भाजपचे दोन तुकडे होणार होते, राज्यात उभी फुट पडली… तेव्हा बाळासाहेबांनी बंड थोपवलं..
१८ नोव्हेंबर २०१२ चा सामनाचा अंक.
सामनाच्या या अंकात बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी लेख लिहले होते. यातलाच एक लेख लिहला होता गोपीनाथ मुंडे यांनी. या लेखाची सुरवात करतानाचा गोपीनाथ मुंडे लिहतात,
काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये माझा वैयक्तिक संघर्ष सुरू होता..
मन:स्थिती ढासळली होती… काय करावे सुचत नव्हते. याच वेळी मी मातोश्रीवर गेलो. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांची माझी भेट झाली. या भेटीनंतर ते मला त्यांच्या वैयक्तिक रुममध्ये घेवून गेले. प्रथम त्यांनी मला तेथील गणपतीला नमस्कार करायला लावला. यानंतर भगवा टिळा माझ्या डोक्यावर लावल्यानंतर ते म्हणाले,
भगवा आयुष्यभर सोडू नकोस. माझा गणपती आणि माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहतील.
या त्यांच्या बोलण्याने माझे सैरभैर झालेले मन पूर्णपणे शांत झाले.
बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांचे नाते वेगळे होते. केंद्रीय नेतृत्वाने जेव्हा गडकरींना बळ देण्यास सुरवात केली तेव्हा गोपीनाथ मुंडेंचे पंख छाटण्यास सुरवात करण्यात आली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वालाच पर्याय देण्याचा विचार केंद्रात चालू होता.
आणि त्यासाठी निमित्त ठरलं मुंबईचं भाजप अध्यक्षपद
याची सुरवात झाली होती मुंबई भाजपच्या अध्यक्षावरून.
गेली अनेक वर्षे भाजपचे महाराष्ट्रातले राजकारण मुंडे महाजन या दोन नावाभोवती फिरत होतं. अगदी कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी बहुजन ओबीसी समाजाच्या तरुणांना भारतीय जनता पक्षात आणलं.
काहीच अस्तित्व नसलेल्या भाजपला उभं केलं ते मुंडे आणि महाजनांनी. महाजन केंद्रात आणि मुंडे महाराष्ट्रात अशी त्यांच्यात वाटणी देखील झाली होती. वाजपेयींच्या पासून ते नगरसेवक पदावर असलेल्या छोट्या कार्यकर्त्यापर्यंत त्यांचा सहज संपर्क होता.
दुसरा गट होता नितीन गडकरी यांचा. गडकरी हे जेष्ठ नेते होते. युतीच्या शासनात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून चमकदार कामगिरी केली होती. त्यांनी केलेल्या मुंबई पुणे एक्प्रेसवेमुळे अगदी देशपातळीवर देखील त्यांना ओळखलं जाऊ लागलं होत.
पुढे प्रमोद महाजनांचा मृत्यू झाला तेव्हा नितीन गडकरी यांना भावी नेतृत्व म्हणून केंद्रातून बळ देण्यात आलं. गडकरींनी मुंडे समर्थक नेत्यांच्या जागी आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यास सुरवात केली. यातूनच अंतर्गत खटके उडण्यास सुरवात झाली. मुद्दाम डावललं जात असल्यामुळे मुंडे नाराज होऊ लागले.
विनोद तावडे यांना विधानपरिषद सदस्य पद दिल्यामुळे देखील मुंडेंचे केंद्रीय नेतृत्वाशी वाद झाले होते.
२००८ साली मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून मधु चव्हाण यांची निवड झाली आणि वादाचा भडका उडाला.
मधु चव्हाण हे देखील एकेकाळचे मुंडे समर्थक. दोघांनी विद्यार्थी दशेपासूनच संघ परिवारात एकत्र कार्य केलं होतं. पण पुढे मुंडे वेगाने प्रगतीच्या पायऱ्या चढत गेले आणि त्या मानाने मधु चव्हाण भाजपमध्ये मागे पडले. दोघांच्यात काही वाद देखील झाले. दोघांचे मार्ग वेगळे झाले.
मधु चव्हाण यांनी गडकरी गटात जाणे पसंत केले. पुढे जेव्हा त्यांना मुंबई भाजपचे अध्यक्ष करण्यात आले तेव्हा मुंडें यांच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यांनी
तडकाफडकी आपल्या भाजपमधल्या सगळ्या पदांचा राजीनामा देऊन टाकला.
मुंडे यांचा राजीनामा म्हणजे भाजपसाठी मोठा भूकंप होता. ते लोकनेते होते. त्यांच्या पाठीशी तळागाळातल्या कार्यकर्त्यांची मोठी ताकद होती. मुंडेंची नाराजी पक्षाला परवडणारी नव्हती.
पण हे बंड थोपवलं होतं ते बाळासाहेब ठाकरेंनी..
त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबध कसे होते हे पाहणं गरजेचं ठरतं.
