भाजपची विधानपरिषदेची उमेदवारी लिस्ट पाहता, महाराष्ट्रात ‘फडणवीस ही सबकुछ है’ सिद्ध झालंय

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार मधून उमेदवारांची लिस्ट जारी केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधून ९, महाराष्ट्रातून ५ तर बिहारमधून २ उमेदवारांची नावं देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या पाच नावांमध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांची नावं फिक्स आहेत. 

या पाचही नावांकडे बघितलं तर असं स्पष्ट जाणवत आहे की महाराष्ट्र भाजपवर देवेंद्र फडणवीस यांचाच कसा होल्ड आहे, पकड आहे. बहुतेक नावं अशी आहेत ज्यांना ‘देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय’ म्हणूनच संबोधित केलं जातं. तर काही नावं देवेंद्र यांची रणनीती दाखवतात. 

जसं की, उमा खापरे आणि राम शिंदे ही नावं…मात्र ते कसं काय ? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला या विधानपरिषदेच्या उमेदवारांच्या यादीतल्या नेत्यांचे देवेंद्र फडणवीसांसोबत असलेले संबंध पाहणं गरजेचं आहे.

 १)   प्रवीण दरेकर

शिवसेनेतून मनसेत आणि मनसेतून भाजपमध्ये असा राजकीय प्रवास प्रवीण दरेकर यांनी केलाय. विद्यार्थी दशेपासून प्रवीण दरेकर यांचा राजकारणात वावर आहे. १९८९ मध्ये शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेसोबत त्यांनी काम सुरु केलं. २००६ ला राज ठाकरेंसोबत शिवसेना सोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिलीय.

मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दरेकर पराभूत झाले अन २०१५ मध्ये त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. मनसेनंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रवेशाच्या पुढच्याच वर्षी म्हणजे जुलै २०१६ मध्ये प्रवीण दरेकर भाजपतर्फे विधानपरिषदेत गेले. त्याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची जवळीक निर्माण होऊ लागली.

तेव्हा मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दरेकर सक्रिय नेते म्हणून दिसू लागले. भाजपची बाजू मांडण्यात त्यांनी पुढाकार घ्यायला सुरुवात केली. पुढच्या तीन वर्षात त्याचा परिणाम दिसला. २०१९ मध्ये विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रवीण दरेकरांची वर्णी लागली.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दरेकरांना तिकीट मिळालं नव्हतं पण विधानसभेत त्यांना पाठवायचं तर होतंच. अशात भाजपमध्ये भाई गिरकर, सुजितसिंह ठाकूर यांसारखे नेते होते, ज्यांना डावलून देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाखातर प्रवीण दरेकरांचं नाव विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी देण्यात आलं होतं. पक्षात प्रवेश करून ५ वर्षही झाले नव्हते आणि त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली होती.

प्रवीण दरेकरांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस किती आग्रही असतात हे तेव्हाही दिसून आलं जेव्हा मुंबै जिल्हा बँक बोगस मजूर प्रकरणात पोलिसांनी दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. विधानसभेत याबद्दल फडणवीस आक्रमक झाले होते. 

“राजकीय सूडभावनेतून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून दरेकरांवर गुन्हा दाखल करुन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे” असं म्हणत भाजप पक्ष दरेकरांच्या पाठीशी ठाम उभा होता आणि त्यात फडणवीसांनी पुढाकार घेतला होता.

दरेकरांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत यंदा संपली आहे म्हणून त्यांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिलीय.

२) राम शिंदे

राम शिंदे हे याआधी फडणवीसांच्या कार्यकाळात मंत्री होते. कर्जत-जामखेडचे आमदार म्हणून त्यांची ओळख होती. मात्र २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहीत पवार यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यांचं नाव आता विधान परिषदेसाठी देण्यात येण्यामागे त्यांची काही बलस्थाने देखील आहेत, ते म्हणजे…

२०१४ मध्ये त्यांची महाराष्ट्राचे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांना अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीही करण्यात आलं होतं. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांचे ते निकटवर्तीय आहेत हे यावरून स्पष्ट होतं  की, जेव्हा फडणवीस सरकार होतं तेव्हा मंत्रिमंडळात राम शिंदे यांच्याकडे तब्बल चौदा खात्याची जबाबदारी देण्यात आली होती.

