एका रात्रीत शपथविधी उरकणाऱ्या भाजपने अजून “भिजत घोंगड” का ठेवलय..?

पहाटेचा शपथविधी. एका रात्रीत खटक्यावर बोट जाग्यावर पटली कार्यक्रम करण्यात आला होता. लोकांना काही कळायच्या आत शपथविधी पार पडलेला.

पण आत्ता चार दिवस नुसतं एकीकडून एकनाथ शिंदे ट्विट टाकतायत तर उद्धव ठाकरे लाईव्ह घेतायत. यापलीकडे विशेष अस काहीच घडताना दिसत नाहीय. एका बाजूला अडीच वर्षांपासून सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणारी भाजप तर या बंडखोरीपासून जितकं लांब राहता येतय तितकं लांब राहण्याचा प्रयत्न करतेय.

आज सकाळी चंद्रकांत पाटलांनी तर मोहीत कंबोज यांचे सर्वपक्षात मित्र आहेत म्हणून ते तिथं गेले असतील म्हणत हात झटकले. एरव्ही माध्यमांसमोर येवून पुरावे देत सरकारवर हमले करणारे देवेंद्र फडणवीस देखील दोन-चार दिवसात पुढे आलेले नाहीत. जे काही चालू आहे त्यामध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे-संजय राऊत-एकनाथ शिंदे इतकचं दिसत आहे.

साहजिक प्रश्न पडतो तो म्हणजे,

भाजप कुठेय आणि भाजपचं नक्की काय ठरलय..?

त्यासाठी काही प्रमुख प्रश्नांची उत्तरे क्रमवार शोधावी लागतील..

मुद्दा क्र १.  देवेंद्र फडणवीस कुठे आहेत ?

सद्याच्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नेमके कुठे आहेत, हा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येतंय हे जवळपास स्पष्ट झालं आहे आणि अशातच देवेंद्र फडणवीस माध्यमांसमोर दिसून न येणं, त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थान सागर बंगल्यावर भाजप आणि अपक्ष आमदारांची सतत ये-जा दिसणं, यामागं वेगवेगळं अर्थ काढले जातायत. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे, गिरीश महाजन अशा नेत्यांची आणि फडणवीसांची काल भेट झाली मात्र त्या भेटीत काय चर्चा झाली अजूनही समोर येऊ शकलेलं नाहीये. मात्र नक्कीच फडणवीस गप्प बसले नसावेत, तर ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यासोबत चर्चा करत असल्याचं बोललं जातंय. भाजप’कडून सत्तेची रणनीती आखली जातेय अशी माहिती मिळतेय. त्यामुळे पडद्यामागून मोठ्या घडामोडी सुरु आहेत. 

मुद्दा क्र. २ भाजप थेटपणे समोर का येत नाहीये ?

शिवसेनेच्या दोन गटांमध्ये राजकीय संघर्ष चालू असला, तरी एकनाथ शिंदे यांच्या गटामागे भाजपने संपूर्ण ताकद उभे केल्याचं दिसतंय. कारण कालच शिंदें ज्या प्रमाणे बंडखोर आमदारांशी बोलले त्याचा व्हिडीओ देखील आपण पाहिलाय.

आता भाजप थेटपणे समोर येत नाही त्यामागे ‘ऑपरेशन लोटस’ ऍक्टिव्ह असल्याचं बोललं जातंय. या ऑपरेशनद्वारे साम-दाम-दंड-भेद यातील एकही मार्ग भाजप सोडत नाही. त्यामुळेच बरयाचदा हे ऑपरेशन यशस्वी ठरतात, मध्य प्रदेश, कर्नाटक किंवा गेल्या वेळचे गोवा सरकार ही याची उदाहरणे आहेत. 

थोडक्यात हे ऑपरेशन प्रीप्लॅन्ड असतात. त्याच तयारीत सर्व भाजपचे नेते असावेत म्हणून ते शांत असावेत. राज्याच्या नेतृत्वाने तशी मौन पाळण्याची सूचना सर्व भाजप नेत्यांना दिली असावी.   शिवसेनेची एकदाची ही अंतर्गत लढाई संपेपर्यंत भाजप या रणांगणात थेट उडी घेणार नाही असं तरी दिसून येतंय.

मुद्दा क्र ३. २०१९ च्या चुकीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून फडणवीस सावध असावेत.

फडणवीसांनी पुण्यातल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घटना दरम्यान एक विधान केलेलं, “एक चुकीची खेळी आणि मी सत्तेचा पट हरलो”. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सेना-भाजपमधल्या सत्ता अजित पवार काही मोजक्या आमदारांसह पाठिंब्याचं पत्र घेऊन फडणवीसांकडे गेले आणि २३ नोव्हेंबर २०१९ ला देवेंद्र फडणवीसांचा आणि अजित पवारांचा पहाटचा शपथविधी पार पडला.

त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेनंतर अजित पवारांसोबत गेलेले सगळे आमदार परतले आणि सगळी समीकरणं बदलली. महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं.

“एक चुकीची खेळी आणि मी सत्तेचा पट हरलो.  राजकारणात बुद्धिबळाइतकंच सावध असलं पाहिजे नाहीतर ग्रँडमास्टरलाही पराभव स्वीकारावा लागतो असंही फडणवीस त्यावेळेस म्हणालेले. जे २०१९ मध्ये झालं तेच आत्ता होऊ नये म्हणून फडणवीस सावध असावेत.  थोडक्यात शिंदेंकडचे किती आमदार शेवट्पर्यंत टिकतील आणि किती सुटतील यावर फडणवीस पुढचं पाऊल टाकतील. 

