भाजप ठरवून “ठाकरेंना” स्पेस करुन देतय कारण खरं टार्गेट राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस..? 

राजकारणाच्या राड्यात मांजराची गोष्ट कायम सांगितली जाते. मांजराला कोपऱ्यात दाबलं तर मांजर काय करत. भितं, मागे मागे पळत.. पण आत्ता पळायचे सगळे मार्ग बंद झालेत हे लक्षात आलं की मांजर उलट अंगावर येतं.. फुत्कारतं.. राजकारणात पण हा नियम सर्वच पक्ष पाळतात, कोणालाही इतकी भिती दाखवली जात नाही की त्याची भिती संपून जाईल.

मग भाजपकडून शिवसेनेबाबत इतकी टोकाची भूमिका का घेतली जातेय, शिवसेना फोडण्यात भाजपला यश आलं आहे. राज्यात सत्ता स्थापन झाली आहे. काही दिवसात मंत्रीमंडळाचा विस्तार होईल असही सांगितलं जातं आहे.

राज्यात विरोधी पक्षांच्या हातातून सत्ता खेचून घेण्याची यशस्वी कामगिरी केली आहे. इतक्या सगळ्या गोष्टी मनासारख्या घडून आलेल्या असताना देखील ‘भाजप’ चं केंद्रीय नेतृत्व अजूनही आक्रमक का? 

यासाठी सर्वात पहिल्यांदा आपणाला पहावं लागेल, 

भाजपला आत्ता विरोधी पक्ष म्हणून कोणता पक्ष उरला आहे. तर याचं उत्तर आहे ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस. पैकी विरोधी पक्षनेते पद ज्यांच्याकडे आहे तो पक्ष आहे राष्ट्रवादी. कॉंग्रेस कमकुवत करण्याचं धोरणं केंद्रातूनच चालू असल्याने त्यासाठी महाराष्ट्रात वेगळं धोरणं आखण्याची गरज भाजपच्या केंद्रिय नेतृत्वाला नाही. अशा वेळी दोन पक्ष मैदानात उरतात एकतर ठाकरेंची शिवसेना आणि दूसरा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस. 

आत्ता मुद्दा येतो तो म्हणजे ठाकरेंची शिवसेना वीक होण्याचा फायदा कोणाला होणार आहे. एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांनी प्रामुख्याने राष्ट्रवादी पक्षावर टिका केली. शिंदे गटासोबतचे साधारण २३ आमदार असे आहेत जे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आलेत. 

यासाठी आपण काही मतदारसंघाची उदाहरणं पाहूया.

जस की शंभूराज देसाई निवडून आलेत तो पाटण मतदारसंघ. शिंदे गटात गेल्यामुळे शिवसेनेचे काही पारंपारिक मतदार नाराज आहे. पण इथं पारंपारिक लढाई होते ती देसाई विरुद्ध पाटणकर घराण्यात. २०१९ च्या निवडणूकीत धैर्यशील पाटणकर या ९२, ०९१ मतं होती तर शंभुराज देसाई यांना १,०६, २६६ मते होती. शंभुराज देसाई यांच्या बंडखोरीचा ठाकरेंच्या शिवसेनेला बदला घ्यायचा झाला तरी ठाकरेंच्या शिवसेनेपुढे पर्याय कोणाचा उभा राहतो तर राष्ट्रवादीच्या पाटणकर यांचाच. 

असच भूम परांडाबद्गल इथे तानाजी सावंत बंडखोर आमदारांच्या यादीत आहेत. राहूल मोटे हे राष्ट्रवादीचे विरोधक आहेत. अशा वेळी ठाकरेंना तानाजी सावंत यांच्या बंडखोरीचा बदला घ्यायचा झाला तरी राहूल मोटेंचा व पर्यायाने राष्ट्रवादी पक्षाशिवाय त्यांच्याकडे पर्याय रहात नाही. सुहास कांदेविरोधात पंकज भुजबळ, संदीपान भुमरेंच्या विरोधात राष्ट्रवादीचे नारायण गार्डे, महेश शिंदेंच्या विरोधात शशिकांत शिंदे, महेंद्र थोरवेंच्या विरोधात सुरेश लाड अशी ही बरीच मोठ्ठी यादी.. 

इथे ठाकरेंच्या शिवसेनेला बंडखोर आमदारांचा पराभव करायचा असेल तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांशिवाय पर्याय नाही, त्यामुळे फायदा कोणाचा होणार तर राष्ट्रवादीचाच..

अशा वेळी ठाकरेंची शिवसेना संपून “राष्ट्रवादी प्रबळ” होण्याचे चान्स जास्त आहे… हे टाळायचं असेल तर भाजपला ठाकरेंच्या शिवसेनेला इतकी सहानभुती मिळवून देणं की त्या त्या मतदारसंघात ठाकरेंची सेना स्वत:च्या ताकदीवर स्वत:चा उमेदवार उभा करु शकेल. 

अशीच गोष्ट मुंबई महानगरपालिकेची. राष्ट्रवादीला कधीही मुंबई महानगरपालिकेत स्वत:च अस्तित्त्व निर्माण करता आलेलं नाही. पण दूसरीकडे कॉंग्रेसकडे मुंबई महानगरपालिकेचा कारभार राहिलेला आहे. अशा वेळी ठाकरेंची शिवसेना पुर्णपणे संपूष्टात आली तर कॉंग्रेसचा पर्याय भाजपसमोर येवू शकतो. 

