भाजपचा राजकारणाचा बदलेला ट्रेंड पक्षातील प्रस्थापितांना धोक्याची घंटा…?

भाजपमध्ये मागच्या काही काळात बऱ्याच अंतर्गत घडामोडी घडत आहेत. काही दिवसापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. सोबतच उत्तराखंड, आसाम, कर्नाटक या काही राज्यांमधील नेतृत्वांमध्ये देखील बदल करण्यात आलाय. नुकतच कर्नाटकमध्ये ४ वेळा मुख्यमंत्री पद भूषवलेल्या येडियुरप्पा यांना हटवून बोम्मई यांना मुख्यमंत्रीपदी आणण्यात आलंय.

मात्र सध्या हाच बदल भाजपमधील प्रस्थापितांना आणि वर्षानुवर्षे पक्षात काम करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा असल्याचं मानलं जात आहे.

याला कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपमध्ये कितीही टीका झाली, कितीही दबाव आला तरी नेतृत्वात बदल केला जात नसायचा. याची बरीच उदाहरण आपल्याला सांगता येऊ शकतात. यात महाराष्ट्रात अनेकदा दबक्या आवाजात देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवून नितीन गडकरी यांना राज्यात पाठवावं अशी मागणी होतं होती.

मात्र तरीही भाजपने २०१९ च्या निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात लढल्या. मुख्यमंत्री म्हणून त्यांचाच चेहरा पुढे केला. पुढे मुख्यमंत्री म्हणून त्यांनीच शपथ घेतली, सोबतच सत्ता गेल्यानंतर फडणवीसांनाच विरोधी पक्ष नेते पदी कायम ठेवले.

त्यानंतर गुजरात आणि उत्तरप्रदेशमध्ये देखील कोरोनाकाळात या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर बरीच टीका झाली. त्यांना हटवण्याची मागणी देखील झाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत बैठक केली होती. मात्र भाजप इथं नेतृत्वावर ठाम राहिले. सोबतच रुपानी यांची देखील खुर्ची वाचली होती.

मात्र भाजपने सध्या तीन राज्यांमध्ये नेतृत्व बदल करून इथून पुढच्या काळात नेतृत्व बदल होणारच नाही हा समज मोडीत काढल्याचं पाहायला मिळतं आहे.

याचे काही इशारे देखील मागच्या काही दिवसांमध्ये बघायला मिळाले होते. कारण आगामी काळात एक तर गुजरात आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. आणि उत्तरप्रदेशमध्ये आताच योगी आदित्यनाथ यांना बदललं जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल असे युपीचे कामगारमंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी पत्रकारांना सांगितले. तर त्याच वेळी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी बरेली येथे गेल्या आठवड्यात सांगितले की, राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका कोणाच्या नेतृत्वात लढवायच्या, याचा निर्णय पक्षाच्या संसदीय मंडळाकडून घेतला जाईल.

काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास मानले जाणारे अरविंद कुमार शर्मा यांना निवृत्तीपूर्वी राजीनामा देऊन उत्तरप्रदेशाला पाठवले होते. घाईतच त्यांना विधानपरिषदेच सदस्य बनवून सभागृहात पाठवण्यात आले. त्यामुळे अरविंद शर्मा यांना त्याचवेळी मुख्यमंत्री केलं जाईल अशा शक्यता मांडल्या गेल्या होत्या, असे राजकीय तज्ज्ञांनी म्हंटले होते.

मात्र सध्या तरी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदी कायम आहेत. मात्र या सगळ्यांच्या विधानांवरून आणि भाजपने बदललेल्या आपल्या ट्रेंडवरून आगामी काळात असतीलच असं नाही. 

सोबतच गुजरातमध्ये मागच्या काळात मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी गुजरात दौर्‍यावर आले होते तेव्हा मोदींनी रुपाणी यांच्यासमवेत तौकते वादळाने बाधित भागाचे हवाई सर्वेक्षण केले.

यानंतर मोदींनी सी.आर.पाटील यांच्याशी स्वतंत्र बैठक घेतली होती. रुपाणी यांना त्यापासून दूर ठेवले. मोदींचा सी.आर.पाटील यांना पाठिंबा आहे, असा राजकीय संदेश त्यातून देण्याचा प्रयत्न कोठेतरी करण्यात आला होता.

त्यामुळेच आगामी काळात गुजरातमध्ये आगामी काळात नवीन चेहरा बघायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. एकूणच सध्या उत्तरप्रदेश आणि गुजरातवर धोक्याची घंटा आहे हे नक्की. 

दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्रिपद

भाजपमध्ये अलीकडच्या काळात आसाममध्ये पूर्वाश्रमीचे काँग्रेसी हिमंता बिस्वा सर्मांना मुख्यमंत्री केलं, तर नुकतंच जनता दलातून आलेले बसवराज बोम्मई यांना कर्नाटक मध्ये मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर बसवलं आहे. सोबतच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधिया, तर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या भरती पवार आणि कपिल पाटील यांना केंद्रात मंत्रिपद देऊ केलेलं आहे.

त्यामुळेच सध्या भाजपमध्ये बाहेरून आलेल्या नेत्यांना उच्च पद देण्याचं धोरण दिसून येत आहे. मात्र या गोष्टीमुळे पक्षात मागच्या अनेक काळापासून काम करते असलेले प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासारखे नेत्यांची नाराजी उघडपणे दिसून आली होती. सोबतच हिना गावित, सुशीलकुमार मोदी यांच्यासारखे नेते नाराज असल्याचं बोललं जात आहे.

याच सगळ्या कारणांमुळे भाजपचा हा सगळा बदललेल्या राजकारणाचा ट्रेंड प्रस्थापितांसाठी सध्या टेन्शनचं कारण बनलं आहे आणि ती आगामी काळासाठी धोक्याची घंटा मानलं जात आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.