गांधीजींना खरंच देश ‘काँग्रेस मुक्त’ करायचा होता का…?
‘काँग्रेस मुक्त भारत’
पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा देशातील सत्ताधारी पक्ष असणाऱ्या भाजपचा कुठलाही छोटा-मोठा राजकीय नेता असेल, प्रत्येकाच्या अत्यंत आवडीची घोषणा म्हणजे ‘काँग्रेस मुक्त भारत’
भाजपला देश ‘काँग्रेस मुक्त’ करायचा असेल तर तो त्यांनी जरूर करावा. आपला प्रमुख राजकीय विरोधक म्हणून भाजपने काँग्रेस बाबतीत तशी भूमिका घेण्यास कुणालाच काही आक्षेप असण्याचं कारण नाही.
देशाच्या राजकीय सारीपाटावर दीर्घकालीन पकड मिळविण्यासाठी देशाच्या राजकीय इतिहासातून काँग्रेसचं अस्तित्व संपूर्णतः मिटवून टाकणं (अर्थात ही केवळ अशक्य कोटीतली गोष्ट आहे) ही भाजपची राजकीय गरज आहेच. त्या गरजेची पूर्तता करण्यासाठीच भाजपकडून ‘काँग्रेस मुक्त’ भारताच्या निर्मितीचं अभियान अत्यंत आक्रमकपणे राबवलं गेलंय, राबवलं जातंय आणि भविष्यातही ते तसंच राबवलं जाईल, याबाबत मनात कसलीही शंका बाळगण्याचं काहीही कारण नाही.
आपला हा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून भाजपकडून काँग्रेसच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या नेत्याच्या नावाचा वापर अत्यंत सरधोपटपणे करण्यात येतोय. हे मात्र अत्यंत चुकीचं आणि देशातील तमाम जनतेची दिशाभूल करणारं आहे. काँग्रेसचे आणि देशाचे हे नेते म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी होत.
“काँग्रेस मुक्त भारत हे नरेंद्र मोदी या माणसाचं नाही, तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं स्वप्न होतं. आम्ही त्याच स्वप्नाच्या परिपूर्तीसाठी काम करतोय” असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या संसदेत केलं होतं. भाजपचे अनेक नेते देखील ‘काँग्रेस मुक्त भारत’ हे गांधीजींचंच स्वप्न होतं, ही भावना देशातील जनमानसावर बिंबवण्यासाठी अहोरात्र झटत असतात.
नरेंद्र मोदी आणि भाजपच्या या भूमिकेला नेमका आधार काय..?
भाजपकडून सांगण्यात येतं की गांधीजींची शेवटची इच्छा अशी होती की “आता देशातील काँग्रेसच्या अस्तित्वाची गरज संपलेली असून काँग्रेस हा पक्ष संपवण्यात यावा.” भाजपकडून आपल्या भूमिकेच्या समर्थनात गांधीजींच्या शेवटच्या इच्छेचा पुरावा दिला जातो.
भाजपकडून पुरावा म्हणून सादर करण्यात येत असलेली ही गांधीजींची तथाकथित ‘शेवटची इच्छा’ गांधीजींच्या मृत्यूनंतर १५ दिवसांनी म्हणजेच १५ फेब्रुवारी १९४८ रोजीच्या ‘हरिजन’ या वृत्तपत्रातील अंकात प्रकाशित करण्यात आली होती. यात गांधीजी असं म्हणतात की, “देशाच्या स्वातंत्र्यानंतर सद्यस्थितीतील काँग्रेसची प्रचारमाध्यम म्हणून असलेली उपयुक्तता संपुष्टात आली आहे”
गांधीजींचं हे एकमेव वाक्य भाजपकडून सादर केलं जातं आणि सामान्य माणसांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. या वाक्याची पार्श्वभूमी आणि गांधीजींचं त्यानंतरचं यासंदर्भातील विवेचन भाजपकडून जाणीवपूर्वक दडवलं जातं.
पार्श्वभूमी
मुळात भारताच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचं आहे ते स्वरूप बदललं पाहिजे, अशी चर्चा देशात सुरु झाली होती. गांधीजींना देखील काँग्रेसच्या तत्कालीन स्वरुपात काही बदल अपेक्षित होते. देशातील सत्ताधारी पक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना काँग्रेसने अजून लोकाभिमुख होणं आणि काँग्रेसने कोट्यावधी भारतीयांची काळजी वाहणाऱ्या सेवाभावी संघटनेच्या भूमिकेत जाणं गांधीजींना अपेक्षित होतं.
