महाराष्ट्रात डझनाच्यावर भाजप आमदार घराणेशाहीतून आलेत !

भारतीय राजकारणाचा प्रवास लोकशाही नामक गोंडस नावाखाली सुरू असला, तरी त्याच्या व्यावहारिक नाड्या मात्र काही मोजक्या घराण्यांच्याच ताब्यात होत्या असं म्हंटल तर वावगं ठरू नये. थोडक्यात आज घराणेशाही नसलेला पक्ष भारतात शोधूनही सापडणार नाही. बऱ्यापैकी सर्वच पक्षांतील नेत्यांनी घराणेशाहीचा स्वीकार केलाय. आता आज हे सांगण्यामागचं कारण म्हणजे, भारतीय जनता पक्षाचे नेते तेजस्वी सूर्या यांनी बुधवारी काँग्रेस सरकारवर आणि त्यांच्या घराणेशाहीवर जोरदार निशाणा साधला. सूर्या म्हणाले,

समाजवादी विचारसरणी असलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारनं घराणेशाही चालू ठेवण्याच्या उद्देशानं देशाला गरीब ठेवलं. मोदी सरकारच्या आधी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देश एका कुटुंबाच्या (गांधी घराणं) ताब्यात होता. या देशात जर कोणी बेरोजगार असेल तर तो काँग्रेसचा युवराज काँग्रेसचा वंशज आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी सभागृहातील चर्चेत भाग घेत सूर्या यांना चोख प्रत्युत्तर दिलं. घराणेशाहीवर बोलताना त्या म्हणाल्या,

कर्नाटकातील भाजप आमदार रवी सुब्रमण्यम यांच्याशी सूर्यांचा संबंध काय आहे ? तसंच भाजप सदस्य प्रीतम मुंडे, पूनम महाजन, हीना गावित, रक्षा खडसे, एस. विखे-पाटील, ज्योतिरादित्य सिंधिया, पियुष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान हे हि घराणेशाहीचं प्रतीक असल्याचं सुप्रिया सुळे म्हंटल्या.

आता सुप्रिया सुळेंनी घेतलेल्या नावांमध्ये प्रीतम मुंडे, पूनम महाजन, हीना गावित, रक्षा खडसे, एस. विखे-पाटील हि नावं तर महाराष्ट्रातली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं बघायला गेलं तर महाराष्ट्रात भाजपचे एकूण १०५ आमदार आहेत. यातल्या कोणाकोणाच्या नावाला घराणेशाहीचा इतिहास आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात नाही म्हंटल तरी डझनच्या वर आमदार हे घराणेशाहीतून आले आहेत.

१. सिंदखेडाचे आमदार राज्याचे माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल हे तब्बल चार वेळा निवडून आलेले आहेत. नगरसेवक ते कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. धुळे जिल्ह्यातील बडं प्रस्थ म्हणून ते प्रसिद्ध आहेत.रावल यांचे आजोबा सहकारमहर्षी दादासाहेब रावल व काका वृक्षमित्र बापूसाहेब रावल हे देखील आमदार होते.

२. महाराष्ट्र भाजपत `टीम देवेंद्र फडणवीस’मध्ये युवा आमदार म्हणून आकाश फुंडकर हे एक नाव आहे. त्यांचे वडील कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांचं निधन झालं आहे. फुंडकर हे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या फळीतील भाजपाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्यानंतर आता आमदार ऍड. आकाश फुंडकर हे राजकीय वारसा चालवित आहे.

३. महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार होण्याचा मान मिळणारे संतोष दानवे रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आहेत. रावसाहेब दानवेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद, जिल्ह्याचे आमदार, खासदार, केंद्रीय राज्यमंत्री ही पद भूषवली आहेत.

४. अभयसिंहराजे भोसले ऊर्फ भाऊसाहेब महाराजांच्या निधनानंतर शिवेंद्रराजे भोसले राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर २००४ मध्ये ते राष्ट्रवादीतून साताऱ्याचे आमदार झाले. त्यावेळपासून ते आजअखेर ते सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

५. भाजपचे हिंगाणाचे आमदार समीर मेघे हे काँग्रेसचे माजी खासदार दत्ता मेघे यांचे चिरंजीव आहेत.

६. राणा जगजितसिंह पाटील हे उस्मानाबादकर पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आहेत. पद्मसिंह पाटलांना डॉक्टर, पहेलवान या नावांनीही ओळखलं जातं. १९७४ दरम्यान त्यांचा शरद पवारांशी संपर्क आला. त्यानंतर पवारांच्या अत्यंत विश्वासू व्यक्तींच्या यादीत त्यांचं नाव मोजण्यात येत होतं. सुरूवातीला जिल्हा परिषद, नंतर आमदारकी आणि मंत्रिपद, खासदार अशा वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलं.

७. पुण्याच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे हे भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र आहेत.

८. आमदार संभाजी निलंगेकर पाटील यांना त्यांच्या घरातूनच राजकीय वारसा मिळाला आहे. आजोबा शिवाजीराव पाटील निलंगेकर हे माजी मुख्यमंत्री, वडील स्व. दिलीपराव पाटील निलंगेकर आमदार, तर आई रुपाताई निलंगेकर या लातूरमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.

९. पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर हे माजी खासदार रमेश ठाकूर यांचे चिरंजीव आहेत.

१०. नंदुरबार मधील शहाद्याचे भाजप आमदार राजेश पाडवी हे आमदार उदेसिंग पाडवी यांचे चिरंजीव आहेत.

११. अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर हे खासदार संजय धोत्रे यांचे भाचे आहेत. सावरकर यांना भाजपने प्रथमच रिंगणात उतरविले. मित्र पक्ष शिवसेना विरोधात असतानाही धोत्रेंनी जोर लावून सावरकर यांच्यासाठी विजय खेचून आणला.

१२. औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे भाजप आमदार अतुल मोरेश्‍वर सावे हे माजी खासदार मोरेश्‍वर सावे यांचे चिरंजीव आहेत. उद्योजक असलेले मोरेश्‍वर सावे शिवसेनेचे महापौर आणि खासदार होते. अतुल सावे मात्र 97-98 पासून भाजपमध्ये कार्यरत आहेत.

१३. मुखेड विधानसभा मतदारसंघ हा नांदेड लोकसभा अंतर्गत येतो. सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपचे डॉ. तुषार राठोड करत आहेत. विद्यमान आमदार तुषार राठोड यांचे वडील स्वर्गीय गोविंद राठोड हे ७३ हजार २९१ मतांनी विजयी झाले पण आमदारकीचा शपथविधी होण्यापूर्वीच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर पोटनिवडणुकीत गोविंद राठोड यांचे चिरंजीव डॉ. तुषार राठोड हे ४७ हजार २४८ मतांनी विजयी झाले.

१४. नाशिक मध्यच्या भाजप आमदार देवयानी फरांदे या महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांच्या स्नुषा आहेत.

१५. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार सीमा महेश हिरे या सलग दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांचे सासरे पोपटराव हिरे भारतीय जनता पक्षाचे नेते होते.

हे हि वाच भिडू 

1 Comment
  1. Ramesh Kamble says

    दिव्याच्या बुडा खालचा अंधार दिसत नसला तरी त्याची जान असायला हवीच ज्याला नसते ते असे मुर्खपनाची व्यक्तव्य करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.