या १२ पैकी ९ जागा जिंकल्या तरच भाजपचं मिशन ४५ सत्यात उतरु शकेल

भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मिशन ४५ ची घोषणा केलीये. मिशन ४५ म्हणजे काय तर, २०२४ ला महाराष्ट्रात एकूण ४५ खासदार निवडून आणण्याचा मानस भाजपने बोलून दाखवलाय. आता तर, त्या दृष्टीने भाजपने तयारीसुद्धा सुरू केलीये.

महाराष्ट्रात भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचं येणं जाणं सुरू झालंय आणि अप्रत्यक्षपणे भाजपने २०२४ च्या मिशन ४५ ला सुरूवात केलीये.

आता भाजपने ४५ खासदार निवडून आणण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं असलं तरी ते प्रत्यक्षात उतरवण्यात कोणते अडथळे आहेत हे पाहणं गरजेचं आहे. राज्यात एकूण ४८ लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी २३ मतदारसंघात भाजपची सत्ता आहे तर, १३ ठिकाणी शिंदे गटाची सत्ता आहे.

उरलेल्या १२ मतदारसंघात सगळ्यात मोठा पक्ष आहे तो शिवसेना. शिवसेनेचे सध्या ५ खासदार आहेत. त्यानंतर नंबर लागतो तो ४ खासदार असलेल्या राष्ट्रवादीचा. काँग्रेस आणि एमआयएमचे प्रत्येकी एक खासदार आणि एका लोकसभा मतदार संघात अपक्ष उमेदवाराची सत्ता आहे. 

आता बघुया या १२ मतदार संघात २०१९ च्या निवडणूकीतली लढत कश्याप्रकारे झाली होती.

त्यासाठी शिवसेनेची सत्ता असलेले मतदार संघ कोणते आहेत ते पाहायला हवं,

१)मुंबई दक्षिण:

मुंबई दक्षिण या लोकसभा मतदार संघात सध्या शिवसेनेचे अरविंद सावंत हे खासदार आहेत. मागच्या दोन टर्म म्हणजे २०१९ आणि २०१४ या दोन्ही वेळेस १ लाखांहून अधिक मताधिक्य मिळवत अरविंद सावंत यांनी विजय मिळवलाय. २०१९ साली काँग्रेसचे मिलिंद देवरा हे दुसऱ्या स्थानावर राहिले होते.

याबरोबरच सावंत यांचं शिवसेनेतलं स्थानही मोठं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सावंत खंबीरपणे उभे असलेले दिसले. त्यामुळे, या मतदार संघात सावंतांची आधीपासूनच ताकद आहे त्यात शिवसेनाही विशेष ताकद लावेल असं दिसतंय.

२) ठाणे:

ठाणे लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत. २०१४ आणि २०१९ साली शिवसेनेचे राजन विचारेच खासदार म्हणून निवडून आलेत. २०१४ साली २ लाखांहून अधिकचं मताधिक्य मिळवलं होतं तर, २०१९ ला तब्बल ४ लाखांची लीड घेऊन ते निवडून आले होते. शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेलेले आनंद परांजपे हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर दुसऱ्या स्थानावर राहिले होते.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला आहे. हा शिंदेंचा बालेकिल्ला असला तरी राजन विचारे यांचीही ठाण्यात मोठी ताकद आहे. आनंद दिघे यांच्या तालमीत एकनाथ शिंदेंसोबतच विचारेंनीही राजकीय धडे घेतलेत त्यामुळे, या ठिकाणी मुख्यमंत्री कुणाला उमेदवारी देतायत हे पाहणं गरजेचं असणार आहे. तर, शिंदे विरूद्ध विचारे अशी ही लढत चुरशीची होणार हे नक्की.

३) परभणी:

परभणी मतदार संघात १९९९ पासून शिवसेनेचीच सत्ता आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद या भागात किती मोठी आहे हे लक्षात येतंय. तर, मागच्या दोन टर्म शिवसेनेचे संजय जाधव हेच खासदार झालेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांची १ लाखाची लीड घसरून ५० हजारांकडे आली होती खरी पण, आता पक्षातल्या फुटीनंतर स्वत:साठी पक्षातलं मोठं स्थान निश्चित करायचं असेल तर ते २०२४ला सुद्धा नक्कीच ताकदीने उतरतील. २०१९ ला राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

४) उस्मानाबाद:

ओमराजे निंबाळकर हे उस्मानाबाद मतदार संघाचे विद्यमान खासदार आहेत. मागच्या दोन टर्म इथे शिवसेनेचेच खासदार आहेत. एकुण मतदान कुणाला किती मिळालं पाहायचं झालं तर, २०१९ ला उस्मानाबादेत शिवसेनेनंतरचा दुसरा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस ठरलेला. त्यामुळे महाविकास आघाडीची युती व्यवस्थित टिकली तर, या मतदार संघावर महाविकास आघाडी हक्क सांगू शकेल. राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यापेक्षा एक लाख सत्तावीस हजार अधिक मतं ओमराजेंनी मिळवली होकती.