त्या सरकारमध्ये सर्वांत जास्त खाती मिळालेले ते एकमेव मंत्री होते. 

८ जुलै २०१६ रोजी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना कॅबिनेट पदावर बढती देण्यात आली होती. राजशिष्टाचार खाते मुख्यमंत्र्यांऐवजी पहिल्यांदाच शिंदे यांना देण्यात आलं होतं. नव्याने स्थापन करण्यात आलेले ओबीसी मंत्रालय तसंच फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार प्रकल्प ज्या खात्यांतर्गत होता ते जलसंधारण खातेही शिंदे यांच्याकडे होतं.

शिवाय गृहखातं, सार्वजनिक आरोग्य, कृषी, फलोत्पादन, विपणन आणि पर्यटन अशी खाती ते सांभाळत होते. 

त्यांना आता विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. यामागे अजून एक हे कारण देखील आहे की ते गोपीनाथ मुंडे यांचे ते समर्थक आहेत. शिवाय भाजपमध्ये गोपीनाथ मुंडेंनंतर ओबीसी मत घेणाऱ्या पंकजा मुंडे होत्या. असं असताना पंकजा यांचं पद काढून घेत ते राम शिंदे यांना देण्याचं काम भाजपने केलं होतं. 

आताही त्यांना उमेदवारी देत भाजपच्या राज्याच्या नेतृत्वाकडून पंकजा मुंडे यांना निशाणा करण्यात आलं आहे. पंकजा यांना पर्याय म्हणून राम शिंदे यांना पुढे करण्यात आल्याचं बोललं जातंय. 

३) श्रीकांत भारतीय

श्रीकांत भारतीय भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आहेत. मात्र फडणवीसांचे ओएसडी ही त्यांची ओळख या नियुक्तीसाठी महत्वाची ठरली आहे, असं बोललं जात आहे. श्रीकांत भारतीय हे संघ, भाजप पक्ष आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे दुवा म्हणून ओळखले जायचे.

ते फडणवीसांचे इतके जवळचे आहेत की २०१९ च्या विधानसभेवेळी फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी श्रीकांत यांना निशाणा करण्यात आलं होतं. त्यांच्या घराच्या बाहेर पार्क असलेल्या कारवर अज्ञातांकडून हल्ला झाला होता.

२०१४ विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या वॉर रुमच्या प्रमुख पदाची धूरा देखील सांभाळलेली होती. २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जवळच्या ७ लोकांना राहण्यासाठी घर देऊ केलं होतं. त्यात सर्वात मोठं घर श्रीकांत भारतीय यांचं होतं. 

सरकारी नियमानुसार सरकारमध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त बाहेरच्या लोकांना घर देता येत नव्हतं, मात्र तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांनी मुख्यमंत्री कोट्यातील १०% पावरचा वापर करून ही घरं दिली होती. 

फडणवीसांनी स्वतः लक्ष घालून स्वतःच्या ओएसडीला उमेदवारी देणारे  श्रीकांत भारतीय दुसरे आहेत. या आधी २०१४ ते २०१९ दरम्यान फडणवीसांचे ओएसडी राहिलेले अभिमन्यू पवार यांना विधानसभेला उमेदवारी दिली होती. सध्या ते औसा मतदारसंघातून आमदार आहेत.

भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य आहेत. शिवाय शिवसेनेवर सातत्याने टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांच्या या बॅकग्राउंडकडे बघता भाजपच्या अनेक नेत्यांना डावलून श्रीकांत यांचं नाव देण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस जातीने यात लक्ष देत असल्याचंही बोललं जातंय.

