भाजपचे मुख्यमंत्री म्हणाले, वाजपेयी पंतप्रधान होतील पण आधी निवडून तरी येऊ देत.

कल्याणसिंग यांच्या राजकीय कारकीर्दीला ग्रहण खरं तर १९९८ -९९ पासून लागलं. जेव्हा हे कल्याणसिंग नावाचं रसायन अटलबिहारी वाजपेयी नावाच्या दुसऱ्या रसायनाला नडलं होतं.

कल्याण सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यातील हा संघर्ष १९९७ मध्येच सुरु झाला होता.

त्यावेळी भाजप आणि बसपाला विधानसभेच्या अर्ध्या अर्ध्या जागा मिळाल्या. यामुळं भाजप – बसपाने ६ – ६ महिने सरकार चालवण्याच्या फॉर्म्युलाचा शोध लावला होता. पण ६ महिन्यानंतर मायावती खुर्ची सोडण्यास तयारच होईनात.

अशा परिस्थितीत कल्याणसिंग यांना वाटलं की वाजपेयींना पंतप्रधान होण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर बसपाच्या नेतृत्त्वाची गरज पडणार आहे. त्यामुळे ते युती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या बदल्यात त्यांनी मायावतींना सहा महिन्यानंतर ही मुख्यमंत्री ठेवण्याचं मान्य केलं असावं.

त्यावेळी कल्याण सिंह यांनी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना सांगितले होतं,

मला वाटतय की मी माझ्या स्वत:च्या पक्षाच्या षडयंत्राचाचं बळी ठरतोय.

पुढं १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी १३ महिने पंतप्रधान झाले. त्यावेळी कल्याणसिंग आणि वाजपेयींमधले संघर्ष आता उघडउघड दिसू लागले होते. त्या दिवसांत लखनौमध्ये एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यात कल्याण सिंग यांना प्रश्न विचारला गेला की अटलबिहारी पुन्हा पंतप्रधान होतील याची आपल्याला खात्री वाटते का ? यावर कल्याणसिंग उत्तरले,

त्यांनी पंतप्रधान व्हावे अशी माझी ही इच्छा आहे, पण पंतप्रधान होण्यासाठी पहिल्यांदा खासदार तर झालं पाहिजे.

आता त्यांच्या वक्तव्याचा राजकीय क्षेत्रात खूप व्यापक अर्थ घेण्यात आला.

बरं एवढंच बोलून कल्याणसिंग थांबले नाहीत, तर त्यांनी लखनौमध्ये निवडणुकांआधी आढावा बैठक घेतली. या बैठकीत ते म्हणाले की,

लखनौमध्ये निष्पक्ष मतदान व्हावे अशी माझी इच्छा आहे.

त्यामुळे मतदानाच्या दिवशी लखनौमध्ये प्रशासनाकडून बरीच बंदोबस्त करण्यात आला होता. आता किल्ला होता वाजपेयींचा. आणि विशेष म्हणजे ज्या भागात भाजपच प्रभावा क्षेत्र होत त्या त्या भागातच जास्तीचा बंदोबस्त करण्यात आला होता.

याचा परिणाम असा झाला की, अटलबिहारी वाजपेयींनी लखनौमधून निवडणूक तर  जिंकली, पण यूपीमधला भाजप निम्म्यानं कमी झाला. १९९८ मध्ये भाजपला यूपीमधून ५८ जागा मिळाल्या. आणि त्या १९९९ मध्ये २९ वर आल्या.

या घटनेला वाजपेयींना पंतप्रधान होण्यापासून रोखण्यासाठी कल्याणसिंगांनी टाकलेला डाव म्हणून प्रसिद्धी मिळाली. पण, वाजपेयी एनडीएच्या माध्यमातून पंतप्रधान होण्यात यशस्वी झाले.

यानंतर कल्याण सिंग यांना हटवण्याच्या मागणीने पक्षात जोर पकडला. केंद्रीय नेतृत्व कल्याणसिंगांवर दबाव आणण्यात यशस्वी झाले. आणि १२ नोव्हेंबर १९९९ ला कल्याण सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी रामप्रकाश गुप्ता यांना मुख्यमंत्री करण्यात आले.

मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर कल्याण सिंग यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना ‘साजिशबाज’  आणि ‘ब्राह्मणवादी मानसिकतेने ग्रस्त’ म्हणून हिणवले. 

यानंतर पक्षाने त्यांना निलंबित केले आणि कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतरही कल्याणसिंग यांनी वाजपेयींच्या विरुद्ध बोलणं थांबवलं नाही. त्यावेळी कुशाभाऊ ठाकरे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. जेपी माथुर यांच्या नेतृत्वाखालील शिस्त समितीने त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याची शिफारस केली.

आणि शेवटी ९ डिसेंबर १९९९ रोजी कल्याण सिंग यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.