मोदींच वाढत जाणार प्रस्थ कमी करण्यासाठी वाजपेयींकडून राष्ट्रपतीपदासाठी कलामांच नाव आलं

तारीख होती ४ एप्रिल २००२, स्थळ अहमदाबाद गुजरात. 

गुजरातची दंगल सुरू होवून बराच वेळ झाला होता. अखेर वाजपेयी गुजरातला आले होते. त्यांनी दंगलग्रस्तांच्या छावण्यांना भेटी दिल्या. ती अनाथ मुले पाहून त्यांच मन हेलावले. वाजपेयी म्हणाले, 

विदेशों में हिंदूस्थान की बहुत इज्जत हैं. उसमें मुस्लिम देश भी शामिल हैं. अब मैं वहां कोनसा मुंह लेकर जाऊंगा ? 

दिवसभराचा दौरा आटपून पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पत्रकार परिषदेला सामोरे गेले. इथेच त्यांच ते गाजलेलं विधान आलं. 

वाजपेयींना विचारण्यात आलं मुख्यमंत्री के लिए आपका क्या संदेश हैं ? 

वाजपेयी म्हणाले एकही संदेश हैं,

कि वे राजधर्म का पालन करें. राजधर्म यह शब्द काफी सार्थक हैं. शासन के लिए प्रजा-प्रजा में भेदभाव नहीं हो सकता. न जन्म के आधार पर, न जाति के आधार पर, न धर्म-संप्रदाय के आधार पर.

अटलजींचे हे वाक्य पुर्ण होताच शेजारी बसलेले मुख्यमंत्री मोदी म्हणाले,

हम भी वही कर रहे हैं साहब…

त्यावर आपला सूर बदलत वाजपेयी म्हणाले, 

मुझे विश्वास हैं कि नरेंद्रभाई यहीं कर रहें हैं… 

पत्रकार परिषद संपली. 

पण राजकीय विश्लेषक सांगतात की यावेळी नरेंद्र मोदींनी किमान राजीनामा देण्याची तयारी तरी दाखवायला हवी होती. पण हे मत फक्त वाजपेयी यांच होतं. अडवाणी यांच्या रथयात्रेनंतर हिंदूत्वाची धार कमी झाली होती. वाजपेयींच्या राजकारणात ती धार सेक्युलर पणाकडे झुकत होती. या घटनेतून वाजपेयी सेक्युलर आहेत हे सिद्ध झालं असत पण भाजपपासून हिंदूत्व हिरावण्याची देखील शक्यता होती. 

वाजपेयी यांना डावलून मोदींच्या राजीनाम्यास विरोध करणाऱ्यांमध्ये संघधुरीण तर होतेच पण यामध्ये खुद्द संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस देखील होते.

या घटनेनंतर लगेच दूसऱ्या आठवड्यातच म्हणजे १२ एप्रिल २००२ रोजी गोव्यामध्ये भाजप कार्यकारणीची बैठक होती. या बैठकीमध्ये निदान मोदींना राजीनामा देण्याची तयारी तरी दाखवली पाहीजे अशीच वाजपेयी यांची अपेक्षा होती. 

१२ एप्रिलच्या दिवशी खास विमानाने दिल्लीहून गोव्यासाठी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंतसिंह, अरुण शौरी, ब्रजेश मिश्र निघाले. विमानामध्ये मोदींच्या राजीनाम्याबाबत चर्चा होणार होती. 

पण समोरासमोर बसलेले अडवाणी आणि वाजपेयी काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते अखेर अरुण शौरी यांनी विषय छेडला. ते अटलजींना म्हणाले आपण दोघांनी गुजरातच्या प्रश्नासंबधी काय बोलायचं ठरवलं आहे. 

प्रस्तावना करण्याच्या सुरात वाजपेयी हे अडवाणी यांना म्हणाले,

गुजरात का क्या करना हैं? हमें गुजरात के बारे में सोचना चाहिए. 

या वाक्यावर अडवाणी जागेवरुन उठून विमानाच्या पाठीमागील बाजूस गेले. 

त्यावर वाजपेयी जसवंतसिंह यांच्याकडे पहात म्हणाले, 

“मोदी को कम से कम इस्तीफा ऑफर तो करना चाहिए. उनसे पुछऐ क्या करना है? 

जसवंतसिंह यांचा निरोप अडवाणी यांनी ऐकला व म्हणाले,

बवाल हो जाऐंगा. 

अखेर विमान गोव्यात उतरले. अटलजी किमान राजीनामा देण्याची तयारी तरी दाखवायला हवी यावर ठाम होते. 

बैठक सुरू झाली. व्यासपीठावर अटलजी, अडवाणी पक्षाध्यक्ष जन कृष्णमुर्ती व इतर जेष्ठ लोक होते. नरेंद्र मोदी उठले. त्यांनी भाषण केलं. भाषण संपवताना ते म्हणाले, 

हा जो हिंसाचार झाला त्याची नैतिक जबाबदारी घेवून मी राजीनामा देण्यास तयार आहे. 