काँग्रेस या राजकीय पक्षाच्या संविधानात गांधीजींना जे काही बदल अपेक्षित होते त्याचाच मसुदा गांधीजींनी आपल्या हत्येपूर्वी तयार केला होता. गांधीजींची तथाकथित ‘शेवटची इच्छा’ म्हणून सादर करण्यात येणारं वाक्य देखील या मसुद्यातीलच आहे. आपल्या या मसुद्यात गांधीजींनी म्हंटलय की,
“देशाच्या स्वातंत्र्यानंतर सद्यस्थितीतील काँग्रेसची प्रचारमाध्यम म्हणून असलेली उपयुक्तता संपुष्टात आली आहे. देशाला सामाजिक, नैतिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम अजून शिल्लक आहे. अशा स्थितीत काँग्रेसला इतर राजकीय पक्ष आणि धार्मिक शक्तींमधील सत्तासंघर्षाच्या स्पर्धेपासून दूर ठेवण्याकरिता काँग्रेसच्या सध्याच्या स्वरुपात आवश्यक ते बदल करण्यात येऊन ही संघटना ‘लोक सेवक संघ’ म्हणून ‘विकसित’ करण्याचा निश्चय आपण केला पाहिजे ”
गांधीजींनी काँग्रेस पक्षाच्या आहे त्या स्वरुपात आपल्याला अपेक्षित ते बदल सुचविणारा जो मसुदा तयार केला होता, त्याला गांधीजींची ‘शेवटची इच्छा’ असं म्हणणंच मुळी चुकीचं आहे.
दुसरी आणि अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट अशी की या मसुद्यात कुठेही गांधीजी काँग्रेस पक्ष संपुष्टात आणण्याविषयी कसलीही सूचना करत नाहीत. उलट ते काँग्रेसला ‘लोक सेवक संघ’ म्हणून ‘विकसित’ करण्याची गरज अधोरेखित करतात. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि नैतिक पातळीवरील प्रगतीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी काँग्रेस संघटनेला अधिक मजबूत करण्यासाठी म्हणून संघटनेत आपल्याला अभिप्रेत असलेले बदल ते सुचवतात.
गांधीजींच्या हत्येच्या ठीक २ दिवसानंतर म्हणजेच २ फेब्रुवारी १९४८ रोजीच्या ‘हरिजन’च्या अंकात गांधीजींचा एक कॉलम प्रकाशित करण्यात आला होता. या कॉलममध्ये गांधीजींनी काँग्रेस पक्षाविषयीचे आपले विचार अतिशय स्पष्टपणे व्यक्त केले होते. या कॉलममध्ये गांधीजी लिहितात की,
“भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही देशातील सर्वात जुनी राष्ट्रीय राजकीय संघटना असून या संघटनेने अहिंसेचा मार्ग अवलंबवत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलंय. काँग्रेसला संपुष्टात आणलं जाऊ शकत नाही. काँग्रेस त्याचवेळी संपेल, जेव्हा हे राष्ट्र संपुष्टात येईल”
गांधीजींनी इतक्या स्पष्टपणे देशाच्या भविष्यकालीन वाटचालीच्या दृष्टीने काँग्रेसच्या अस्तित्वाची आवश्यकता अधोरेखित केलेली असताना ‘काँग्रेस मुक्त भारत’ ही गांधीजींचीच इच्छा होती, असं म्हणणं हा फक्त सामान्य माणसांचा बुद्धीभेदच नाही तर तो या महान नेत्याशी केलेला ‘द्रोह’ देखील ठरतो.
आजचा ‘काँग्रेस पक्ष’ खरंच गांधीजींना अपेक्षित असलेल्या रस्त्यावरून मार्गक्रमण करतोय का, हा वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकतो. त्यासाठी काँग्रेसवर पाहिजे तशी टीका-टिपण्णी केली जाऊ शकते. त्यासाठी कुणाचीच ना नाही. पण म्हणून ‘काँग्रेस मुक्त भारत’ अभियानासाठी गांधीजींच्या एका वाक्याचा आपल्या सोईपुरता वापर निश्चितच स्वीकारला जाऊ शकत.
-अजित बायस
- संघाच्या व्यासपीठावरून गांधीजी काय बोलले होते ?
- गांधीजींच्या या शब्दांनी पाकिस्तानी गांधींना रडू कोसळलं होतं !!!
- नोटांवरचा गांधीजींचा हा फोटो आला तरी कुठून?
- कॉंग्रेसपासून भाजपपर्यंत सगळेच बलात्कार प्रश्नावर वाचाळवीर !!!