पक्षावर नाराज झाले, म्हणून केंद्रीय मंत्र्यानी थेट व्हॉट्सॲप ग्रुप सोडलेत

आमचं एक दोस्त आहे, ते जरा नाजूक भावनांचं आहे. त्याची जरा मापं काढली, की तो गडी चिडत असतोय. बरं चिडला की चुकून पण शिवी देणार नाही, भेटल्यावर हाणणार नाही… तो फक्त आमचा व्हॉट्सॲप ग्रुप सोडत असतोय. तो आमच्यासोबतच असं करतोय असं पण नाही, घरच्यांनी शिव्या घातल्या की हा फॅमिली ग्रुपमधून पण कल्टी मारणार. आम्हाला त्यामुळे वाटायचं की, अशाप्रकारे राग व्यक्त करणारा हा जगातला एकटाच भिडू आहे.

पण आमचा हा समज डायरेक्ट एका केंद्रीय मंत्र्यानंच खोटा ठरवलाय. साहेब पक्षावर नाराज झाले म्हणून त्यांनी पक्षाचे सगळे व्हॉट्सॲप ग्रुप सोडलेत.

हे झालंय कुठं? तर पश्चिम बंगालमध्ये. तिकडं आधीच भारतीय जनता पक्षाचे स्टार्स फॉर्ममध्ये नाहीत. त्यात ममता बॅनर्जी यांनी बहुचर्चित असा विजय खेचून आणला आणि थेट सगळ्या देशात हवा केली. भाजपला हा पराभव पचवणं काहीसं जडच गेलं. अनेक भाजप नेत्यांनी तृणमूल काँग्रेसची वाट हाती धरली. मोठा सेटबॅक बसल्यानंतर अजूनही भाजपची गाडी रुळावर आलेली नाही. त्यात आता हे व्हॉट्सॲप ग्रुप सोडणंही चांगलंच गाजणार आहे.

बंदरे, जहाजे आणि जलमार्ग मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी आपली नाराजी जाहीर करण्यासाठी पक्षाच्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुपना रामराम ठोकला आहे. ठाकूर यांच्या नाराजी मागचं नेमकं कारण काय याची सध्या जोरदार चर्चा आहे आणि ते ग्रुप सोडणारे एकमेव भाजप नेतेही नाहीत.

ठाकूर हे मतुआ समाजाचं प्रतिनिधित्व करतात. अनुसूचित जातींमध्ये गणल्या जाणाऱ्या मतुआ समाजाचे प्रतिनिधी भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांत आहेत. ठाकूर हे मतुआ समाजाचे संघाधिपतीदेखील आहेत. ग्रुप सोडण्याचं कारण सांगताना त्यांनी, ‘राज्यातल्या भाजप नेतृत्वाला मतुआ समाजाची पक्ष संघटनेत महत्त्वाची भूमिका आहे असं वाटत नाही. राज्य नेतृत्वात माझंही काही महत्त्व नाही,’ अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्य आणि जिल्हा संघटनांच्या पुनर्बांधणीत मतुआ समाजाच्या आमदारांना स्थान न दिल्यानं जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र आपण पक्षाशी असलेली निष्ठा सोडणार नाही असंही ते म्हणाले होते.

ठाकूर यांच्या नाराजी नाट्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार म्हणाले, ‘आम्ही ठाकूर यांच्यासोबतचे सगळे गैरसमज दूर करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करु. ते भाजप कुटुंबाचेच सदस्य आहेत.’

आता एवढा राडा होतोय म्हणल्यावर, तृणमूल काँग्रेस गप कसं बसणार? त्यांनी भाजपवर टीका केली आहे. तृणमूलचे राज्यसभा खासदार सुखेंदु शेखर रॉय यांनी, ‘भाजपनं मतुआ समाजाचा फक्त आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर केला. जेव्हा त्यांचा विकास करण्याची वेळ आली तेव्हा त्यांना काही देणंघेणं नाही. हे आता स्पष्ट झालं आहे.’ अशी टीका केली.

गेल्याच आठवड्यात पाच भाजप आमदारांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी आमदारांचा व्हॉट्सॲप ग्रुप सोडला होता. आता थेट केंद्रीय राज्यमंत्र्यांनीच हे पाऊल उचलल्यानं बंगाल भाजपच्या गोटात काय खळबळ माजणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.