पुरुषही कथ्थक भारी करू शकतात हे सिद्ध केलं फक्त पंडित बिरजू महाराज यांनी

कला. कलाकार. कला ही अशी एकमात्र गोष्ट आहे जिला कधीच कोणतंही बंधन राहीलं नाही. जात, धर्म, लिंग अशा सगळ्या गोष्टींमध्ये होणाऱ्या भेदभावापासून कला नेहमीच अलिप्त राहिली आहे. आणि ती कला ज्याला अवगत होते तो कलाकार त्याच क्षणी सगळ्याच बंधनातून मुक्त होतो. अशा अनेक कला आहेत ज्यांना लिंगाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांना मुक्त केलं ते कलाकारानं. असेच एक कलाकार म्हणजे बिरजू महाराज.

कथ्थक सारख्या कलेकडे महिलांची कला म्हणून बघितलं जायचं त्या कलेला लिंगभेदातून मुक्त करत जगभरात प्रसिद्ध करणारे बिरजू महाराज. कथ्थक सम्राट म्हणून ख्याती मिळवणारे बिरजू महाराज यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी १७ जानेवारी २०२३ ला अखेरचा श्वास घेतला. नातवासोबत खेळत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. प्रकृती खालावल्यानं त्यांना दिल्लीतील साकेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

लखनऊच्या कथ्थक कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. कालका-बिन्दादीन असं घराण्याचं नाव. बिरजू महाराजांचं मूळ नाव ब्रिजमोहन मिश्रा होतं. असं सांगितलं जातं की, ज्या रुग्णालयात बिरजू महाराजांचा जन्म झाला, तिथं ते सोडून इतर सर्व मुली जन्माला आल्या, म्हणूनच त्यांचं नाव ब्रिजमोहन ठेवण्यात आलं. जे नंतर ‘बिरजू’ आणि ‘बिरजू महाराज’ असं झालं.

बिरजू महाराजांचे वडील आच्छान महाराज आणि काका शंभू महाराज यांचं नाव देशातील प्रसिद्ध कलाकारांमध्ये होतं. वडिलांचं अकाली निधन झाल्यानं कुटुंबाची जबाबदारी लवकरच त्यांच्या खांद्यावर आली. त्यांनी काकांकडून कथ्थकचं प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. पंडित बिरजू महाराज जेव्हा कथ्थक कला रंगमंचावर रसिकांसमोर सादर करायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत प्रेक्षक मंत्रमुग्ध व्हायचे. तालांवर त्यांची इतकी पकड होती की ती बघूनच कळायचं हा व्यक्ती कला फक्त सादर करत नाही तर तो कला जगतो!

बिरजू महाराजांनी भारतीय चित्रपटसृष्टीवरही मोठी छाप सोडली आहे. भारतीय संगीतातील अनेक गाण्यांना अजरामर करण्यात त्यांचा मोठा वाट राहिला आहे.  त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अनेक मोठमोठ्या कोरिओग्राफर्सने भारतीय फिल्म इंडस्ट्री सोबतच विदेशातही नाव कमावलं आहे. पंडित बिरजू महाराज यांनी स्वतः भारतीय चित्रपटातील अनेक गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन केलं आणि उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

बिरजू महाराजांनी गोवर्धन लीला, माखन चोरी, मालती-माधव, कुमार सम्भाव आणि फाग बहार अशा  विविध प्रकारच्या नृत्यप्रकारांची रचना केली. तबला, पखवाज, ढोलक, नाल आणि तंतुवाद्य, व्हायोलिन, स्वर मंडळ आणि सतार अशा तालवाद्यांचे त्यांना विशेष ज्ञान होतं. १९९८ मध्ये निवृत्त होण्यापूर्वी, पंडित बिरजू महाराज संगीत भारती, भारतीय कला केंद्रात शिकवायचे आणि दिल्लीतील कथ्थक केंद्राचे प्रभारीही होते. त्यांना प्रतिष्ठित ‘संगीत नाटक अकादमी’, ‘पद्मविभूषण’ मिळाले.

तसंच मध्य प्रदेश सरकारने ‘कालिदास सन्मान’ प्रदान केला होता. शिवाय २००२ मध्ये त्यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बिरजू महाराजांबद्दल रागिनी महाराज यांनी सांगितलं होत की, त्यांना गॅजेट्सची खूप आवड होती, ते  नेहमी नवीन गॅजेट्स घ्यायचे. जर बिरजू महाराज डान्सर झाले नसते तर नक्कीच मेकॅनिक असते असं बिरजू महाराज स्वतः बोलायचे.

बिरजू महाराजांबद्दल एक गोष्ट सांगितली जाते की ते कथ्थकसोबत रोमान्स करायचे. हीच गोष्ट त्यांनी अनेक दिग्दर्शित केलेल्या अनेक गाण्यांतून दिसून येत. जसं  की, डेढ इश्किया चित्रपटातील जगावे सारी रैना, देवदासमधील काहे  छेड छेड मोहें, तर बाजीराव मस्तानी मधील मोहे रंगदो लाल गाण्यासाठी त्यांना  फिल्मफेयर पुरस्कार देण्यात आला. शिवाय कमल हसन यांच्या विश्वरूपम चित्रपटातील उन्नई  कोडू नान या गाण्यासाठी राष्ट्रीय फिल्म पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं.

सत्यजित रॉय यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटासाठी त्यांनी उच्च दर्जाच्या दोन नृत्यनाट्यांची रचना केली. याशिवाय ठुमरी, दादरा, भजन आणि गझल यांवर विशेष पकड असलेले ते उत्कृष्ट गायक होते. 

बिरजू महाराज जरी आज नसले तरी त्यांची कला त्यांना नेहमी जिवंत ठेवणार हे नक्की. जेव्हाही लोक या गाण्यांकडे बघतील तेव्हा भारतीय कला क्षेत्राने काय गमावलं याची जण होत राहील. संपूर्ण आयुष्य कला जगणाऱ्या या कलाकाराने अनेक कलाकारांसाठी आदर्श निर्माण केला आहे, एवढं नक्की.

हे ही वाच भिडू :

Web title :Birju Maharaj death :Pandit Birju Maharaj proved that even men can do  kathak

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.