भाजपच्या या चेहऱ्यांनी महाविकास आघाडीचा एक दिवस देखील सुखाने जाऊ दिलेला नाही…

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप अत्यंत आक्रमक विरोधी पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे. सरकारला सातत्यानं अडचणीत आणण्यामध्ये भाजप एक विरोधी पक्ष म्हणून कोणतीही कसर ठेवत नाही असं म्हंटल्यास ती अतिशयोक्ती नक्कीच ठरणार नाही. यात भाजपचे काही प्रमुख चेहरे अगदी आघाडीवर दिसतात आणि याच चेहऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारचा एक दिवस देखील सुखाने जाऊ दिलेला नाही…

यात पहिले नाव येते ते माजी खासदार किरीट सोमय्या

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मागच्या काही काळात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यात अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापासून ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री अनिल परब, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर, खासदार भावना गवळी अशा नेत्यांवर आरोप केले आहेत.

ते आरोप करून थांबलेले नाहीत. तर त्यांच्या पाठपुराव्यामुळे यातील अनिल देशमुख, अनिल परब, छगन भुजबळ, प्रताप सरनाईक, भावना गवळी अशा नेत्यांच्या मागे ईडी, सीबीआय अशा केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा देखील लागला आहे. अलीकडेच हसन मुश्रीफ यांच्या विरोधात त्यांनी मोर्चा उघडला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे

सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं देखील नाव या यादीत येते. सरकारच्या कारभारावर थेट टीका करणारे नेते म्हणून त्यांना ओळखलं जात. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण, दिशा सॅलियन मृत्यू प्रकरण, कोरोना आरोग्य संकट अशा मुद्द्यांवर नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी सरकारवर टीका केलेली होती.

नारायण राणे फार आधीपासून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर देखील सातत्यानं वैयक्तिक टीका करताना दिसून येतात. कदाचित त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्यानंतर तर नारायण राणेंनी ठाकरे कुटुंबावर आरोप किंवा टीका करण्याची आतापर्यंत एकही संधी सोडली नाही.

काही दिवसापूर्वी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान त्यांनी अशीच एक टीका उद्धव ठाकरेंवर केली होती. त्यानंतरच्या काय काय घडामोडी घडल्या हे सगळ्या महाराष्ट्रासह देशाने बघितले होते.

गोपीचंद पडळकर 

भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर देखील सातत्यानं सरकारवर टीका आणि आरोप करताना दिसून येतात. ओबीसी आरक्षण, एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न अशा प्रश्नांसाठी ते सातत्यानं रस्त्यावर देखील उतरत असतात.

पडळकर यांनी अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ओबीसी आरक्षण संदर्भातली एक उपसमिती हरवली आहे. ती समिती काम करत नाही अशी टीका करणारे पत्र लिहिले होते.

त्यानंतर २ दिवसांपूर्वी पडळकर यांनी राज्य सरकारवर एसटी प्रशासनाच्या कारभारावरून देखील सरकारवर टीका केली होती. पडळकर आणि पवार कुटुंबियांचे वाद देखील सर्वश्रुत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर वारंवार टीका करणारे नेते म्हणून पडळकर यांची ओळख आहे.

चित्रा वाघ

भाजपमधील आक्रमक महिला चेहरा म्हणून चित्रा यांना ओळखलं जातं. राज्यातील महिलांच्या प्रश्नी सरकारला त्या प्रश्न विचारताना दिसून येतात. त्या विशेष चर्चेत आल्या होत्या ते पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन संजय राठोड व ठाकरे सरकारला कोंडीत पकडले होते तेव्हा. त्यावेळी चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेऊनच आपला आक्रमकपणा कमी केला होता.

त्यानंतरच्या काळात मेहबूब शेख, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे, साकीनाका बलात्काराची दुर्दैवी घटना अशावेळी वाघ यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. त्यामुळेच चित्रा वाघ यांना देखील सरकारला सातत्याने अडचणीत आणणाऱ्या नेत्या म्हणून वाघ यांना ओळखलं जातं.

अतुल भातखळकर

ठाकरे सरकारचे एखादे विधान आणि निर्णयावर तात्काळ प्रतिक्रिया देण्यासाठी आमदार अतुल भातखळकर यांची ओळख आहे. मुंबईतील प्रश्नांवर भातखळकर आक्रमकपणे बोलत असतात. यात मग महापालिकेतील कारभार, मुंबई लोकल, परप्रांतीय मुद्दे अशा प्रश्नांचा समावेश असतो. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून देखील भाजपने त्यांची नियुक्ती केली आहे

यापलीकडे जाऊन सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण, पूजा चव्हाण प्रकरण, धनंजय मुंडे प्रकरण, सचिन वाझे प्रकरण अशा प्रत्येकवेळी महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचं काम भातखळकर यांनी केलं आहे. त्यामुळेच अत्यंत अॅक्टिव्ह आमदार म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत.

आणि या सगळ्यांचे नेतृत्व करतात ते चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस :

भाजपच्या या सगळ्या चेहऱ्यांचे नेतृत्व आहे ते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे.

यात चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून सरकारला कोंडीत पकडणारे नेते म्हणून बघितले जाते. अगदी मंदिर उघडण्याच्या मुद्द्यापासून ते मराठा आरक्षण प्रश्न, ओबीसी आरक्षण प्रश्न, सरकारमधील मंत्र्यांच्या आरोपांविरोधात आंदोलन अशा अनेक वेळी ते रस्त्यावर उतरले आहेत.

तर देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष रस्त्यावर आणि विधिमंडळात देखील सरकारला कोंडीत पकडताना दिसून येतात. विशेषतः पूजा चव्हाण प्रकरणात आक्रमक होणे किंवा मनसुख हिरेन-सचिन वाझे प्रकरण, अनिल देशमुख यांच्यावरचे आरोप, कोरोना काळात सरकारच्या कामाच्या आढावा अशा प्रत्येक गोष्टींमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी रस्त्यावर उतरून काम केल्याचं दिसून आले होते.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.