५) रत्नागिरी-सिंधुदूर्ग:

२००८ मध्ये वेगळा मतदार संघ झालेल्या रत्नागिरी-सिंधुदूर्गात २००९ साली नितेश राणे यांनी काँग्रेसकडून विजय मिळवला होता. त्यानंतर मात्र, २०१४ आणि २०१९ ला शिवसेनेचे विनायक राऊत यांनी विजय मिळवलाय. २०१९ साली त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नितेश राणेंपेक्षा जवळपास पावणे दोन लाख अधिक मतं मिळवली होती.

आता पाहुया राष्ट्रवादीची सत्ता असलेले मतदार संघ:

१) रायगड:

हा मतदार संघही २००८ साली वेगळा झाला. २००९ आणि २०१४ मध्ये शिवसेनेच्या अनंत गीते यांनी निवडणूक जिंकली तर, २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे निवडून आले. या मतदार संघातही २०२४ पर्यंत महाविकास आघाडीची युती कायम राहिली तर, भाजपसाठी ही सीट जिंकणं कठीण होईल.

२) सातारा:

सातारा मतदार संघात १९९९  पासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता काही गेली नाहीये. उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर २००९, २०१४ आणि २०१९ साली निवडून आले. २०१९ला निवडून आल्यानंतरही त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि पोटनिवडणूक झाली.

आता भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत असलेल्या उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटलांनी पराभ केला. सलग पाच निवडणुका आणि एक पोटनिवडणूक राष्ट्रवादीने जिंकलीये. यावरून या भागात राष्ट्रवादीचं असलेलं वर्चस्व लक्षात येतं.

३) बारामती:

बारामती मतदार संघ हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा होम ग्राऊंड आहे. १९९६ पासून बारामती मतदार संघात पवार कुटूंबीयांचीच सत्ता पाहायला मिळतेय. १९९६ ते २००४ पर्यंत शरद पवार आणि त्यानंतर आतापर्यंत त्यांची कन्या सुप्रिया सुळे या निवडून येतायत.

हा मतदार संघ जिंकण्यासाठी मात्र, भाजपही जोर लावतोय. अगदी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनीही काही दिवसांपुर्वी बारामती दौरा केला होता. त्यामुळे, बारामती जिंकण्यासाठी भाजपचा विशेष आग्रह असल्याचं कळतंय.

४) शिरूर:

२००८मध्ये सुरू अस्तित्वात आलेल्या या मतदार संघात २००९ आणि २०१४ साली शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील निवडून आले होते. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले अमोल कोल्हे हे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापेक्षा ५८,००० मतं अधिक मिळवत विजयी झाले होते.

काँग्रेसकडेही एक खासदार आहे.

१) चंद्रपूर:

सुरेश नारायण धानोरकर हे चंद्रपूर मतदार संघातले काँग्रेसचे खासदार आहेत. २०१९ मध्ये अवघ्या ४४ हजार मतांनी त्यांचा विजय झाला होता. त्याआधी सलग तीन वेळा मात्र, भाजपचे हंसराज अहीर हे खासदार राहिलेत. याशिवाय, २०१४ मध्ये त्यांनी मिळवलेलं लीडही दोन लाखांच्या वर होतं.

उरलेले दोन खासदार कोण आहेत ते बघुया.

१) औरंगाबाद: 

एआयएमआयएम या पक्षाचे इम्तियाज जलील यांचा अटीतटीच्या सामन्यात फक्त साडे चार हजार मतांनी विजय झाला. दुसऱ्या स्थानावर राहिलेले शिवसेनेचे चंद्रकांत खैरे याआधी मात्र, १९९९ पासून सलग चार वेळा खासदार राहिलेत.

२) अमरावती:

सध्या अमरावतीमध्ये अपक्ष उमेदवार नवनीत राणा या खासदार आहेत. २००९ आणि २०१४ साली शिवसेनेचे खासदार असलेले आनंदराव अडसूळ हे ही आता शिवसेनेत नाहीत. राणा आणि भाजपची जवळीकही लक्षात घेणं महत्वाचं आहे.

भाजपला आपलं मिशन ४५ सत्यात उतरवण्यासाठी आता भाजप आणि शिंदेगटाचे असलेल्या खासदारांशिवाय या १२ लोकसभा मतदार संघातल्या ९ मतदार संघात विजय मिळवावा लागेल.

त्यामुळे भाजपचं हे मिशन ४५ कितपत यशस्वी होतं हे २०२४ च्या निकालानंतर स्पष्ट होईल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.