शिवसेनेतील इतिहास अन् भाजपचं भविष्य यामुळेच अनपेक्षितपणे अतुल सावेंना कॅबिनेट मिळालंय

आज राज्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शिंदे गट आणि भाजप यांच्यात राजकीय समतोल राखत शिंदे गटाला ९ आणि भाजपला ९ अशी समसमान मंत्रिपदं मिळाली आहेत. 

मंत्रिमंडळ विस्तारात संभाजीनगरातून अतुल सावे यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलंय. त्यामुळे अतुल सावे यांच्या रूपाने कॅबिनेटमध्ये मंत्रिपद मिळालेला भाजपचा कट्टर हिंदुत्ववादाचा चेहरा समोर आलाय.  

भाजप नेते हरिभाऊ बागडे यांनी काही दिवसांपूर्वीच “औरंगाबादचा पुढचा खासदार भाजपचा असेल” असं विधान केलं होतं. त्यामुळे अतुल सावे यांना मंत्रिपद देऊन भाजपकडून आगामी महानगरपालिका निवडणूक आणि लोकसभेसाठी तयारी केली जात आहे असं म्हटलं जातंय.

याआधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यामुळे अतुल सावे चर्चेत आले होते.

उद्धव ठाकरे यांनी मोरेश्वर सावे यांच्यावर केलेल्या विधानावर टीका करतांना अतुल सावे म्हणाले होते.

“माझ्या वडिलांनी बाबरी मस्जिदीच्या विध्वंसासाठी कारसेवा केली होती. अयोध्येवरून आल्यानंतर ते जितक्या प्रखरपणे हिंदुत्वावर बोलले ते शिवसेना नेत्यांना पटले नव्हते. त्यांचं मनोबल तोडण्यात आलं आणि त्यांचं लोकसभा तिकीट सुद्धा नाकारण्यात आलं होतं.” अशी टीका अतुल सावे यांनी केली होती.

त्यात अतुल सावे यांनी म्हटलं होत कि, “मुख्यमंत्र्यांनी माझ्या वडिलांची अर्धवट कथा सांगितली आहे. एवढंच होतं तर त्यांना लोकसभा तिकीट का नाकारण्यात आलं होतं? मोरेश्वर सावे यांना जनतेने दिलेली धर्मवीर ही पदवी सुद्धा नाकारण्यात आली होती.” अशी टीका सुद्धा अतुल सावे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती.

दोनदा आमदार झालेले अतुल सावे याआधी राज्यमंत्री होते.

अतुल सावे हे पहिल्यांदा २०१४ मध्ये औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून निवडून आले होते. फडणवीस कॅबिनेटच्या २०१८ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारतात अतुल सावेंना राज्यमंत्री पद देण्यात आलं होतं. 

अतुल सावेंना खाणकाम आणि उद्योग तसेच अल्पसंख्यांक विकास व वक्फ या खात्यांचे राज्यमंत्रीपद मिळाले होते. दोन खात्यांच्या राज्यमंत्री पदासोबत हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सुद्धा देण्यात आलं होतं. तर आता आमदारकीच्या दुसऱ्या टर्ममध्ये थेट कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलंय.

परंतु अतुल सावे हे केवळ आमदारकीमुळे महत्वाचे नाहीत.. 

अतुल सावे यांना संभाजीनगरातला भाजपचा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून पाहिलं जातंय. अतुल सावे निव्वळ दोनदा आमदार असल्याने महत्वाचे नाहीत तर त्यांचे वडील मोरेश्वर सावे यांच्या पार्श्वभूमीमुळे त्यांना महत्व आहे.

अतुल सावे यांचे वडील मोरेश्वर सावे हे सेनेचे औरंगाबाद शहरातले पहिले खासदार होते सोबतच औरंगाबाद महानगरपालिकेचे सेनेचे पहिले महापौर सुद्धा होते. मोरेश्वर सावे हे निव्वळ खासदार आणि महापौरच नव्हते तर कट्टर हिंदुत्ववादी नेते सुद्धा होते.

लातूरच्या नगरपालिकेत नगरसेवक असलेले मोरेश्वर सावे व्यवसायासाठी औरंगाबाद शहरात आले आणि सेनेकडून खासदार झाले.

मोरेश्वर सावे यांचा जन्म कोकणातील ठाणे जिल्ह्यात झाला होता. परंतु मोरेश्वर सावे यांनी ठाणे सोडलं आणि लातूरला स्थायिक झाले. तरुण वयाचे असतांना मोरेश्वर सावे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात भाग घेतला होता. 

त्यांनंतर उस्मानिया विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतल्यांनंतर लातूरच्या नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. व्यावसायिक कारणांसाठी मोरेश्वर सावे यांनी लातूर सोडलं आणि औरंगाबाद शहरात स्थायिक झाले. 

१९८८ च्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते मशाल या चिन्हावर अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. तर १९८९ मध्ये सेनेच्या पाठिंब्यावर औरंगाबाद महानगरपालिकेत सेनेचे पहिले महापौर झाले होते. 

औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौर आणि औरंगाबाद शहराचे खासदार सुद्धा!