ग्रामीण महाराष्ट्रात शिवसेना संपेल तिथे विरोधी गटाचे मतदार राष्ट्रवादीला जवळ करतील तर मुंबईसारख्या ठिकाणी ते कॉंग्रेसला बळ देतील.अन् भाजपला नेमकं हेच नको असणार आहे.. 

तर त्यासाठी कोणती स्ट्रेटेजी अंमलात येवू शकते, तर भाजप विरोधी गट म्हणून शिवसेनाला स्पेस मोकळी करून देणं. जेणेकरून ठाकरेंची शिवसेना उभारी घेईल व ती कॉंग्रेस-राष्ट्रवादी शिवाय.. 

अस म्हणण्याचं कारण काय आहे.. तर गेल्या चार दिवसात घडलेल्या घडामोडी.. 

 

पहिली गोष्ट म्हणजे राज्यपालांच मराठी माणसांच्या विरोधातलं स्टेटमेंट.. 

राजस्थानी आणि गुजराती माणसांनी आपले पैसे परत नेले तर मुंबईत काहीच राहणार नाही अस वक्तव्य करुन “मराठी माणूस” या मुद्द्याला ठिणगी लावण्याचं काम राज्यपालांनी केलं. राज्यपाल हे कोणी साधेसुधे व्यक्ती नाहीत की ते मनाला येईल तस बोलू शकतील. सगळं काही ड्राफ्ट होतं ही शक्यता गृहित धरायची झाल्यास राज्यपालांनी ठरवून हे स्टेटमेंट केलं का? असा प्रश्न पडतो. आणि हे ठरवून केलेलं स्टेटमेंट असेल तर याचा फायदा “ठाकरेंच्या शिवसेने” शिवाय दूसरा कोणाला होणार हे समजण्याइतपत भाजपचं नेतृत्व अज्ञानी नक्कीच नाही.. 

दूसरी गोष्ट म्हणजे, संजय राऊतांना अटक व टायमिंग.. 

गेल्या अडीच वर्षात संजय राऊतांनी भाजपविरोधात जोरदार फिल्डिंग लावली होती. पत्रकार परिषदा घेवून ते भाजपला अडचणीत आणत होते. तेव्हा नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली. 

पण संजय राऊतांवर ईडीची कारवाई फक्त चौकशीपुरतीच मर्यादित होती. आत्ता शिवसेना फोडायला भाजपला यश आलं. खऱ्या अर्थाने संजय राऊतांचे पंख छाटले गेले. संजय राऊत संपल्यात जमा आहेत असा प्रचार बंडखोर आमदारांकडून होत असताना संजय राऊतांना अटक करुन पुन्हा त्यांच्या मागे सहानभुती निर्माण करण्याची गरज काय होती? संजय राऊतांना आत्ता अटक करुन ठाकरेंच्या सेनेला सहानभूती देण्याचंच काम भाजपने केलं आहे का? असा प्रश्न उपस्थित होतं.. 

आणि तिसरी गोष्ट म्हणजे, जे.पी. नड्डा यांच वक्तव्य.. 

महाराष्ट्रातून शिवसेनाही संपत चालली असून आत्ता केवळ भाजपच राहणार आहे. शिवसेना संपली आहे हे वक्तव्य कोणत्याही स्थानिक किंवा साध्या नेत्यानं केलं नाही तर ते भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हे वक्तव्य महाराष्ट्राच्या बाहेरच्या व्यक्तीने केलं आहे. त्यामुळे अशा स्टेटमेंटचा फायदा हा पर्यायाने ‘महाराष्ट्र धर्म’ आणि ‘मराठी माणूस’ या दोन्ही अजेंड्याखाली ठाकरेंच्या शिवसेनेलाच होवू शकतो.. 

आत्ता अस असताना ठाकरेंच्या शिवसेनेला “भाजपचं” नेतृत्व पुन्हा भरारी देण्याचं काम का करेल.. 

याच उत्तर थोडक्यात पहायचं तर वर आपण बोललं तसं कॉंग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेची विरोधी पक्षाची स्पेस खावू नये म्हणून. कारण कितीही झालं तरी कॉंग्रेस देशपातळीवरील पक्ष आहे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मोदीविरोधी पक्षांना एकत्र आणण्याची ताकद बाळगुन आहेत. थोडक्यात हे दोन्ही पक्ष देशपातळीवरील राजकारणात मोदींना अडथळा ठरतात. पर्यायाने ठाकरेंच्या शिवसेनेला प्रमुख विरोधी पक्ष करणं हे एखाद्या राज्यापुरती मर्यादीत राहणारी गोष्ट ठरू शकते. जी भाजपला किमान फायद्याची आहे. 

त्याचप्रमाणे, ठाकरेंच्या हातात हिंदूत्वाचा मुद्दा राहिलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्यासह असणाऱ्या सर्व आमदारांनी उद्धव ठाकरेंना हिंदूत्वाच्या मुद्द्यावरच टार्गेट केलेलं आहे. अशा वेळी राज्यपालांच स्टेटमेंट, नड्डांच वक्तव्य यातून “महाराष्ट्र धर्म, मराठी माणूस” या मुद्द्यावर शिवसेनला परत आणणं व तिथेच मर्यादित ठेवून हिंदूत्वाचा मुद्दा फक्त भाजपकडे ठेवण्याचा अजेंडा भाजपच्या नेतृत्वाचा असू शकतो… 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.