वाक्य पुर्ण होण्या अगोदरच इस्तीफा मत दै इस्तीफा मत दो च्या घोषणा सुरू झाल्या. तात्काळ जेटलींनी मोदींनी राजीनामा देण्याची गरज नाही असा ठराव मांडला. सभागाराने ते बहुमताने मंजूर देखील केला. 

भाजपच्या तरुण फळीने ठरवून खेळ केल्याचं वाजपेयींना कळालं पण ते पाहण्याशिवाय दूसऱ्या कोणत्याच गोष्टी त्यांच्या हातात नव्हत्या. 

अखेर वाजपेयीं सायंकाळी संवाद साधत असताना म्हणाले, 

भारत प्राचिन काळापासून सेक्युलर आहे.  अगदी इस्लाम व ख्रिस्ति धर्म इथे येण्याअगोदर पासून.  इस्लामची दोन रुपे आहेत. एक आहे शांतीपाठ देणारा आणि दूसरा मूलतत्ववादी व दहशतीला प्रोत्साहन देणारा. जिथे मुस्लीम बहुसंख्य असतात.  तेथे ते शांततामय सहजीवन अशक्य करुन टाकतात. 

अटलजी यांनी बहुमताचा सन्मान राखत सामोपचाराचे धोरण स्वीकारलं होतं. एकीकडे अपमान झाल्याची भावना होती मात्र वाजपेयी यांनी पक्षांतर्गत नेतृत्व अधिक मजबूत असल्याची खात्री संध्याकाळच्या दरम्यानच्या भाषणात दिली होती. 

तरिही या गोष्टींमधून जात असताना भाजप हा कठोर हिंदूत्ववादी न राहता त्याला सेक्युलरपणाची देखील जोड असल्याचं वाजपेयींना दाखवायचं होतं. त्यासाठी आपलं पक्षातलं नेतृत्त्व देखील क्षीण करायचं नव्हतं. 

काही दिवस गेले आणि राष्ट्रपती पदासाठी कोण याची चर्चा चालू झाली. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अटलजींना भेटायला आल्या आणि त्यांनी डॉ. पी.सी. अलेक्झांडर आम्हाला राष्ट्रपतीपदाचे उमेदवार नकोत याची गळ घातली.

संघपरिवाराच्या बाहेरची व्यक्ती, त्यातही ख्रिश्चन त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांना भाजपची सेक्युलर चेहरा दाखवण्याची संधी होती. पण मृदू स्वभावाच्या अटलबिहारी यांनी सोनिया गांधी यांची विनंती ऐकली व अलेक्झांडर यांच नाव मागे पडलं. 

अशा वेळी धावून आले ते प्रमोद महाजन. पुढे जावून वाजपेयी यांनी प्रमोद महाजनांना लक्ष्मणाची उपाधी दिली होती याची पाळेमुळे कुठेतरी अशाच घटनांमध्ये असलेली दिसून येतात. 

या सर्व पार्श्वभूमीत वाजपेयींनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचा शोध चालू ठेवला होता.  

९ जून २००२ रोजी अडवाणी यांच्या घऱी प्रमोद महाजन, व्यंकय्या नायडू आणि जॉर्ज फर्नांडिस यांची बैठक बसली. या बैठकीत प्रमोद महाजन यांच्याक़डून एक वेगळ नाव पुढे आलं ते म्हणजे,

“अब्दुल कलाम” 

चौघेही हे नाव घेवून तात्काळ अटल बिहारी यांच्या घरी आले. त्यांनी अब्दुल कलाम यांच नाव सुचवताच अटल बिहारी वाजपेयी यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळतलं. मोठा पेच महाजन यांनी आपल्या कौशल्याने सोडवला होता. अटल बिहारी वाजपेयींनी अब्दुल कलामांना फोन लावला तेव्हा चेन्नईमध्ये ते विद्यार्थांना शिकवत होते. अटल बिहारी यांनी त्यांची संमती विचारली आणि पुढे कलाम राजधानीत आले.

एक वैज्ञानिक व्यक्ती, संघाबाहेरील व्यक्ती, मुस्लीम व्यक्ती व त्याहूनही अधिक देशप्रेमी, अन् त्यातही फक्त वाजपेयींच्या मनातील  व्यक्ती राष्ट्रपती पदाचा उमेदवार करुन जेष्ठ झालेल्या वाजपेयींनी तरुण फळीला योग्य इशारा दिला होता. 

हे ही वाच भिडू. 

2 Comments
  1. Vijay Gokhale says

    Country is lucky that it did not have Pramod Mahajan as PM.

Leave A Reply

Your email address will not be published.