४) उमा खापरे 

विधानपरिषदेच्या उमेदवारीची आस लावून बसलेल्या पंकजा मुंडे यांना डावलून उमा खापरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचं बोललं जातंय. पंकजा मुंडेंना सक्रिय राजकारणातून बाहेर करायचं असेल तर त्यांना अपेक्षित असलेली उमेदवारी देऊ न करता पक्षातीलच महिला नेत्या तसेच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांना संधी देणं ही पंकजा मुंडे विरुद्ध देवेंद्र फडणवीसांच्या अंतर्गत राजकारणाची एक खेळी आहे असं राजकीय जाणकार सांगतात. 

त्यात उमा खापरे या भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात. आणखी एक मुद्दा लक्षात घेणं महत्वाचं आहे, ते म्हणजे उमा खापरे या ओबीसी नेत्या आहेत. 

उमा खापरे यांना भाजपाच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखलं जातं. नुकतंच दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपशब्द वापरले होते तेंव्हा खापरे या आक्रमकपणे समोर आलेल्या. आणि यातून त्यांनी भाजपच्या राज्याच्या नेतृत्वासमोर स्वतःला सिद्ध केलं. आणि असंही म्हणतात की, फडणवीसांच्या जवळच्या नेत्यांमध्ये उमा खापरे यांचं नाव आहे.

१९९७ ते २००७ या कालावधीत महानगरपालिकेवर नगरसेविका म्हणून त्या निवडून गेल्या होत्या. २००० ते २००२ मध्ये भाजपा महिला मोर्चा सचिव होत्या. तर, २००२ ते २०११ तीन टर्म भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस होत्या. याशिवाय २०१७ ते २०२० सोलापूरच्या प्रभारी होत्या. आणि आता २०१९ पासून त्या भाजपा राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत.

५) प्रसाद लाड 

‘फडणवीस हे कुटुंबप्रमुख, दरेकर आणि मी संताजी, धनाजीची जोडी आहोत’ हे विधान प्रसाद लाड यांनी केलेलं. दरेकरांनंतर प्रसाद लाड यांचं नाव फडणवीसांच्या जवळच्या लोकांमध्ये घेतलं जातं. अगदी दरेकर राईट हॅन्ड तर प्रसाद लाड यांना लेफ्ट हॅन्ड म्हटलं जातं.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले प्रसाद लाड हे जरी बाहेरून आलेले असले तरीही ते लवकरच फडणवीसांचे जवळचे बनले आणि “टीम देवेंद्र” चा भाग बनले. 

प्रसाद लाड सध्या भाजप महाराष्ट्र राज्य युनिटचे उपाध्यक्ष आहेत.  

प्रवीण दरेकर यांची देखील विधान परिषद सदस्यत्वाची मुदत यंदा संपली आहे. म्हणून त्यांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिली आहे. प्रसाद लाड हे भाजपचे पाचवे उमेदवार असणार आहेत. भाजप चार जागा निवडून येणार असा विश्वास बोलून दाखवत असताना पाचवी उमेदवारी प्रसाद लाड यांना देऊन पहिल्या पसंतीचे मतं घेऊन लाड सहज निवडून जातील असा विश्वास भाजपला आहे. 

म्हणून अतिरिक्त मतांसाठी लाड यांना उमेदवारी देण्यात आल्याचं बोललं जातंय. 

अशाप्रकारे एकंदरीत जर सगळे उमेदवार बघितले तर भाजपच्या या विधान परिषदेच्या यादीवर देवेंद्र फडणवीसांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वचक स्पष्ट होत आहे. प्रत्येक नावावर त्यांचा शिक्का दिसतोय. मर्जीतील व्यक्तींची निवड करून त्यांनी ‘टीम देवेंद्र’ उभारायला सुरुवात करत त्यातून पंकजा मुंडे यांना कसं साईडलाईन केलंय, हे दिसतंय अशी चर्चा आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.