सनी देओल आहे म्हणून आम्ही त्याच्या फडतूस पिक्चरला पण टॉकीज गाजवायचो !

सनी देओल ने चित्रपटसृष्टीत आगमन केले तेव्हा मुख्य प्रवाहात एकीकडे अमिताभ पासून मिथुन चक्रवर्ती पर्यंत सगळेच अभिनेते काव्यात्म डूब असलेल्या सिनेमात काम करून भारतीय प्रेक्षकांना स्वप्नांच्या दुनियेत नेत होते.

तर दुसरीकडे ओम पुरी, नसीर यांचे वास्तवाला भिडणारे पण मर्यादित प्रेक्षकांपर्यंत पोचणारे वा ठराविक वर्गाला अपील होणारे सिनेमे येत होते.

80 च्या दशकात हिंदी सिनेमात दोन मुख्य प्रवाह होते. एकीकडे तिकीट खिडकीवर गर्दी खेचणाऱ्या मोठ्या ‘स्टार’ चे सिनेमे तर दुसरीकडे संख्येने कमी पण नियमितपणे आर्टहाऊस सिनेमांना हजेरी लावणारे निष्ठावंत प्रेक्षक. दोन्ही परस्परविरोधी प्रकार असल्याने आर्ट सिनेमाचा प्रेक्षक मसाला सिनेमाच्या नावाने नाक मुरडायचा. तर मसाला सिनेमाचे चाहते आर्ट सिनेमाला दुर्बोध समजून टाळायचे.

या दोन परस्पर विरोधी जगाला सुरुंग लावून हि तफावत मिटवायचं महत्वाचं काम केलं ते सनी देओल च्या ‘अर्जुन’ ने.

जावेद अख्तर यांनी लिहिलेली अर्जुन ची पटकथा जेवढी राजनैतिक होती तेवढीच मानसिक द्वंद्व उभे करणारी. बेरोजगार युवक म्हणजे दारुगोळा दाबून ठेवलेला आपटी बॉम्ब असतो हे नेमकं दाखवणारी. 

अतिशयोक्ती असला तर सनीदेओल चा ‘घायल’ मला कायम ‘अर्धसत्य’ह्या क्लासिक सिनेमाचा, ठराविक प्रेक्षकवर्गापूरत असलेलं नाटकी सिक्वेल वाटत आलाय. आणि तितकाच गरजेचा. अर्धसत्य मध्ये नायक अनंत वेलणकर (ओम पुरी) घुसमट व्यक्त करताना जेव्हा म्हणतो की,

‘ऐसा लगता है, कोई मेरी मर्दांगी को ललकार रहा है।’

तेव्हा हि कोंडी फुटू पाहण्याची आशा प्रेक्षकांच्या मनात जागी होते. पण त्यात तो कधीही बाहेर निघू न शकणाऱ्या चक्रव्यूहात अडकला आहे हे आपल्याला कळून चुकलेलं असतं. योगायोगाने घायल मध्ये सुद्धा ओम पुरी ने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. अजय मेहरा (सनी देओल) बद्दल बोलताना तो म्हणतो की ‘अजय नतिजा हैं, कानून से जुडे हम जैसे नपुंसक लोगों का।’ अजय मेहरा फिल्मी वाटत असला तरी कायम व्यवस्थेचा बायप्रॉडक्ट म्हणून जन्माला येत राहणार!

1973 साली जंजीर सिनेमातून अमिताभ बच्चन ने व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणाऱ्या भारतीय तरुणाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

तरीही तो केवळ एक रिवेंज ड्रामा होता. ज्यांचं द्वंद्व व्यवस्थेशी आणि स्वतःसोबत होतं असा तळागाळातला एक मोठा वर्ग घुसमट तशीच दाबून ठेवून बसला. एकीकडे चार चार गुंडांना लोळवणारा हिरो दुसऱ्या हातात पिस्तूल घेऊन हिरोईनसोबत रोमान्स करतो, गाणी गातो हे रूट लेव्हलच्या अडचणींचा सामना करणाऱ्या प्रेक्षकांना अपील होण्यासारखं नव्हतं.

सनी देओल ने साकारलेला बेरोजगार पण आतल्या आत घुसमटत असलेल्या, दुर्लक्षित झालेल्या तरुणाला चेहरा दिला.

हा चेहरा इतका अस्सल होता की सनी देओल च्या देहबोलीसहित तरुणांना आपलासा वाटला. माझ्या सनी प्रेमाचे धागेदोरे हे ह्या एकाच वेळी फिल्मी असून सुद्धा तितक्याच खऱ्या वाटणाऱ्या सनी देओल च्या देशी व्यक्तिरेखेत आहे.

त्याबद्दल थोडं.

