भाजप त्यांना मुल्ला मुलायम म्हणायची पण त्यांचं सरकार वाचवलं वाजपेयींनीच..!

उत्तर प्रदेश हे देशातलं सगळ्यात मोठं राज्य. जितकी चर्चा केंद्रातल्या निवडणुकांची होते, तितकीच उत्तर प्रदेशमधल्या निवडणुकांचीही. इथला प्रचार वेगळा, सत्तासमीकरणं वेगळी आणि युत्या-आघाडीही. आता भारतीय जनता पक्ष आणि बहुजन समाज पक्ष हे दोन पक्ष एकत्र येतील असं वाटणं पण अवघड आहे. 

एक काळ होता जेव्हा मुलायम सिंग यांना भाजप मुल्ला मुलायम म्हणायची. राम मंदिराच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या मुलायमसिंग यांना भाजप कार्यकर्ते आपला नम्बर एकचा शत्रू मानायचे. आजही या परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. 

पण उत्तर प्रदेशमध्ये काहीही होऊ शकतं. झालं काय की, २००२ सालच्या इलेक्शननंतर राज्यात त्रिशंकू परिस्थिती तयार झाली. सत्तास्थापन करण्यासाठी सूर जुळले ते भाजप आणि मायावतींचे.

२००३ मध्ये ही युती तूटली आणि सरकार अल्पमतात आलं. बहुजन समाज पक्षाचे बंडखोर आमदार, अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्यामुळं मुलायमसिंह यांनी तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

मुलायमसिंह यांचं हे सरकार सहजासहजी स्थापन झालं नाही. समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते अमरसिंह यांनी एनडीटीव्हीशी बोलताना याचा खुलासा केला होता. त्यांनी सांगितलं, ‘मायावती मुख्यमंत्री असताना आमच्या कारखान्यांवर उत्पादन शुल्क विभागाच्या धाडी पडल्या, पण त्यात काही निष्पन्न झालं नाही. यावर अटलबिहारी वाजपेयी यांनी या धाडी टाकणं हे मायावतींचं कारस्थान असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे मायावती चिडल्या आणि त्यांनी भाजपचा पाठिंबा नाकारला.’

या सगळ्यात समाजवादी पक्षाला सत्तास्थापन करण्याचा आशावाद दिसला. त्यांनी भाजपसोबत चर्चा केली. तेव्हा अटलबिहारी आणि प्रमोद महाजन यांनी अमरसिहांना सांगितलं, ‘आमची एकच अट आहे. बाजारातून आंबे घेता तसे आमदार उचला, पण आमचा पक्ष फोडला तर योग्य होणार नाही. त्यामुळं आम्ही भाजपला हात लावला नाही, कमळ जसं फुललं होतं, तसंच राहिलं.’

सरकार स्थापन केल्यानंतर, समाजवादी पक्षानं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर सुरू असलेला खटलाही शिथिल केला. मुलायमसिंह यांनी सप्टेंबर २००३ मध्ये मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

ती मुलायमसिंह यांची मुख्यमंत्री म्हणून तिसरी टर्म होती. विशेष म्हणजे, आधीच्या दोन टर्म्सपेक्षा ही टर्म जास्त चालली. आपला कार्यकाळ पूर्ण करत हे सरकार २००७ पर्यंत टिकलं. या दरम्यान मुलायमसिंह पुन्हा लोकसभेवर निवडून गेले. मात्र केंद्रात जबाबदारीचं पद न मिळाल्यानं त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि ते राज्यात परतले.

अटलबिहारी वाजपेयी यांनी सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत पाठींबा काढला नाही आणि मुलायमसिंह यांचं सरकार टिकलं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.