मुद्दा क्र. ४. भाजपकडे अजूनही पुरेसं संख्याबळ नाहीये का ?

काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचं म्हणणं आहे कि, भाजपकडे अजूनही पुरेसं संख्याबळ नाही; त्यामुळे भाजप गप्प आहे. खरंच असं आहे का ? तर शरद पवारांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी या आमदारांना मुंबईतच याव लागणार आहे अस सांगितलं आहे. अशा वेळी काही आमदार पुन्हा परत येतील.

शिंदेच्या गटातून आमदार फुटण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच आधी आकडा सिक्युअर करावा, कन्फर्म करावं आणि मगच मैदानात उतरावं असा इरादा भाजपचा असावा. 

मुद्दा क्र. 5 फुटलेल्या गटाकडे अधिकृत मान्यता मिळेपर्यन्त शांत राहणे..? 

फुटलेल्या आमदारांची संख्या 35 च्या आत आली तर शिवसेनेकडून अशा आमदारांच सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव आणला जावू शकतो. कालच शिवसेनेमार्फत १२ जणांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

दूसरी गोष्ट म्हणजे सरकार स्थापन कधी करणार, पुढचं धोरण काय असणार यावर बोलण्यापेक्षा एकनाथ शिंदे हे फक्त आमचीच खरी शिवसेना, सदस्यत्व रद्द करता येणार नाही, कोर्टात जाणार अशी स्टेटमेंट करत आहेत.

थोडक्यात फुटलेल्या गटाला एक मान्यता मिळवून देणे, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडणे. सर्व गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसवूनच मग थेट समोर येण्याची भूमिका भाजपची असू शकते.

या विषयाबाबत बोल भिडूने लोकसत्ताचे पत्रकार संतोष प्रधान यांच्याशी चर्चा केली, प्रधान सांगतात कि, 

“फडणवीस पडद्यामागून सगळ्या हालचाली करत आहेत. माध्यमांसमोर येत नाहीयेत आणि त्यांनी पक्षाच्या सर्व नेत्यांना सक्त ताकीद दिलीय कि माध्यमांसमोर बोलू नका. मात्र प्रत्येक गोष्टींवर भाजपने लक्ष दिलं आहे. शिवसेनेच्या आमदारांना एअरलिफ्ट करणं, सुरतेहून गुवाहाटीला घेऊन जाणं, यात भाजपने प्रयत्न केलेत.

फक्त ते उघडपणे समोर येत नाहीयेत. ते असं दाखवतायेत कि आमचा याच्याशी काहीही संबंध नाही, शिवसेनेतील अंतर्गत मुद्दा आहे असं म्हणून भाजप बाजूला होतेय. शिंदेंना ३७ आमदारांच्या सह्या मिळतायेत त्यामुळे ते आता राज्यपालांना पत्र लिहितील. इथून पुढे खऱ्या घडामोडींचा सुरुवात होईल. पडद्यामागची भाजप आता समोर येईल” असंही प्रधान यांनी म्हंटलंय. 

राजकीय विश्लेषक विजय चोरमारे म्हणतात…

“एकनाथ शिंदेंना बंडासाठी प्रवृत्त करणं, जिथं भाजपचं सरकार आहे तिथं सुरतला नेणं, सुरतेहून गुवाहाटीला नेणं, त्या हॉटेलात तेथील सरकारच्या पोलीसांच्या सगळी बडदास्त ठेवणं हे काय लपून नाहीये. या सगळ्या प्लॅनिंगमध्ये भाजपचा हात असून भाजप शांत आहे कारण हे प्रकरण तडीला जाईपर्यंत शांततेत घ्यायचं त्यांनी ठरवलं.

जर का चुकूनही हे बंड फसलं तर आपल्यावर नामुष्की यायला नको. जर बंड फसलंच तर भाजपला म्हणता येईल आम्ही यात कुठेच नव्हतो. आता शिवसेना आणि शिंदे गटात जी काही लढाई आहे ती कायदेशीर पातळीवर आहे.

 ते विधिमंडळात संख्याबळाची लढाई  असोत किंव्हा मग शिवसेनेचा वेगळा गट स्थापन करण्याचा लढाई असो किंव्हा मग थेट एकनाथ शिंदेंचा शिवसेनेवरच दावा असोत, हि कायदेशीर लढाई केंद्रीय निवडणूक अयोग्य आणि सुप्रीम कोर्टात जाईल. आणि या कायदेशीर प्रक्रियेत एकनाथ शिंदेंना जी काही मदत लागेल ती मदत भाजप त्यांना करेल. 

तसेच पत्रकार अशोक वानखेडे बोल भिडूशी बोलताना म्हणतात कि, 

आजपर्यंत देशात जितकेही ऑपरेशन लोटस झालेत त्यात कुठल्याही ऑपरेशन लोटस मध्ये कुठल्याही नेत्याने असं सांगितलं नाही कि आम्ही यात इन्व्हॉल्व आहोत. मात्र ते पाठीमागून सगळं काही सप्लाय करत असतात. इथून सुरत -सुरतेहून गुवाहटी हा प्रवास सांगून जातो.  सरकारमध्ये एवढा मोठा विद्रोह आहे मात्र भाजप यावर एकही स्टेटमेंट देत नाहीये. याचा अर्थ ते ‘वेट अँड वॉच’ आहेत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.