ज्या काळवीट प्रकरणात सलमान घावला, त्या काळविटांचं आता स्मारक उभं होतंय…
हम हम साथ साथ है, हा पिक्चर बघताना जनता फिक्स रडणार. तब्बू, करिष्मा कपूर, सोनाली बेंद्रे असल्या काळजाचा ठाव घेणाऱ्या नट्या, कायम टेन्शनमध्ये असल्यासारखा दिसणारा मोहनीश बहल, कवळा सैफ अली खान आणि स्वतः सलमान खान अशी स्टारकास्ट. सोबत अलोकनाथ गुरुजींचा आशिर्वाद आणि रीमा लागूंचा वरदहस्त, भरीसभर म्हणून फुल फॅमिली ड्रामा. एवढा मालमसाला असल्यावर पिक्चर फ्लॉप ठरायचा चान्स पण तयार होत नाही. पिक्चर सुपरडुपर हिट ठरला आणि तितकाच सुपरहिट ठरला पिक्चरच्या शूटिंगवेळी झालेला मॅटर.
वरची सगळी नावं वाचल्यावर मॅटरमध्ये घावणारं प्रमुख नाव कोणतं आणि मॅटर कुठला हे तुम्हाला फिक्स माहिती असणार. तरी तुम्हाला परत एकदा आठवण करुन देतो. मॅटर होता काळवीट शिकारीचा आणि सगळ्यात मेन कार्यकर्ता घालवला तो म्हणजे सलमान खान.
१९९८ ला हम साथ साथ है च्या शूटिंगवेळी राजस्थानमध्ये काळवीटांची शिकार केली होती. न्यायालयात आरोप सिद्ध झाल्यावर त्याला सहा दिवस जोधपूर तुरुंगात घालवावे लागले होते. आता जवळपास २३ वर्ष झाली, तरी सलमानच्या मागचं कोर्टकेस आणि चौकशीचं ग्रहण सुटलेलं नाही. गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये जोधपूर सत्र न्यायालयात हजेरी लावण्यापासून सलमानला दिलासा मिळाला होता.
सध्या सलमानच्या काळवीट प्रकरणाची आठवण का आली?
तर जिथं सलमान आणि त्याच्या सोबतच्या बॉलिवूड सिताऱ्यांनी काळविटांची शिकार केली, तिथं आता काळविटांचं स्मारक उभं राहणार आहे. आणि हा हे स्मारक सलमान नाही, तर तिथले काही स्थानिक तरुण उभे करतायत.
बिष्णोई समाजात हरीण, काळवीट या वन्यजीवांना देव मानलं जातं. या समाजातल्या मुलांनी पुढे येत हे स्मारक उभं करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या कांकणी गावात हे शिकार प्रकरण घडलं, त्याच नावानं त्यांनी कांकणी समूह नावाची एक संस्था बनवली आहे. बरं ही पोरं फक्त स्मारक उभं करुन थांबली नाहीयेत. काळवीटांच्या पंचधातूच्या पुतळ्यासोबतच इथं रेस्क्यू सेंटरही उभारण्यात येणार आहे. सोबतच या परिसरात हजार झाडंही लावली जाणार आहेत.
वन्यजीव प्रेमी आणि कांकणी ग्रुपचा सदस्य असणाऱ्या प्रेम सरणनं या स्मारकाबाबत माध्यमांना माहिती दिली. तो म्हणाला, ‘ही जागा आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. जोधपूर शहर सध्या वेगानं विस्तारत आहे, काही गृहनिर्माण प्रकल्प आणि उद्योगधंदे विकासाच्या नावाखाली इथे आक्रमण करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे आम्ही विचार केला, की ही जागा हरीण आणि काळविटांसाठी वेळीच राखून ठेवायला हवी.’
‘आम्ही फक्त पुतळेच उभे करत नसून जखमी प्राण्यांवर उपचार करता येतील आणि त्यांना पुन्हा निसर्गाच्या कुशीत जाता येईल या हिशोबानं रेस्क्यू सेंटरही उभं करत आहोत. येणाऱ्या पिढ्यांना निसर्गाचं आणि प्राण्यांचं महत्त्व जपण्याची प्रेरणा मिळण्यासाठी आम्ही हे स्मारक उभं करत आहोत,’ असंही प्रेम म्हणाला.
येत्या वर्षभरात या स्मारकाचं काम पूर्ण होणार आहे. सलमानच्या कोर्ट केसचा निकाल लागायचा तेव्हा लागेल, पण या युवकांची कृती अनेकांना प्रेरणा देणारी आहे हे नक्की.
हे ही वाच भिडू:
- त्या पिक्चरवेळी अक्कल आली आणि सलमान खानचा बॉलिवूडमध्ये पुनर्जन्म झाला…
- भाईजानला साप चावलेलं फार्महाऊस याआधी देखील वादात सापडलं होत..
- राजकुमार सलमानला म्हणाला, “तुझ्या बापाला विचार मी कोण आहे”