पुढच्या ३ महिन्यात भाजपचे २५ लाख युवा वॉरियर्स मैदानात उतरणार आहेत…

भारत हा तरुणांचा देश आहे आणि या तरुणाईचा खुबीनं वापर कोणी केला असेल तर ते इथल्या राजकीय पक्षांनी. देशातील जवळपास प्रत्येक राजकीय पक्षाची युवांशी संबंधित एक तरी संघटना आहेच आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर काँग्रेसची युवक काँग्रेस, शिवसेनेची युवासेना, तर भाजपचा युवा मोर्चा.

मात्र आता भाजप यात देखील आणखी एक संघटना तयार करण्याच्या तयारीत आहे, ती म्हणजे

युवा वॉरिअर्स

राज्यात अवघ्या काही महिन्यांवर जवळपास १८ महापालिकांसह, नगरपालिका, जिल्हा परिषद, आणि पंचायत समितीच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुका गांभीर्याने घेतल्या आहेत. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आता २५ वर्षापर्यंतच्या युवकांवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे.

प्रत्येक वॉर्डात एक शाखा :

भाजपने याच निवडणुकांच्या तयारीचा एक भाग म्हणून ग्रामीण भागात प्रत्येक गावात आणि पंचायत समिती क्षेत्रात आणि प्रत्येक वॉर्डात युवा वॉरिअर्सची एक शाखा उघडण्याचा निश्चय केला आहे. तर शहरी भागात वॉर्डस्तरापर्यंत शाखांचे निर्माण करण्यात येणार आहेत.

२५ लाख युवा वॉरिअर्सची फौज उभारणार :

यातील प्रत्येक शाखेच्या माध्यमातून आगामी ३ महिन्यात २५ लाख युवा वॉरिअर्सची फौज राज्यात भाजप उभी करणार आहे. भारतीय जनता युवा मोर्चा ही युवा वॉरिअर्सची आघाडी सांभाळणार आहेत.

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जुलैमध्ये नाशिक इथं बोलताना सांगितले होते कि,

भाजप हा संघटनात्मक बांधणी असलेला पक्ष असून २०२४ च्या निवडणुकीत केंद्र आणि राज्यात भाजप मोठ्या ताकदीनं उभा राहिल. राज्यातील २५ लाख युवकांना संघटित करून युवा वॉरिअर्स म्हणून नेमलं जाणार आहे. या अभियानात सर्व समाजाच्या युवकांची नोंदणी केली जाणार आहे.

७ महिन्यांमध्ये महाराष्ट्रात फिरून संघटनात्मक बांधणीचे नियोजन 

युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील आणि युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांनी १९ फेब्रुवारी रोजी सिंहगडावर प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या उपक्रमाचा शुभारंभ केला होता. कला, संस्कृती व क्रिडा क्षेत्रात रूची असणाऱ्या युवकांचे संघटन या निमित्ताने बांधण्यात येईल असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. 

त्यानंतर पाटील – मोरे या जोडगोळीने युवा वॉरिअर्सच्या बांधणीला सुरूवात केली होती. तेव्हापासून या दोघांनी दोन टप्प्यामध्ये निम्याहून अधिक राज्याचा दौरा केला. या दौऱ्याच्या माध्यमातून त्यांनी भाजपच्या ६२ संघटनात्मक जिल्ह्यापैकी कोकण, विदर्भातील ४२ जिल्हे पिंजून काढले आहेत. आता पुढच्या टप्प्यात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांचा दौरा असणार आहे.

या सगळ्याबाबत बोलताना विक्रांत पाटील आणि अनुप मोरे म्हणाले होते कि, 

११ ते २५ या युवावर्गाला तुला काय कळतं, असं म्हणतं दुर्लक्षित केलं जातं, त्यांना थांबवलं जातं. पण, या युवांचेही जिनिअस आणि वेगळे प्रश्न आहेत. त्यात आताची पिढी तर खूप स्मार्ट आहे. त्यांना योग्य व्यासपीठ न मिळाल्याने ते सोशल मिडियावर व्यक्त होतात. पण त्यांनी तिथं टीका करण्यापेक्षा त्यांना टॉक करण्याच्या माध्यमातून तयार करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे.

त्यामुळे आता राज्यातील आगामी काळातील निवडणुकांमध्ये भाजपच्या जोडीला एक मोठी संघटनात्मक यंत्रणा उभी राहणार आहे हे नक्की. याच सोबत शिवसेनेच्या युवासेनेला देखील युवा वॉरियर्सचे आव्हान उभं राहणार असल्याचं बोललं जात आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.