महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्यामुळे संपूर्ण देशात स्त्रीभ्रूणहत्या थांबल्या..

सत्तरच्या दशकात गाजणारा आवाज म्हणजे मृणाल गोरे !

ते म्हणतात ना,  एक बाई जो विचार करू शकते तो विचार तितक्याच प्रखरतेने इतर कुणीही करू शकत नाही. दैनंदिन आयुष्यातले प्रश्न सोडवा मग राजकारण करत बसा असं रोखठोक सांगणाऱ्या मृणाल गोरे यांना  महाराष्ट्राचा इतिहास, त्यातल्या त्यात मुंबईचा इतिहास कधीही विसरणार नाही कारण मुंबईतील छोट्या छोट्या प्रश्नांची त्यांना जाण होती त्यासाठी त्या प्रत्येक मुद्द्यांसाठी तितक्याच जोमाने लढल्या होत्या.

बरं त्या फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या राजकारणात महत्वाची राजकारणी म्हणून त्यांनी स्थान मिळवलं होतं !

ज्यांनी सत्तरच्या दशकात इंदिरा सरकारच्या विरोधात केलेल्या आपल्या अभूतपूर्व आंदोलनामुळे सर्व महाराष्ट्राला चकित केले होते. महागाई विरुद्ध काढला गेलेला ‘लाटणं मोर्चा’ भारतभरात गाजला. सामान्य वर्गाच्या,गरिबांच्या रेशन, पाणी, निवारा या मुलभूत गरजांसाठी त्यांनी अनेक आंदोलनं केलीत.

पाणी प्रश्नासाठी त्यांनी आंदोलन उभारले तेंव्हा त्यांना ‘पाणीवाली बाई’ असे उपरोधाने म्हटले जायचे.

मात्र, पुढे हीच त्यांची ओळख झाली. त्यांनी लावून धरलेल्या मुद्यांमध्ये आणखी एक महत्वाचा आणि ऐतिहासिक प्रश्न म्हणजे गर्भजल चिकित्सा विधेयक.

या विधेयकाचा अभ्यास त्यांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगात असतांनाच सुरु केला होता, तेंव्हा त्यांनी तुरुंगातूनच अभ्यास करून जवळजवळ १०० पानांचे टिपण सरकारकडे पाठवले होते. 

गर्भजल चिकित्सा विधेयक हे अशासकीय असले तरी ते समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे हे सर्वप्रथम त्यांनाच उमजले आणि त्यांनी ह्या विधेयकाचा आग्रह धरला व यावर चर्चा घडवून आणली.

दरम्यान ची लोकसंख्या पहिली तर हे अगदी ठळक होते कि, पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा जास्त होती. त्यातच आधुनिक वैद्यकीय शोधामुळे गर्भजल चिकित्सा प्रकरण समोर आले. कारण त्याद्वारे मुलगा कि मुलगी याचे निदान आधीच होत असल्यामुळे पुरुषप्रधान समाज मुलींचा गर्भ पाडून टाकत होतं परिणामी मुलींचा जन्मदर पार खाली गेला होता.

म्हणून गर्भजल चिकित्सेविरुद्ध कायदा व्हावा म्हणून मृणाल यांच्यासमवेत तेंव्हा आमदार शरयू ठाकूर, आमदार शाम वानखेडे हे ही होते.

विधानसभेत जेंव्हा हे विधेयक मांडले तेंव्हा त्यावर चांगली चर्चा झाली, या वेळी मृणाल गोरे यांनी या विधेयकावर केलेले भाषण अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रभावी झाले होते. याबाबत कायद्याची आवश्यकता असल्याची सभागृहाचीही खात्री झाली.  त्यानंतर शासनाने सांगितले कि खाजगी विधेयक एका वर्षासाठी मागे घ्यावे जेणेकरून एका वर्षाच्या आतच निश्चितपणे सरकारतर्फे विधेयक मांडण्यात येईल. 

आणि हा ऐतिहासिक कायदा भारतात प्रथमच महाराष्ट्रात लागू झाला.

महाराष्ट्राच्या या निर्णयाची दखल घेऊन केंद्र सरकारनेही हा कायदा १९९२-९३ मध्ये संपूर्ण भारतात लागू केला. सर्व देशात तो कायदा आपल्या महाराष्ट्रात प्रथम झाला हे महाराष्ट्रासाठी खूपच अभिमानास्पद बाब आहे तसेच हा कायदा करवून घेण्याचे संपूर्ण श्रेय शेवटी मृणाल यांनाच जाते. 

आता हा मुद्दा खूप वेगळा आहे कि, या कायद्याचे आपल्या पुरुषसत्ताक समाजाने पुढे काय केले. कायदा मदतरूप होतो, पण त्यासाठी समाजात त्याची किती गांभीर्याने  अंमलबजावणी केली जाते ते महत्वाचे आहे.

समान्यांच्या नेत्या म्हणून ओळख असणारया मृणाल गोरे यांनी हे मुद्दे लावून धरण्यासाठी नेहेमीच चळवळी केल्या होत्या, ह्या चळवळीच त्यांच्या राजकारणाचा आधार होता. परंतु हळूहळू त्या राजकारणापासून लांब जावू लागल्या कारण १९९० नंतर राजकारणात वैचारिकतेला स्थान नव्हते तर पैसा आणि तुमचे पक्षीय बळ किती तगडं आहे हे महत्वाचं ठरत गेलं.

अशा परीस्थितीत मृणालताई ज्या नेहेमी विचाराने आणि तत्वाने वागणाऱ्या मृणालताई राजकारणापासून दूर झाल्या.

हे ही वाच भिडू:

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.