शाळेत असताना मराठीमध्ये ‘माझा आवडता हिरो’ या विषयावर सरांनी निबंध लिहायला लावला होता. वर्गातल्या बाकी पोरांनी सचिन तेंडुलकर, सुभाषचंद्र बोस, अब्दुल कलाम पासून आपल्या वडिलांपर्यंत मोठ्ठ्या लोकांना समोर ठेऊन मोठाल्ल्या बाता लिहल्या.

मी प्रामाणिकपणे ‘सनी देओल’वर निबंध लिहून टाकला. त्याचा पहिला पिक्चर कोणता, त्यातली कुठली गाणी फेमस कोणासोबत पिक्चर जास्त चालले वैगरे. निबंधात शून्य मार्क मिळाले, याचं वाईट नाही वाटलं. सरांनी मात्र आख्ख्या वर्गासमोर माझा निबंध वाचून दाखवला. नंतर फटके मिळाले ते वेगळेच. मार खाल्ल्याचा मला ग़म-पस्तावा नव्हता.

मी सनी देओल चा कट्टर फॅन आहे. हो. कट्टर म्हणजे मोदी भक्तांपेक्षा कट्टर. आणि फॅन वैगरे शब्द फार तोडके आहेत, मी सनी देओल चा काय आहे हे शब्दात सांगता येणारा शब्द अजून आपल्या भाषेत नाही.

म्हणून फक्त फॅन. 

३ वर्षांपुर्वी थिएटरमध्ये घायल वन्स अगेन पाहत होतो. पिक्चर अपेक्षेइतकाच साधारण. एक-दोन जबरदस्त चेस सिन चा अपवाद वगळता बाकी पिक्चर फारच बकवास. पण विषय तो नाहीच. थेटरात 50-60 पब्लिक असेल. बरेचसे सनी चे फॅन. सनी म्हणजे सनी देओल. मी एकटा गेलेलो. पण सनी पाजी चे फॅन एकटे जरी गेले तरी त्याच्या पिक्चरला एकदम भाईभाई बनून जातात. आजही तेच.

एका सिनमध्ये सनी त्याच्या जुन्या अवतारात डायलॉगबाजी करून मूळ झलक देतो तेव्हा आम्हा सगळयांचे हार्ट पंपिंग सुरु झाले असतील. इतका थोडा ऑडिएन्स सुद्धा अशा वेळी थेटर गाजवायला भारी असतो. एक 4-5 जणांचा ग्रुप आला असेल.

घायल वन्स अगेन पाहताना हि मंडळी कुत्सितपणे हसत होती. अरे हे काय लावलय वैगरे. तितक्यात एक सनीपाजी चा फॅन उठला आणि दात काढनाऱ्याला अस्सल शिव्यांनी ठंडागार करून टाकला.

मला जुने दिवस आठवले. सनी देओल आहे म्हणून आम्ही त्याच्या फडतूस पिक्चरला पण टॉकीज गाजवायचो, तेव्हाचे!

नुकतेच कुठेतरी वाचले कि सनी देओल चा ‘बिग ब्रदर’ हा टीव्ही वर दाखवण्यात येतो तेव्हा त्याचा TRP हा खान मंडळींच्या ब्लॉकबस्टर सिनेमांपेक्षा कित्येक पटीने जास्त असतो. खरं तर यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. सनीच्या जुन्या चाहत्यांना यात काहीच विशेष वाटणार नाही. घायल प्रत्येक वेळेस जेव्हा री-रिलीज झाला, तेव्हा त्याला पब्लिक रिस्पॉन्स अभूतपूर्व होता. मला आठवतंय, 2002 ला घायल डॉल्बी साऊंड सहित परत रिलीज केला.

तेव्हा नाशकातला शो लिटरली हाऊसफुल होता. असं प्रेम आणि असे चाहते किती अक्टर्सच्या-सिनेमांच्या वाटेला आले माहित नाही! 

रिजिनल घायल येऊन 25 वर्षांहून जास्त काळ लोटला आहे. खरं तर इतक्या वर्षांनी त्याचा सिक्वल तयार करणं आणि प्रदर्शित करणं हे धाडसाचं काम. 80-90 च्या दशकातल्या कितीही मोठ्या ब्लॉकबस्टर सिनेमाच्या सिक्वलकडे कुणी ढुंकूनही पाहिलं नसतं. बरं तेव्हाचा त्याचा प्रेक्षकवर्ग आत्ता सिनेमागृहात जाऊन कितीसे सिनेमे बघतो हा एक संशोधनाचा विषय आहे. तरीही घायल वन्स अगेन ला मिळणारा 23Cr वीकेंड चा गल्ला डिसेंट म्हणावा असाच आहे. मला अजूनहि असं वाटत नाही कि करोडो रूपयाचे कलेक्शन्स सनी किंवा त्याच्या फॅन साठी इतके मायने ठेवत असेल.

हा सिनेमा 2002-2003 च्या सुमारास जरी आला असता तरी अफाट चालला असता. भले तो कितीही टुकार असूदे. घायल, घातक, बॉर्डर किंवा गदर यांच्या आजच्या काळातल्या इनफ्लॅटेड वॅल्युज 500 Cr च्या आसपास होतात.

