छत्रपती शिवरायांचा अपमान करण्यात फक्त कोश्यारीच पुढे नाहीत तर BJP नेत्यांची यादीच आहे

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या आक्षेपाहार्य विधानानंतर त्यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. राज्यपालांच्या विधानामुळे जनमानसात रोष असतांना पुन्हा एक नवीन वाद उभा झाला. बरं छत्रपती शिवरायांचा अपमान करण्यात फक्त कोशारीच पुढे नाहीत तर BJP नेत्यांची यादीच आहे,

राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवरायांशी केली आहे. या तुलनेनंतर राज्यात विरोधी पक्ष आणि ठाकरे गटातील नेते आक्रमक झाले आहेत. यावर बोलतांना संजय राऊत यांनी भाजपमध्ये शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची स्पर्धा लागली आहे, असा आरोप केला आहे.

माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, 

“राज्यातील सरकार ही खोके सरकार म्हणून देशभरात कुख्यात झाली आहे. काल राज्याचे पर्यटन मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही छत्रपतींचा अपमान केला. कौन बनेगा करोडपती प्रमाणे कौन करेगा छत्रपती का अपमान अशी स्पर्धा लागलीय का?  यासारखी काही बक्षीस ठेवलंय का दिल्लीने?” 

संजय राऊत यांनी भाजपवर केलेल्या या आरोपांमुळे अलीकडे शिवरायांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. या नेत्यांमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल, कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्र्यांचा सुद्धा समावेश आहे. 

  • जय भगवान गोयल

 सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवरायांशी तुलना केल्यामुळे भाजप नेते जय भगवान गोयल चर्चेत आले होते.

जानेवारी २०२० मध्ये भाजपच्या दिल्ली कार्यालयात सांस्कृतिक आणि धार्मिक संम्मेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्या संम्मेलनात राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपचे नेते जय भगवान गोयलयांच्या  एका पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं होतं. गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकात नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली होती.  

तेव्हा या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला होता. कोणत्याही व्यक्तीची तुलना शिवरायांशी केली जाऊ शकत नाही, असं मत लोकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलं होतं. महाराष्ट्रात सुद्धा याचे पडसाद उमटले आणि या पुस्तकाला जोरदार विरोध सुरु झाला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांनी भाजपवर टीका केली.

हे पुस्तक मागे घेण्यात यावं आणि गोयल यांनी माफी मागावी यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गोयल यांचे फोटो आणि पुस्तक जाळण्यात आले. सोलापूर, नागपूर अशा ठिकाणी गोयल यांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यानंतर गोयल यांनी स्वतःचं पुस्तक मागे घेतलं आणि या वादावर पडदा पडला.

  • आमदार सुरेश हळवणकर

याच पुस्तकाचं समर्थन केल्यामुळे इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हळवणकर वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. 

जय भगवान गोयल यांच्या पुस्तकात नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांशी केली असल्यामुळे राज्यात विरोध सुरु होता, परंतु भाजप नेते सुरेश हळवणकर यांनी या पुस्तकाचं समर्थान केलं होतं. 

पुस्तकाचं समर्थन करतांना ते म्हणाले होते की, 

“पंतप्रधान मोदींशी केलेली तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच समजायला हवं. पंतप्रधान मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना करणे गैर नाही, मी पुस्तकाच्या लेखकाचं समर्थन करतो. देशात शेतकऱ्यांची आत्महत्या सुरु असतांना मोदींनी शेतकऱ्याच्या खात्यात ६ हजार रुपये जमा करण्याची योजना आणली. या युगात मोदींनी केलेलं काम नक्कीच दखलपात्र आहे.” 

पुस्तकाचा वाद संपत असतांना हळवणकर यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राज्यात वातावरण तापलं होतं.  

  • बसवराज बोम्मई 

कर्नाटकमध्ये शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. 

१६ डिसेंबर २०२१ रोजी काही समाजकंटकांनी, बंगलोरच्या सदाशिव नगरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर काळा रंग टाकला होता. शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे कर्नाटकातील मराठी लोकांनी विरोध सुरु केला. 

या विटंबनेच्या निषेधात मराठी लोकांनी अनेक ठिकाणी कानडी व्यावसायिकांना दुकान बंद ठेवण्यास सांगितलं. यावर बोलतांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 

ते म्हणाले होते की, 

“गुरुवारी बंगलोरमध्ये घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो, परंतु अशा लहान सहान घटनांवरून दुकानं बंद ठेवणे, दगडफेक करणे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे योग्य प्रवृत्ती नव्हे.” 

बोम्मई यांनी शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्याची घटना लहान सहान आहे असं म्हटल्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रात त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. यावरून महाविकास आघाडीने महाराष्ट्र भाजपवर देखील टीका केली होती. 

मध्य प्रदेशामध्ये भाजप नेत्याने शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यास नकार दिला होता. 

  • गिरीराज सिंग

ऑगस्ट २०२२ मध्ये भाजप नेते गिरीराज सिंग हे नियोजित कार्यक्रमासाठी मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यात आले होते. तेव्हा छिंदवाड्याच्या शिवाजी चौकात उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला आणि त्यांच्याकडे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्याची मागणी केली. 

