पंजाबातल्या युतीचं गणित बसलंय, शहरात भाजप तर गावात कॅप्टन

मागच्या इलेक्शनवेळी आपल्या महाराष्ट्रात एक स्लोगन लय हिट ठरला होता, देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र. भाजपनं महाराष्ट्रातल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरला होता. आता पंजाबमध्ये भाजपनं अशीच एक स्कीम आणलीये. त्याचं झालंय असं की, पंजाबच्या निवडणूका आता तोंडावर आल्यात. भाजपला गेल्या निवडणुकांमधला बॅकलॉग भरुन काढण्यासाठी आणि आगामी लोकसभा निवडणुकांआधी बूस्टर मिळवण्यासाठी या निवडणुकांमध्ये जबरदस्त कामगिरी करणं गरजेचं आहे.

तशी भाजपसाठी ही निवडणूक सोपी नाही. सध्या पक्ष सत्तेत नाही, त्यात केंद्र सरकारनं वादग्रस्त कृषी कायदे मागं घेतले असले, तरी पंजाबच्या शेतकऱ्यांमध्ये भाजपबद्दल चांगलाच रोष आहे. त्यामुळं पंजाब जिंकणं भाजपसाठी कठीण पेपर आहे.

दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्येही सारं काही आलबेल आहे असं अजिबात नाही. इलेक्शनच्या आधीच पक्षांतर्गत वादानं काँग्रेसला पोखरून काढलं. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाच, पण पक्षालाही रामराम ठोकला. एवढंच नाही, तर कॅप्टन सिंग यांनी पंजाब लोक काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केली. बरं काँग्रेसला एकट्या कॅप्टन यांचंच टेन्शन आहे असं नाही. नवज्योत सिंग सिद्धू यांच्या वागण्याचा आणि भूमिकेचा अंदाज लावणं काँग्रेस सोडा भल्याभल्या राजकीय पंडितांना अवघड जातंय. त्यामुळं भाजप असो किंवा काँग्रेस पंजाबची निवडणूक तशी सोपी नाहीच.

या बुद्धीबळाच्या लढाईत भाजपनं एक चाल तर खेळली आहे. शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो, हा फॉर्म्युला त्यांनी परफेक्ट वापरला. काँग्रेसला रामराम ठोकत नवा पक्ष काढणाऱ्या अमरिंदर सिंग यांच्याशी भाजपनं युती केली आहे. नव्या पक्षाची घोषणा केल्यावरच कॅप्टन यांनी भाजपशी युती होण्याबाबत संकेत दिले होते. केंद्रानं वादग्रस्त कृषी कायदे मागे घ्यावेत अशी अट कॅप्टन यांनी ठेवली होती. केंद्रानं कायदे मागे घेतल्यानं या युतीचा मार्ग मोकळा झाला.

आता दोन पक्ष एकत्र येणार म्हणल्यावर ते युती करणार हे तसं स्वाभाविक आहे. मात्र कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी थोडा वेगळा फॉर्म्युला वापरायचं ठरवलं आहे. त्यांनी युती न करता, जागावाटपाच्या फॉर्म्युलावर रिंगणात उतरायचं ठरवलंय.

काय आहे हा फॉर्म्युला?

भाजप आणि पंजाब लोक काँग्रेस यांचं गणित ठरलंय. पंजाबच्या शहरी भागाची खिंड भाजप लढवणार आहे, तर ग्रामीण भागात शड्डू ठोकणार आहे कॅप्टन अमरिंदर सिंगांची पंजाब लोक काँग्रेस.

यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे, अमरिंदर सिंग यांचं पंजाबच्या ग्रामीण भागात चांगलंच वजन आहे. त्यांना शेतकऱ्यांचा चांगलाच पाठिंबा मिळत आलाय. मागच्या निवडणुकांमध्येही ग्रामीण भागातून मिळालेल्या भरघोस मतांमुळं कॅप्टन आणि पर्यायानं काँग्रेस पंजाबचं रण जिंकू शकले होते. भाजपला याआधीही शहरी भागातून चांगली मतं पडली आहेत. शिरोमणी अकाली दलाशी असलेल्या युतीवेळीही भाजपनं हाच फॉर्म्युला वापरला होता.

भाजपचा शहरी भागांवर भर का?

भाजपनं या वर्षाच्या सुरुवातीपासूनच शहरी भागांवर लक्ष केंद्रित केलं आहे. पंजाबच्या शहरी भागांमध्ये जवळपास ३५ मतदारसंघ आहेत. या भागांवर भाजपचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे. दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा रोषाला सामोरं जाऊन खिंड लढवणं भाजपला धोक्यात टाकू शकतं. त्यामुळं शहरी मतदारांवर लक्ष केंद्रित करत, भाजपनं सेफ गेम खेळला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

आता हा फॉर्म्युला हिट होणार? की कॅप्टन काँग्रेसला आणि भाजप शिरोमणी अकाली दलाला मिस करणार? हे निवडणुकांचे निकाल आल्यावर स्पष्ट होईलच.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.