१९८३-८४ ची गोष्ट असेल. गोपीनाथ मुंडे त्यावेळी राजकारणात नवीन होते. शिवसेना आणि मुंबईबद्दल त्यांच्या मनात एक वेगळे आकर्षण होते. त्यावेळी अजून शिवसेना आणि भाजपची युती व्हायची होती. प्रमोद महाजन हे गोपीनाथरावांचे मित्र राष्ट्रीय राजकारणात चमकू लागले होते.
महाजनांनीच शिवसेनेबरोबर भाजपची युती साकार करण्यास मोलाची भूमिका बजावली होती. बाळासाहेबांनी देखील अटल बिहारी वाजपेयी यांचे नेतृत्व मला आवडते असे सांगत या युतीला होकार भरला होता. विशेष म्हणजे मनोहर जोशी, सुधीर जोशी या आपल्या नेत्यांना त्यांनी कमळ चिन्हावर निवडणुकीसाठी उभे करण्याचा निर्णय घेतला.
स्वतःचा पक्ष असतानाही त्यांना एखादी गोष्ट भावली की त्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी असायची…
अशावेळी पक्ष-बीक्ष ते बाजूला ठेवायचे !
१९९० सालच्या विधानसभा निवडणुकांवेळी त्यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना तब्बल शंभर सभा घेतल्या. गोपीनाथ मुंडेंची इच्छा होती की बाळासाहेबांनी परळी येथे सभा घ्यावी. बाळासाहेब अहमदपूरला सभा घेण्यासाठी आले होते.
थोड्याशा अस्वस्थ झालेल्या गोपीनाथरावांनी थेट अहमदपूर गाठून त्यांना माझ्या मतदारसंघात सभा घ्या अशी विनंती केली.
खरे तर गंगाखेड कंधार येथे शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारसभा होत्या. बाळासाहेबांना तिकडे जायचे होते. तरी ते मुंडेंना म्हणाले,
संध्याकाळी ५ वाजता सभा लाव, मी येतो.
बाळासाहेबांनी होकार देताच मुंडे थोडे गांगरून गेले. त्यांना अपेक्षाच नव्हती की बाळासाहेब होकार देतील. शिवाय एवढ्या कमी वेळात माणसे येतील का ? अशी भीती मनात होती. पण तब्बल ३० हजार लोक एवढ्या कमी वेळेत तेथे आले.
५ वाजताची वेळ उलटून गेली. सात वाजले. अजून शिवसेनाप्रमुख पोहचले नव्हते. गोपीनाथरावांना देखील पुढच्या प्रचारासाठी जायचं होतं. बाळासाहेबांची सभा होईल की नाही याची खात्री कोणाला नव्हती. तेवढ्यात त्यांचा मुंडेंना निरोप आला.
उशीर होईल पण मी येतोय. तू प्रास्ताविक कर आणि पुढे प्रचारासाठी निघून जा.
आणि खरंच दिलेल्या शब्दाला जागत बाळासाहेब आले. त्यांची वाट बघत बसलेली जनता जागची हलली नव्हती. मुंडे साहेब सांगतात,
“ते साडेआठ वाजता सभेला आले आणि त्यांनी मैदान मारून माझ्या विजयाचा मार्ग मोकळा केला. दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी झटणारा असा दुसरा नेता माझ्या तरी पाहण्यात नाही !”
पुढे १९९५ मध्ये जेव्हा युतीची सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आणि उपमुख्यमंत्रीपद भाजपकडे अशी वाटणी करण्यात आली होती.
मनोहर जोशी मुख्यमंत्री तर मुंडे उपमुख्यमंत्री झाले. गोपीनाथरावांना त्यासोबत महसूलमंत्रीपद हवे होते. युतीतील जागा वाटपानुसार महसूल भाजपकडे जाणार होते.
पण बाळासाहेबांनी जागावाटपात चक्क बदल केला. त्यांनी आपल्या वाट्याला आलेले गृहमंत्रीपद गोपीनाथ मुंडेंना दिले आणि सेनेच्या सुधीर जोशी यांच्यावर महसूलमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. तेव्हा त्यांनी गोपीनाथ मुंडेंना बजावून सांगतलं,
“गृहमंत्रीपदावर तुझ्यासारखा आक्रमक व कणखर माणूस हवा. मुंबईतील गुन्हेगारीशी मुकाबला करायचा असेल तर तूच त्या जागी पाहिजे.”
बाळासाहेब दिलेल्या शब्दाला जागणारे होते. आपल्या पक्षाच्या फायद्या तोट्याची गणिते न करता त्यांनी मराठी माणसाचा फायदा कशात आहे याचाच विचार केला.
हे ही वाच भिडू.
- दस का दम : बाळासाहेबांचे असेही दहा किस्से !
- बाळासाहेब म्हणाले, नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.
- या व्यक्तीने सर्वात पहिल्यांदा पवारांची ओळख बाळासाहेब ठाकरें सोबत करुन दिली होती
- भंगारात निघणाऱ्या युद्धनौकेचं बाळासाहेबांमुळे युद्ध स्मारकात रुपांतर होवू शकलं..