कार्यकर्त्यांच्या या साध्याशा मागणीवर गिरीराज सिंग नाराज झाले. त्यांनी प्रोटोकॉलचं कारण पुढे करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यास नकार दिला. परंतु कार्यकर्ते मात्र स्वतःच्या मागणीवर अडलेले होते. त्यानंतर हो, नाही म्हणत गिरीराज सिंग यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केला.

या घटनेमुळे काँग्रेस नेते नकुलनाथ आणि कमलनाथ यांनी गिरीराज सिंग यांच्यावर शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचे आरोप लावले. सिंग यांनी अर्धवट मनाने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केला असंही त्यांनी म्हटलं होतं. या घटनेमुळे सुद्धा भाजप नेते शिवाजी महाराजांचा अपमान करतात असे आरोप करण्यात आले होते. 

  • राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांवर दोनदा आक्षेपाहार्य विधाने केली आहेत. 

फेब्रुवारी २०२२ मध्ये औरंगाबादच्या एका कार्यक्रमात बोलतांना भगतसिंग कोश्यारी यांनी समर्थांना शिवरायांचे गुरु म्हटले होते. तसेच समर्थांविना शिवाजी महाराज काहीच नव्हते असं देखील त्यांनी म्हटलं होतं. तेव्हा राज्यपालांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे आणि चुकीचे ऐतिहासिक संदर्भ सांगितले आहेत यावरून वाद सुरु झाला होता.

राज्यपाल म्हणाले होते की, 

“चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान आहे. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं होतं की, मला माझं राज्य तुमच्या कृपेने मिळालं आहे.”

राज्यपालांच्या या वक्तव्याचं उदयनराजे भोसले यांनी खंडन केलं होतं. ते म्हणाले की,  समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, मासाहेब जिजाऊ याच त्यांच्या गुरु होत्या; असं उदयनराजे यांनी म्हटलं होतं. राज्यपालांच्या वक्तव्याचा अनेक इतिहासकार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांनी निषेध केला होता. 

तर अलीकडेच राज्यपालांनी शरद पवार आणि नितीन गडकरी यांची तुलना शिवाजी महाराजांसोबत केली होती. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलता असतांना राज्यपालांनी  शिवाजी महाराजांना जुन्या काळातील आदर्श म्हटलं होतं.

“शिवाजी तर जुन्या काळातही आदर्श झाले. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यापासून ते नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील. जर तुम्हाला कोणी तुमच्या आदर्शांबद्दल विचारलं तर तुम्ही शरद पवार आणि नितीन गडकरी यांचं नाव सांगा.”

राज्यपालांच्या या विधानानंतर विरोधी पक्षांनी राज्यपाल आणि भाजपवर टिका केली. मान्ससह विरोधी पक्षांनी राज्यपालांना महाराष्ट्रातून हाकलून लावण्यात यावं अशी मागणी केली. त्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. त्यांचं धोतर फेडणाऱ्याला बक्षीस देखील घोषित करण्यात आलं. या वादानंतर राज्यपालांना दिल्लीवरून बोलावणं सुद्धा आलं होतं.

  • सुधांशु त्रिवेदी 

राज्यपालांचा नवीन वाद सुरु असतांना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी देखील शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केलं.  

भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी सावरकरांच्या माफीनाम्याचा विषय काढल्यानंतर राज्यात वाद सुरु झाला होता. तेव्हा सुधांशु त्रिवेदी यांनी सावरकरांच्या माफीनाम्याचा विषय पुढे करत, शिवाजी महाराजांनी सुद्धा औरंगजेबाची माफी मागितली असं म्हटलं होतं.

ते म्हणाले होते की, 

“राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्याचा मुद्दा मांडला आहे. मात्र आधीच्या काळात अनेक लोक सुटकेसाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील औरंगजेबाला पाच वेळा माफीचे पत्र लिहिले होते. मग त्याचा अर्थ काय होतो?” 

या वादग्रस्त विधानानंतर सर्व स्तरातील लोकांनी त्रिवेदींवर टीका केली होती. तसेच सत्ताधारी भाजपकडून शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान करण्यात येत आहे आरोप करण्यात आले होते. त्रिवेदी यांच्या विधानावर मनसे, महाविकास आघाडी आणि शिंदे गटातील नेते सुद्धा आक्रमक झाले होते.

  • मंगलप्रभात लोढा

तर आता राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

काल शिवप्रताप दिनाच्या दिवशी प्रतापगडावर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी शिवरायांच्या आग्रा सुटकेची तुलना शिंदे गटाच्या बंडाबरोबर केलीय.

ते म्हणाले की, 

“जसं औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होतं, पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा डांबून ठेवलं होतं, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले.”

लोढा यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. महाविकास आघाडीने सुद्धा शिवरायांची तुलना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर केल्यामुळे टीका केली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा मंगलप्रभात लोढा यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. तसेच भाजप नेत्यांमध्ये शिवाजी महाराजांवर टीका करण्याची जणू स्पर्धाच लागलीय असंही त्यांनी म्हटलंय. या ७ भाजप नेत्यांच्या वादग्रस्त विधानामुळे भाजपकडून शिवाजी महाराजांचा अपमान केला जातोय असं म्हटलं जात आहे.

हे ही वाच भिडू  

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.