. सुमेध पहिल्यांदाच स्टेजवर उभा होता. या कार्यक्रमामध्ये त्यांनी अनेक पक्ष्यांचे आवाज काढले.

मात्र कावळ्याचा आवाज काढल्यानंतर त्या कार्यक्रमाच्या स्टेजवर चक्क अनेक कावळे जमा झाले.

त्यावेळी पहिल्यांदा आपल्यात काहीतरी आहे याची त्याला जाणीव झाली. त्याला प्रसिद्धी मिऴत गेली. हा पोरगा पक्ष्यांचेे हुबेहुब आवाज काढतो ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली.

एके दिवशी पुण्यातील एका मोठ्या राजकारणी मंडळीचा दहाव्याच्या कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला सुमेधला बोलवलं गेलं.

या कार्यक्रमात त्याने कावळ्याचा आवाज काढून पिंडाला कावळा शिवायला लावला. हा त्याच्या आयुष्यातला पहिला पिंडाचा कार्यक्रम. इथूनच त्याची खरी सुरूवात झाली. त्यानंतर त्याला अनेक दहाव्याच्या कार्यक्रमाला बोलवणं येऊ लागलं. 500 ते 1000 रूपयांपर्यंत लोक पैसे द्यायला लागले, असं सुमेधने सांगितलं.

सुमेध सध्या तब्बल 200 पक्षाचे हुबेहुब आवाज काढतो. प्राण्यांचे आवाज काढतो. एवढंच नाहीतर गाड्यांचे आवाज, मोबाईलच्या रिंगचे आवाज, कार्टूनमधल्या पात्राचे आवाज, अनेकजणांची मिमक्री करतो. ह्या भिडूने पक्ष्याप्राण्यांना बोलतं केलंय याच कौतुक वाटत.

सुमेधला सध्या महाराष्ट्राचा बर्डमॅन म्हणून ओेळख मिळालीय.

त्याच्या या कलेमुळे त्याला अनेक मोठी माणसं भेटली त्याच्याशी कायमची जोडली गेली. नागराज मंजुळे, सुबोध भावे, अशी कलाकार मंडळी त्याच्या परिचय़ाची झाली. प्रसिद्ध पक्षीतज्ञ मारूती चित्तमपली, किरण पुरंदरे यांच्याशी तर सुमेधचे घरोब्याचे संबंध तयार झाले.

सध्या अनेक ठिकाणी आवर्जून सुमेधचे कार्यक्रम ठेवले जातात. वेगवेगळ्या जंगलातल्या सहलींना त्याला वाटाड्या म्हणून नेलं जात. त्याच्या या कलागुणांना भरभरून असा प्रतिसाद दिला जातोय.

सुमेध सासवडच्या वाघीरे काॅलेजमध्ये बी.ए च्या सेकंड ईयरला शिकतोय. बोल भिडूशी बोलताना तो म्हणाला,

भविष्यात पक्ष्यांच्या आवाजात मला पीएचडी करायची आहे, कारण पाळीव प्राणी, पक्ष्याबद्दल बोललं जातं. मात्र निसर्गातील प्राणी, पक्ष्याबदद्ल सहसा अभ्यास केला जात नाही. त्याच्यावर पाहिजे तेवढं संशोधन केलं जात नाही त्यामुऴे मला निसर्गातील या पक्षी, प्राणी यांच्यावर काम करायचं आहे, असं तो आवर्जून सांगतो.

सुमेधबोधी वाघमारे- ७७५८९८१४४८

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Sandesh says

    Num ny lagat sumedh waghmare cha… Plz chalu num dya… My num 9890813964

Leave A Reply

Your email address will not be published.