१९८९ मध्ये मोरेश्वर सावे महापौर तर झाले होतेच परंतु याच काळात औरंगाबाद मतदारसंघातून सेनेचे खासदार म्हणून सुद्धा ते निवडून आले होते. सेनेच्या पहिल्या चार खासदारांपैकी मोरेश्वर सावे हे एक खासदार होते. 

पहिले खासदार असलेल्या मोरेश्वर सावे यांचं सेनेत मोठं वजन होतं. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक मानले जात होते. सावे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपच्या नेत्यांप्रमाणेच राष्ट्रीय पातळीवर कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेत होते. 

त्यांनी राममंदिराच्या निर्मितीसाठी दोनदा कारसेवा केली होती. 

१९८९ मध्ये सर्वप्रथम विश्व हिंदू परिषदेकडून कारसेवेची घोषणा करण्यात आली होती. शिवसेनेचे खासदार असलेल्या मोरेश्वर सावे आणि विद्याधरजी गोखले यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून कारसेवेत सहभागी होण्याची परवानगी मागितली होती.

बाळासाहेबांकडून परवानगी मिळाली नाही. तरीही दोघांनी कारसेवेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आपण खासदार आहोत ही ओळख लपवण्यासाठी गाडीच्या डब्यावर असलेले दोघांचे रिजर्वेशन फाडून टाकले. रेल्वे सुल्तानपूरला पोहोचल्यावर रेल्वे अयोध्येला जाण्यापासून थांबवण्यात आली होती.

सुल्तानपूरवरून अयोध्या दूर असल्यामुळे चौघे जण तेथून सायकल रिक्षाच्या माध्यमातून कुडेबहार नावाच्या गावात पोहोचले. त्या गावातून कारसेवकांच्या सोबत ते अयोध्येला पोहोचले. अयोध्येत पोहोचल्यानांतर त्यांनी भाषण सुद्धा केलं होतं.

सेना खासदारांच्या अयोध्येत येण्याची कुणकुण मुलायम सिंग सरकारला लागली होती. त्याची दखल सावेंना फैजाबादच्या कलेक्टरच्या मार्फत लखनऊला आणण्यात आलं. त्यांनतर सावेंना लखनऊ वरून दिल्लीला पाठवण्यात आलं होतं. अशाप्रकारे मोरेश्वर सावे यांची कारसेवा पूर्ण झाली होती.

१९९२ मध्ये दुसऱ्यांदा कारसेवा सुरु झाली….

 १९९२ मध्ये जेव्हा दुसऱ्यांदा कारसेवा सुरु झाली तेव्हा शिवसेनेच्या गटाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी मोरेश्वर सावे यांच्यावर होती. त्यांनी दिल्लीच्या नॉर्थ अव्हेन्यूमध्ये कार्यकर्त्यांना एकत्र करून संमेलन घेतलं. 

१९९२ मध्ये उत्तर प्रदेशात भाजपचे कल्याण सिंग मुख्यमंत्री होते त्यामुळे पूर्वीच्या मुलायमसिंग यादव सरकारप्रमाणे अडथळे आले नाहीत. सगळे कारसेवक अयोध्येला जाऊन पोहोचले व कारसेवेच्या दिवशी दुपारी १२ वाजता बाबरी मस्जिदीजवळ पोहोचले. 

कारसेवक बाबरी मस्जिदीच्या तीनही घुमटांवर चढण्यासाठी प्रयत्न करत होते. सगळे जण आपाअपल्या हातात असलेल्या खोदकामाच्या हत्यारांच्या साहाय्याने बाबरी मस्जिद पाडण्याचे प्रयत्न करत होते. याच दरम्यान मुरली मनोहर जोशी आणि लालककृष्ण अडवाणी सुद्धा जवळ होते.

अशाप्रकारे मोरेश्वर सावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून कारसेवा पूर्ण केली होती. या कारसेवेनंतर लालकृष्ण आडवाणी यांच्याप्रमाणेच मोरेश्वर यांच्यावरही बाबरी मस्जिद पाडण्यासाठी आरोपी ठरवण्यात आलं होतं.

कारसेवेत सहभागी होऊन मोरेश्वर सावेंनी कट्टर हिंदुत्वाच्या आधारावर राजकीय प्रवास केला.

मोरेश्वर सावे यांची १९८८ ते १९९६ ही आठ वर्षांची राजकीय कारकीर्द प्रचंड वादळी होती. हिंदुत्वाचा मुद्दा आणि औरंगाबाद सारख्या वादळी शहरातील राजकारण या मध्ये मोरेश्वर सावेंनी आपला ठसा उमटवला. 

मोरेश्वर सावे यांच्या नेतृत्वात औरंगाबाद शहरात सेनेचं खान कि बाण हे राजकीय समीकरण घट्ट झालं. याच समीकरणाच्या आधारावर सेनेनं औरंगाबाद शहरात आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि शहरावरची पकड घट्ट केली होती. परंतु १९९६ मध्ये मोरेश्वर सावे यांना शिवसेनेनं तिकीट नाकारलं होतं. 

आता मोरेश्वर सावे यांच्या मुलाला म्हणजेच अतुल सावे यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन भाजपने आगामी महानगरपालिका आणि लोकसभा निवडणुकांचे संकेत दिले आहेत.

हे ही वाच भिडू  

 

Leave A Reply

Your email address will not be published.