गदर आणि आमिरचा लगान एकाच दिवशी रिलीज झालेले. लगानला जेमतेम रिस्पॉन्स होता. उत्तम सिनेमा असल्याने कालांतराने तो वाढलाही. पण कमाईच्या बाबतीत त्याची बरोबरी गदर सोबत कधीच होऊ शकली नाही. कधीही ‘महालक्ष्मी’ ला गेलो तर हाऊसफुलचा बोर्ड कायम. आणि बाहेर एक फळा लावलेला असायचा, त्यावर खडूने मार्किंग, कि तिकिटं डायरेक्ट पुढच्या आठवड्यातली अवेलेबल आहेत! पूर्वी असं यश बऱ्याच सिनेमांना मिळायचं.

पण सनी देओल च्या पिक्चरकी बात हि कुछ और थी. त्याचा मिडिओकर ‘इंडियन’ विकास ला तीन महिने तळ ठोकून होता. सकाळी 7 वाजेपासून थेटराबाहेर लाईन्स. प्रत्येक सुपरस्टार ने एक काळ गाजवलेला असतो. पण ज्याच्या डायलॉगला, ओरडण्याला पब्लिकने पैसे फेकावे असा सिनेमा शेवटचा ‘घातक’च असावा. निदान नाशकात तरी.

पिक्चरची लढाई कितीही लुटुपुटूची असली तरी हिरो किंवा त्याचे इतर कुणी मित्र नातेवाईक सिनेमात मार खाताना वाईट वाटते. पण सनी देओलच्या सिनेमात कुणी हिरो साईडचं कुणी मार खायला लागला तर मला अघोरी आनंद व्हायचा. कुठल्याही क्षणी हिरो येईल आणि गुंडांची आयभैन करेल असा विश्वास असायचा. व्हिलनची आयभैन करायची पण ज्याची त्याची पद्धत असते. पण ढाई किलोच्या हाताची बरोबरी कुणीच करू शकत नाही.

आजकालचे थातुरमातुर आणि ओंगळवाने सिक्स पॅक, डझनभर पॅक तर बिलकुल नाही. सनीचे पंच, त्याचे ओरडणे, सगळ्यांना एकखट्टी लोळवने जितके कनव्हीन्सींग वाटते तेवढं ह्रितिक-जॉन ने फटकारणं पुचाट वाटतं.  त्याचे घायल आणि घातक माझे फेवरेट पिक्चर. फेवरेट बोले तो एकदम फेवरेट. म्हणजे हे दोघी पिक्चर मी 100 वेळा पाहिले असतील. तितक्याच वेळा परत पाहू शकतो.

हा वाघ हल्ली म्हातारा झालाय. अर्थपूर्ण रोल वैगरे पुचाट शब्द सनी देओलला लागू पडत नाही. हॉलिवूडचे स्टेलॉन, अरनॉल्ड तरी काय करत आहे ह्या वयात. अपवाद वगळता ह्या बिल्डर लोकांचे कित्येक सिनेमे सुमार होते. त्यांना पब्लिक चा रिस्पॉन्स पण तसाच जेमतेम.

पण सनी देओल चा स्वतःचा असा एक ऑडिएन्स आहे, जो त्याचा नेहमीचा ओरडण्याचा अभिनय सुद्धा हजार वेळा पाहू शकतो.

माझे बरेच मित्र आहेत, ज्यांना अर्जुन जितका आवडतो तितकाच अर्जुन पंडित. देवा कि अदालत वैगरेचा केमिकल लोचा झालाय एकाच्या. दुनियाचा टुक्कार. बाराबोड्याचा. पण देवा कि अदालत में इंसाफ होता है असा समज त्याच्या मनात अजून पण आहे. यतीम, डकैत, नरसिंहा, जोशीले, त्रिदेव, अजय, वीरता असे पिक्चर फेवरेट असणारे माझ्या माहितीत आहे. 

एक गडी असा पण ए, कि जो बाप मेला तरी डोळ्यातून एक थेंब गाळला नाही पण ‘आग का गोला’ पाहताना ढसाढसा रडलेला. हा ‘आग का गोला’ पाहताना जो रडला आहे आहे ना, याच्या प्रत्यक्ष आयुष्यात जर कुणी बलवंतराय किंवा कातीया आला तर हा एक घाव दोन तुकडे करून टाकील. प्रत्येक जण जब्याच्या दगडानेच पेटून उठतो असं काही नाही.

  •  जितेंद्र घाटगे.
3 Comments
  1. Mayuresh says

    Fabulous article mitraaa… But how could you miss his National Award winning film – Damini?

  2. Chinmay says

    Mi The hero pahilay 30-40 da. Mast picture ahe attache spy movie ajunhi zak martat tyapude …

  3. Kalpesh borate says

    कट्टर सनी फॅन..

Leave A Reply

Your email address will not be published.