वादात सापडायची अनिल बोंडेंची ही काही पहिली वेळ नाय

त्रिपुरात झालेल्या हिंसाचारावरून राज्यातलं विशेषत: अमरावतीमधलं वातावरण चांगलंच तापलंय. हिंसाचारामुळं जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती, सोबतच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती. वातावरण काहीसं निवळल्यानंतर पोलिसांनी अमरावतीत अटकसत्र सुरू केलं.

भाजपनं शनिवारी आयोजित केलेल्या बंदवरुन पोलिसांनी भाजपचे नेते आणि राज्याचे माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडेंना ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर त्यांची सुटकाही करण्यात आली. त्यांच्यावर हिंसा पेटवण्याचा आरोप ठेवण्यात आला. बोंडे यांनी अटकेनंतर, ‘कितीही आवाज दाबला, तरी हिंदू गप्प बसणार नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली. त्यातच बोंडेंच्या अटकेनंतर, सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा कलगीतुराही रंगलाय.

थोडक्यात अनिल बोंडेंना झालेली अटक त्यावरून पेटलेल्या राजकारणामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पण भिडू लोक वादात सापडण्याची अनिल बोंडेंची ही काही पहिली वेळ नाही.

सगळ्यात आधी अनिल बोंडेंबद्दल सांगतो-

अनिल बोंडे हे भाजपचे नेते आणि माजी कृषीमंत्री व माजी आमदार आहेत. अमरावतीच्या मोर्शी मतदारसंघातून ते निवडून गेले. सगळ्यात आधी ते २००९ मध्ये अपक्ष आमदार म्हणून निवडले गेले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली आणि मोठ्या मतफरकानं विजय मिळवला. फडणवीस सरकारच्या काळात त्यांच्याकडे कृषीमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र २०१९ च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या देवेंद्र भुयार यांनी बोंडेंचा पराभव केला आणि धक्कादायक निकाल नोंदवला.

याआधी बोंडे कुठल्या वादात अडकले होते?

२०१९ च्या फेब्रुवारी महिन्यात बोंडे यांनी आपल्या मतदार संघात कृषी विकास परिषदेचं आयोजन केलं होतं. त्या परिषदेत स्टेजवर अश्लील डान्स होत असल्याची क्लिप चांगलीच व्हायरल झाली. महाराष्ट्रासह देशभरातून यावर टीकेची झोड उठवण्यात आली. विरोधकांनी यावरून भाजप महिलांचा किती आदर करतं हे दिसून येतं अशी टीका केली.

बोंडें यांनी मात्र हे सगळे आरोप धुडकावून लावले. त्यांचं म्हणणं होतं, ‘हा नाचाचा पारंपारिक ‘धंधार’ प्रकार आहे. यात पुरुष महिलेसारखा पेहराव करून नाचतो. स्टेजवर महिलांची अजिबात उपस्थिती नसते. या प्रकाराला ‘खडी गंमत’ म्हणतात. शहरी लोकांना हा प्रकार माहीत नसला, तरी गावाकडच्या गरीब लोकांसाठी हा मनोरंजनाचा स्रोत आहे. त्यामुळं आयोजनात काहीच गैर नाही आणि मी माफी मागण्याचा विषयही येत नाही.’

मार्च २०२१ मध्येही बोंडेंना वादाला सामोरं जावं लागलं. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर राज्यभरातल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं. यावेळी अमरावतीमध्ये झालेल्या आंदोलनात अनिल बोंडेही सहभागी झाले. आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी आलेल्या पोलिसांनी बोंडेंना हटकलं. यावेळी त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये असभ्य शब्दांत बाचाबाची झाली. दोघांनीही एकमेकांना ‘कुत्रे’ म्हणल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि बोंडे यांना टीकेचं धनी ठरावं लागलं.

आता अमरावतीमधल्या हिंसेनंतर बोंडे यांना अटक करून त्यांची सुटका करण्यात आली असली, तरी आगामी काळात या वादाला कुठलं वळण लागेल हे सांगता येत नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.